आपली क्रांती आपण क्लेम केली पाहिजे

सागर अ. कांबळे

दलित बहुजन समाजाची दु:स्थिती ब्राह्मणी, सरंजामी व्यवस्थेतून निर्माण झालेली आहे. आपल्या स्थितीकडे बघण्याची दृष्टीसुद्धा बऱ्याचवेळा याच व्यवस्थेतून निर्माण होते. आणि एवढ्यावरच ही गोष्ट थांबत नाही. आपल्या प्रतिकाराची पद्धत, भाषा, प्रतीकाराशी जोडलेल्या संकल्पना यांनासुद्धा ब्राह्मणी सत्तेशी जोडलेली सांस्कृतिक व्यवस्था नियंत्रित करायला लागते. तिचं नियंत्रण वाढतं आणि आपण भोवऱ्यात फेकलो जातो.
आपल्या आजूबाजूचे नियम, परिभाषा या व्यवस्थेकडून आपल्याला दिल्या जातात. जसं जसं आपण शिक्षण आणि इतर संस्थांच्या संपर्कात येतो तसे आपण उपजत शिकलेल्या गोष्टी सोडून ब्राह्मणी व्यवस्थेचे संस्कार आणि ब्राह्मणी-सरंजामी सत्तेला पूरक अशी भाषा, सामाजिक नियम शिकतो. त्याही पुढे जाऊन या सत्तेला, जैसे थे व्यवस्थेला पूरक अशी प्रतिकाराची भाषा, संकल्पना आत्मसात करतो.
क्रांती काय असते? कोणत्या बदलला क्रांती म्हणायचे हे आपण कसे ठरवतो? कुठून शिकतो? क्रांती या संकल्पनेबद्दलची आपली सामुहिक मेमरी काय आहे? भारतात झालेल्या कोणत्या ऐतिहासिक घटनांना, परिवर्तनाला आपण क्रांती हा शब्द वापरतो? क्रांती / रिव्होल्युशन हा शब्द आणि त्याला जोडून येणारी दृश्य कल्पना आपण जशीच्या तशी बाहेरच्या देशातून घेतली आहे का? त्या त्या देशात त्या क्रांत्या झाल्यानंतरच्या पुढच्या परिस्थितीची जाणीव आपल्याला आहे का? त्या देशातून जेव्हा क्रांती आणि तिला जोडलेल्या संकल्पना आपल्याकडे आल्या तेव्हा आपल्या इथे क्रांती शब्द / संकल्पना वापरणारे कोणकोणते वैचारिक गट होते, नेते होते?
क्रांती म्हणजे आमुलाग्र बदल. व्यवस्थेतला जो सर्वात दबलेला वर्ग आहे त्याच्या स्थितीत बदल. मग, भारतीय समाजाच्या संदर्भात असा आमुलाग्र बदल म्हणजे कोणता बदल डोळे उघडे ठेवून जगणाऱ्या कुठल्याही माणसाला कळायला अवघड नाही!
फुले-बाबासाहेबांची जी लढाई होती ती या समाजात आमुलाग्र, मूलगामी बदल आणणारी होती. या लढ्यात त्यांच्यासोबत हजारो, लाखो सैनिक होते, जसे कुठल्याही क्रांतीत असतात. असे असताना या लढ्याला क्रांती न म्हणण्याचे संस्कार आपल्यावर कसे झाले? शेकडो – हजारो वर्षांची दलितांची, शुद्र जातींची मानसिक, सामाजिक गुलामीची बंधने तोडणारी लढाई म्हणजे या देशातील क्रांती नाही तर मग कोणती लढाई क्रांती आहे?
मग या क्रांतीची जाणीव आपल्याला का होत नाही? ‘आमच्या मास्तर शिकवतो आज बामणाच्या पोराला’ म्हणणाऱ्या अडाणी लोकांना ही क्रांती कळते. ती उच्चशिक्षित दलित बहुजनांना समजू दिली जात नाही.
क्रांती झाली म्हणजे सगळेच प्रश्न १०० टक्के सुटलेत असा दावा इथे नाही. खरा प्रश्न असा आहे की, क्रांतीची संकल्पना जी इथल्या लेफ्ट-पंडित लोकांनी डोक्यात घोळवली आहे, तिची वाट बघतच दलित-बहुजनांनी जगायचे का! लेफ्ट-पंडित, लिबरल-बाबू आपल्याला क्रांती संकल्पनेच्या नावाने भुलवतात. आपल्यासाठीच्या क्रांतीची सुरुवात फुले-बाबासाहेबांनी तेव्हाच केलेली आहे. त्यांनी बळकट केलेला आपला हा लढा क्रांती म्हणून जेव्हा आपण बघायला शिकू त्यावेळी आपल्याला तो आणखी पुढे नेता येईल. आपली ऐतिहासिक परिवर्तनाची लढाई, क्रांती आपण own-up केली तरच, क्रांती संकल्पना आणि आपल्या प्रतिकाराच्या पद्धती याबद्दलचे ब्राह्मणी संस्कार आपल्यातून गळून पडतील. आपल्याला आपली लढाई अधिक स्पष्टपणे लढता येईल. आपल्यापुढचे प्रश्न सोडवता येतील.

१९२७ ला महाड येथे जमलेल्या क्रांतिकारकांसमोर बोलताना बाबासाहेब चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीच्या ठरावासोबत करतात. कारण बाबासाहेब ब्राह्मणी संस्काराच्या पलीकडे जाऊन या गोष्टी बघू शकतात. नाहीतर ब्राह्मणी संस्कार आपल्याला केवळ न्यूनगंड शिकवत असतात. बाबासाहेब पुढे जातीव्यवस्थेचे उच्चाटन या भाषणात समाजवादी. हिंदू सुधारणावादी, शुद्धी वाले, आर्य समाज वाले या सर्वांना सुनावतात आणि क्रांतीची तोंडओळख करून देतात.

‘आमच्या स्थितीत बदल घडवून आणणाऱ्या क्रांतीसाठी आम्ही लढलो आहे’ ही गोष्ट आपल्या सामुहिक मेमरीमध्ये अधिक ठळक करण्याची गरज आहे. त्यातूनच आपल्याला आजच्या स्थितीशी, प्रश्नांशी लढायला ताकद मिळेल. बाबासाहेबांनी हेसुद्धा स्पष्ट सांगितले आहे की क्रांतीनंतर ब्राह्मणी सत्तेकडून प्रतिक्रांतीचे प्रयत्न होत असतात. प्रतीक्रांतीशी लढण्यासाठी आधी आपण क्रांतीवर क्लेम केला पाहिजे. जातीव्यवस्था विरोधातली फुले-आंबेडकरी चळवळ आणि संविधान ही आपली क्रांती आहे.
क्रांतीचे परिणाम स्पष्ट दिसणारे असतात. आज जी काही दलित-बहुजन पिढी शैक्षणिक, आर्थिक, बौद्धिक प्रगती करताना दिसते आहे ते या क्रांतीचाच परिणाम आहे. दलित समाजाने कठोर मेहनतीने सुरु केलेला पक्ष (बहुजन समाज पक्ष) देशातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा राष्ट्रीय पक्ष होतो. ब्राह्मणी-सरंजामी व्यवस्था असलेल्या अवाढव्य राज्याची मुख्यमंत्री एक दलित स्त्री होते. या गोष्टींकडे क्रांती म्हणून न बघणे आपल्यात कुठून येते? आपण फुले-बाबासाहेब प्रेरित क्रांतीची अपत्ये आहोत. म्हणून आपण या क्रांतीला अधोरेखित करण्याची, तिची स्मृती जतन करण्याची आणि त्यातून प्रेरणा घेण्याची गरज आहे.

सागर अ. कांबळे

लेखक राज्यशास्त्र विषयाचे पदवी व पदव्युत्तरसाठी अध्यापन करतात.

संबंधित लेख:
कसला इतिहास? कसले नायक?
बाबासाहेबांचा पुतळा म्हणजे समग्र शोषण मुक्तीचा डिस्कोर्स :

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*