आनंद क्षीरसागर
अमेरिकेतील कृष्ण वर्णीय नागरिकांचे महान नेते ‘माल्कम एक्स’ म्हणतात- ” गोरा वर्णद्वेषी माणूस आणि गोरा पुरोगामी, लिबरल माणूस हे ‘लांडगा’ आणि ‘कोल्ह्यासारखीच’ असतात. गोरा वर्णद्वेषी माणूस आपली गुंडगिरी , दंडेली आणि दहशत वापरून काळ्या माणसावर थेट जुलूम करतो. तर गोरा पुरोगामी लिबरल माणूस कोल्ह्याप्रमाणे धूर्त आणि लबाडपणे काळ्या माणसासमोर काळया माणसाच्या बाजूने बोलतो . आपण किती पुरोगामी असून अन्यायी सरकारी व्यवस्थेच्या विरुद्ध आहोत हा दावा तो करतो . परंतु अशी गोरे लिबरल पुरोगामी माणसे आपल्या स्वार्थासाठी आणि आपली राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक मक्तेदारी तशीच टिकवून काळ्या लोकांचे छुप्यापद्धतीने संस्थात्मक शोषण आणि दमनच करतात. अशा स्थितीत काळया समाजाने अधिक जागरूक राहण्याची गरज आहे” , याची गरज माल्कम -एक्स बोलून दाखवतात.
सध्या मराठी- हिंदी नाटक सिनेमा क्षेत्रातील एकंदरीत स्थिती पहिली की हे वाक्य भारतीय परीप्रेक्ष्यात किती चपलख बसते याची खात्री पटल्याशिवाय राहत नाही.
आपण पाहत आहोत की सध्या ब्राह्मण सवर्ण पुरोगामी कलाकार , लेखक दिग्दर्शक सध्या सत्तेत असलेल्या राजकीय व्यवस्थेविरुद्ध आणि धार्मिक कट्टरतेविरुद्ध आपला निषेध नोंदवण्यासाठी आपले नाटक,चित्रपट, लेख , पत्रकारिता ह्याचा वापर करत आहेत . परंतु ते देखील सध्या अस्तित्वात असलेल्या सामाजिक , आर्थिक, राजकीय , सांस्कृतिक आणि धार्मिक व्यवस्थेतून बहुजनांचे दमनच करत आलेले आहेत ह्या वास्तविकतेकडे अशी माणसे कधी नकळत आणि कधीकधी जाणून बुजून दुर्लक्ष करत आलेले आहेत.
असे सवर्ण पुरोगामी कलाकार आणि विचारवंत मंडळी हे विसरतात की त्यांची सरकार आणि धार्मिक कट्टरतावादी शक्तीच्या विरुद्ध निषेध आणि विरोध नोंदवण्याची कृती ही ‘सोयीचे खरे बोलण्याची’ कृती आहे.अशी कृती त्यांचे सवर्ण उच्चजातीय स्थान दर्शवते . कारण त्यांचे हे जातीय , सांस्कृतिक , सामाजिक स्थान ते करत असलेल्या बहुजनांच्या सामाजिक , आर्थिक , राजकीय , सांस्कृतिक , राजकीय शोषणातूनच जन्माला आलेले आहे .
बहुजन समाजाला ब्राह्मण सवर्णांचा धार्मिक कट्टरतावाद , मुस्लिम धर्मातील अश्रफ सवर्ण घटकांचा तसेच , शिखांमधील उच्च जातीय शिखांचा आणि ख्रिश्चन धर्मातील रोमन -कॅथॉलिक, अँग्लोइंडियन, सीरियन ख्रिश्चन धार्मिक कट्टरतावाद काही नवीन नाही . आमच्यासाठी ह्या सर्व शक्ती प्रतिगामीच आहेत . आणि जेव्हा अशा शक्ती आपल्या विषारी दाताने समाजाला डंख मारतात, तेव्हा त्याचा सर्वात मोठा फटका आणि त्रास बहुजन समाजालाच होत असतो . त्यामुळे आम्ही बहुजन समाज अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्याची जेव्हा जेव्हा मुस्कटदाबी होते तेव्हा त्याच्या विरुद्धच आहोत . आणि अशा धार्मिक कट्टरतावादी शक्तींना विरोध करण्यास कटिबद्ध आहोत . परंतु , अशा बुरसटलेल्या धार्मिक कट्टरतावादी शक्तींना एका बाजूने विरोध करायचा, परंतु आपल्यावर होत असलेल्या ब्राह्मण सवर्ण पुरोगामी सांस्कृतिक , सामाजिक , राजकीय , आर्थिक व्यवस्थेचे दमन स्वीकारून त्याबद्दल एक शब्दही न बोलणे ही बेईमानी मात्र आम्ही करणार नाही . त्यामुळे बहुजन समाजाचे ब्राह्मण सवर्ण धार्मिक कट्टर शक्तींकडून होणारे थेट शोषण असो किंवा पुरोगामित्वाचा बुरखा पांघरलेल्या सवर्ण सांस्कृतिक , सामाजिक , दडपशाहीचे छुप्या पद्धतीचे शोषण याला विरोध करणे हे आम्हा बहुजनांसाठी क्रमप्राप्तच आहे .
मुळात ब्राह्मण सवर्ण लेखक , दिग्दर्शक , कलाकार करत असलेले नाटक , सिनेमा , टीव्ही सिरीयल हे मुळात बहुजनांच्या घाम , रक्त , कष्ट , संधी , प्रतिष्ठा , समान हक्क , सन्मान , आणि कलेच्या क्षेत्रात बहुजनांची न्याय नेतृत्व आणि निर्णयक्षमता ह्यांना डावलून उभे राहिलेली अन्यायकारी व्यवस्था आहे . अशी व्यवस्था आजही बहुजनांना फक्त अशा सवर्ण कलाकार , विचारवंत यांची ‘मुकी प्रेक्षक जनता’ म्हणूनच पाहते . त्यामुळे तथाकथित ब्राह्मण सवर्ण पुरोगामी लेखक , कलाकार , दिद्गर्शक , विचारवंत यांनी कडव्या धार्मिक कट्टर शक्तींना केलेला विरोध मग त्या कोणत्याही धर्माच्या का असेनात , हे प्रस्थापित सवर्ण बनेलपणाचे खास उदाहरण आहे असे आम्ही बहुजन समाजातील कलाकार आणि विचारवंत मानतो .
परंतु आता बहुजन समाज अशा लोकांचे बहुजन समाजाचेच शोषण करणारे ब्राह्मण सवर्ण पुरोगामी खोटे मुखवटे टराटरा फाडल्याशिवाय राहणार नाहीत .
पुण्या मुंबईमध्ये व्यावसायिक किंवा प्रायोगिक नाटक करणारे “नाटकवाले ” असो किंवा टीव्ही सिरीयल किंवा सिनेमा करणारे सवर्ण सांस्कृतिक, कलेचे, राजकीय, आर्थिक व्यवस्थेचे मक्तेदार असो ; ही मुळातच बहुजनांच्या घाम , रक्त , कष्टावर उगवलेली विषारी , जुनाट बुरशी आहे . ही बुरशी बहुजनांना फक्त PASSIVE AUDIENCE (निष्क्रिय प्रेक्षक ), सवर्ण नाटक सिनेमा टीव्ही क्षेत्रातील ‘कष्टकरी हमाल’ म्हणूनच आजपर्यंत मोठ्या प्रमाणात वापरत आलेली आहे . ही तीच लोक आहेत जी बहुजनांनी फक्त पैसे देऊन आम्हा सवर्ण कलाकार , दिग्दर्शक , लेखक यांना पहा , आमचे कौतुक करा परंतु ह्या व्यवस्थेत आपले हक्काचे न्याय्य स्थान , समान संधी , प्रतिनिधित्व मागू नका असा विचार कळत नकळतपणे वर्षानुवर्षे रेटत आले आहेत. असे लोक वेळ पडल्यास महात्मा फुले , सावित्रीबाई फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर , अण्णाभाऊ साठे , पेरियार यांसारख्या बहुजन समाजातील महान व्यक्तींवर नाटक , सिनेमा टीव्ही काढून आम्हीच कसे पुरोगामी व्यक्तिस्वातंत्रवादी मशालीचे वाहक आहोत हे देखावे उभे करत आलेले आहेत . परंतु दुर्दैवी सत्य हेच आहे की हा स्वातंत्र्यवादी देखावा ज्या पुण्या मुंबईत काही प्रस्थापित ‘नाटकवाले ’ माणसे वर्षानुवर्षे नाटक करत आलेली आहेत , तेथील नाट्य , सिनेमा , कला यांचे अर्थकारण , राजकारण , सौंदर्यशास्त्र अजूनही मोठ्या प्रमाणात जातीय , सवर्ण , प्रस्थापित सांस्कृतिक व्यवस्थेच्या सडक्या किडक्या हातात आहे . यातून बहुजन समाज , बहुजन समाजाच्या कलाकारांची ह्या व्यवस्थेत काय गत होत असेल हे कोणत्याही हुशार आणि विचारी व्यक्तीला सांगायची गरज नाही . ह्याचा विचार करता अतुल पेठेंचा १३ मार्च २०२१ मधील ‘सकाळ वृत्तपत्रात’ छापून आलेला लेख बहुजन समाजाने व्यवस्थित समजून घेणे गरजेचे आहे . कारण कोणत्याही लेखाचा खरा अर्थ हा त्या लेखात लेखकाने काय लिहिलेले नाही, यात दडलेला असतो .
आपल्या लेखात अतुल पेठे असे म्हणतात की , “नाटक सिनेमा क्षेत्रातील कलाकार ‘दुर्बल’ असतात त्यांना कोणी वाली नसतो . हे जर काही क्षणासाठी खरे मानले तर ह्या सवर्ण कला आणि सांस्कृतिक जाणिवेच्या बहुजन विरोधी व्यवस्थेत काम करणाऱ्या बहुजन समाजातीलच कलाकार , स्पॉटबॉय , चहावाला , इस्त्रीवाला , केटरिंगवाला , ड्राइवर ,नाटक आणि सिनेमा गृहांचे संडास , मुतारी स्वच्छ आपल्या हाताने स्वच्छ करणारे कामगार, कलाकार यांची स्थिती किती दुर्बल आणि हतबल असेल याची कल्पना कदाचित त्यांना दिसून येत नाही . कारण अशा बहुजन समाजातील कलाकार आणि श्रमिकांचे शोषण धार्मिक कट्टरवादी शक्ती देखील करतात आणि पुरोगामित्वाचा आव आणणारे सांस्कृतिक , आर्थिक , राजकीय मक्तेदार ही करतात हे जळून चिघळलेलेल्या जखमेसारखे वास्तव आज बहुजन समाजातील कलाकारांचे आणि श्रमिकांचे आहे याची कल्पना आज बऱ्याच सवर्ण पुरोगामी कलाकार आणि विचारवंतांना नाही .
सवर्ण , जातीय , सांस्कृतिक , आर्थिक , राजकीय व्यवस्था बहुजन समाजाचे शोषण आणि दमन दोन प्रकारे करते . पहिल्या प्रकारामध्ये जेव्हा जेव्हा बहुजन समाजातील लेखक , कवी , कलाकार स्वतः स्वप्रेरणेने , स्वतःच्या जीभेने आणि स्वतःच्या अनुभवातून आपल्या जीवनाचे सार , संचित आणि होणारा अन्याय कलेच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्यावर थेट हल्ले करून त्यांचा आवाज दाबायचा प्रयत्न केला जातो . हा बहुजनांचा आवाज नागड्या गुंडगिरीने दाबायचा प्रकार आहे .
परंतु बहुजन समाजाचा आवाज एका दुसऱ्या पद्धतीने देखील दाबला जातो . ज्यामध्ये सवर्ण , पुरोगामी अजातीय( ?), म्हणवणारे ब्राह्मण सवर्ण कलाकार विचारवंत स्वतःला बहुजनांचा कोणताही जीवनानुभव नसताना बहुजनांची अभिव्यक्ती नाकारून आणि त्यांचीच जागा हिसकावून घेऊन बहुजनांचीच बाजू सवर्ण भूमिकेतून आणि उसन्या बहुजन जीवनानुभवातून मांडायचा प्रयत्न करतात तेव्हा देखील बहुजनांची छुपी मुस्कटदाबीच होते . मी तर एक पाऊल पुढे टाकून असे म्हणेल की यातील पहिल्या प्रकारची मुस्कटदाबी एक वेळ जास्त चांगली आहे , कारण ती ताकतीचा खुलेआम वापर केल्यामुळे संपूर्ण जगाला दिसून येते आणि त्याबद्दल पोलीस -न्यायालय यांकडे दाद देखील मागायला कायदेशीर जागा असते . परंतु , लबाडी , कपटीपणे जेव्हा सवर्ण कलाकार , लेखक , दिग्दर्शक , विचारवंत बहुजनांचीच जागा हिसकावून घेऊन बहुजनांचीच मुस्कटदाबी करतात तेव्हा त्याचा अतिशय नकारात्मक परिणाम बहुजन समाजाला भोगावा लागतो . अशा छुप्या दडपशाहीबद्दल बहुजनांना कोणतीही दाद मागता येत नाही . अशा मुस्कटदाबीबद्दल बहुजन कलाकार आणि विचारवंत जेव्हा सवर्ण सांस्कृतिक व्यवस्थेला जाब विचारतात तेव्हा ब्राह्मण सवर्ण कलाकार आणि विचारवंत असे उत्तर देतात की “आमची बहुजनांचा आवाज दाबण्याची कोणतीही इच्छा नाही , तसेच आम्ही देखील धार्मिक कट्टरतावाद्यांविरुद्ध आहोत . त्यामुळे आम्ही वेळ पडल्यास बहुजनाच्या बाजूने बहुजनांचा आवाज बनून बोलू शकतो” .
हा ब्राह्मण सवर्ण पुरोगामी व्यवस्थेचा छुपा बहुजन विरोधी डाव आहे असे इथे आम्हाला स्पष्ट वाटते . कारण बहुजन समाज आणि बहुजन समाजातील कलाकारांनी हे व्यवस्थित समजून घेणे गरजेचे आहे की , खरे पुरोगामी असणे म्हणजे ‘सामाजिक न्यायाच्या’तत्वाने बहुजनसमाजाच्या कला , संस्कृती यांची व्यापक सामाजिक व्यवस्थेमध्ये अभिव्यक्ती , न्याय हक्क , नेतृत्व स्वीकारणे आहे . त्यामुळे सरकारी धोरण , योजना आणि धार्मिक कट्टरवाद्यांविरुद्ध अधून मधून विरोध करणे हे पुरेसे नसून बहुजन समाजाला त्याचा आवाज , त्याची स्वतंत्र अभिव्यक्ती फुलवण्याचा हक्क ब्राह्मण सवर्ण सांस्कृतिक व्यवस्थेने स्वीकारणे हीच पुरोगामित्वाची खरी कसोटी असू शकते असे आम्हाला स्पष्ट वाटते .
परंतु असे न होता विवेक , तर्क , बुद्धीप्रामाण्यवादाचा दाखला देणारे ब्राह्मण सवर्ण कलाकार , विचारवंत जेव्हा छुप्या पद्धतीने बहुजनांचा आवाज आणि सहभागिता नाकातरतात तेव्हा त्यांचा विवेक , तर्क आणि बुद्धिप्रामाण्यवाद किती अस्सल आहे याचा बहुजन समाजाला प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही .
असे तर्हेवाईक ब्राह्मण सवर्ण पुरोगामी कलाकार , दिग्दर्शक , विचारवंत 12 महिने सेन्सर बोर्डच्या माध्यमातून सरकार करत असलेली मुस्कटदाबी बद्दल टिपे गाळत असतात . सेन्सर बोर्डच्या संयुक्ततेच्या आणि प्रयोजनाबद्दल या लेखात मला इथे चर्चा करायची नाही . परंतु असे ब्राह्मण सवर्ण पुरोगामी कलाकार हे विसरतात की बहुजन समाज आणि बहुजन कलाकारांना एकाच वेळी दुहेरी सेन्सर बोर्डचा सामना करावा लागतो .
असे सरकारी सेन्सर बोर्ड हे एक प्रकारे कलाकार म्हणून आपली कारकीर्द संपलेल्या आणि ‘सरकार धार्जिण्या’ कलाकारांचा हक्काचा ‘सरकारी PARKING स्पॉट’ म्हणून वापरला जातो . अशा सेन्सर बोर्ड मध्ये सरकार च्या राजकीय , धार्मिक , जातीय आणि सांस्कृतिक विचारांची ‘री वर री’ ओढणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांचा देखील भरणा असतो . सेन्सर बोर्डाच्या सदस्यत्वाकडे व्यवस्थित पहिले असता आपल्याला इथे हे जाणवते की ह्या बोर्डावर मोठ्या प्रमाणात ब्राह्मण सवर्ण व्यक्तींचा भरणा असतो . त्यामुळे सेन्सर बोर्डचा वापर करून सवर्ण राजकीय , सामाजिक सांस्कृतिक व्यवस्थाच बहुजन समाजावर आपला अंकुश ठेवत असते . तर दुसरीकडे स्वतःला विवेकवादी , तर्कवादी , बुद्धिप्रामाण्यवादी , पुरोगामी , समाजवादी , साम्यवादी , मार्क्सिस्ट – आंबेडकरी ( अशी कोणती वैचारिक संकल्पना खरेच अस्तित्वात आहे का हा ब्राह्मण सवर्ण बुद्धिवाद्यांचा जावई शोध आहे हे तपासणे देखील गरजेचे आहे ) अशी विशेषणे आपल्याला लावणारी माणसे बहुजन समाजाची छुपी मुस्कटदाबी करून बहुजन समाजाची सांस्कृतिक अभिव्यक्ती मारत असतात .
सरकारी सेन्सर बोर्ड हे CENSORSHIP ACT 1948 ह्या सरकारी कायद्यावर उभी असलेली व्यवस्था असल्याने त्याविरुद्ध बहुजनांना एकवेळ न्यायालयामध्ये दाद मागता शक्य आहे . परंतु ब्राह्मण सवर्ण प्रस्थापित दमनकारी सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक व्यवस्था मग ती धार्मिक कट्टरतावादी संघटना असो किंवा सवर्ण पुरोगामित्वाचा बुरखा असणारी नाटकवाल्यांची आणि सिनेमावाल्यांची मांदियाळी असो , बहुजन समाजाचे शोषण हे ठरलेलेच आहे . परंतु इथे सुद्धा सवर्ण व्यवस्थेच्या छुप्या दमानाबद्दल बहुजन समाजाला कुठेच दाद मागता येत नाही . ह्या वास्तवाचे भान ह्या सवर्ण पुरोगामी प्रस्थापित व्यवस्थेचे रखवालदार समजून घेत नाहीत . यावरून हे स्पष्ट दिसून येते की असा सवर्ण व्यक्तींच्या गळ्यातील ब्राह्मण्यवादी ‘पांढरे जानवे ‘ जाऊन गरजेनुसार कधी कधी साम्यवादी किंवा समाजवादी ‘लाल जानवे’ घातले जाते तर कधी डॉ आंबेडकर ,जोतिबा फुले , कार्ल मार्क , फ़्रेंडरीक एंगेल्स , झिझेक , रोझ लुक्सएंबेर्ग ,अॅलन बदू यांची पुस्तकी वाचन चर्चा करून ‘बौद्धिक भुईनळे’ उडवण्याचे धंदे ‘निळे जानवे ‘ घालून होत असताना आपल्याला दिसत आहेत .
अशा लोकांना अभ्यास गटांमधून आम्ही जणू काही बहुजनांच्या सामाजिक , राजकीय , सांस्कृतिक प्रश्नांची ज्ञानशास्त्रीय (EPISTEMOLOGICAL ) मांडणीच करत आहोत असा भास होतो . अशा चर्चांमधून त्यांना ‘बौध्दिकी ऑरगॅसम’ नक्कीच येत असला, तरी बहुजनांचे वास्तविक प्रश्न जमिनीवर तसेच राहतात आणि त्यात एकही बदल होत नाहीत . जेष्ठ समाजवादी नेते एस. एम जोशी म्हणतात ते बरोबरच आहे की – “जातिभेदावर आणि भांडवलशाहीवर विश्वास नसणाऱ्या एका समाजवादी ब्राह्मणाने जर शाळा काढली , तर पुढील दहा वर्ष्यात त्यास असे आढळून येईल की , त्या शाळेत जातीभेदावर विश्वास नसलेले भांडवलशाहीचे विरोधक असे समाजवादी परंतु पुन्हा “ब्राह्मण ” व्यक्तीच गोळा झालेल्या तुम्हाला दिसून येतील” . म्हणून अशा पुस्तकी अभ्यासवर्गांची बहुजन समाजाच्या वास्तविक प्रश्नांची उकल होण्यास किती मदत लाभेल आणि त्यात बहुजनांच्या हातात निर्णय प्रक्रिया आणि नेतृत्व किती असेल ह्या दारुण अवस्थेची स्पष्ट कल्पना बहुजन समाजास , बहुजन कलाकारांना आणि विचारवंतांना असल्याने असे सवर्ण वैचारिक स्टडी सर्कल बहुजनांचे काही कामाचे नाहीत हे त्यांना चांगलेच माहित आहे. बहुजन समाज आणि त्याचे प्रश्न हे सवर्णांच्या बौद्धिक अभ्यासक्रमाची ‘सवर्ण प्रयोगशाळा’ आणि प्रयोगांचे ‘गिनी पिग’ नाहीत हे सवर्ण कलाकार आणि विचारवंतांना स्पष्टपणे समजले पाहिजे .
त्यामुळे अशी बौद्धिक चर्चा चर्वण करणारी माणसे 21 व्या शतकातील शहरी सवर्णांचा भरणा असलेली ‘प्रार्थना समाज’ , ‘थिऑसॉफिकल सोसायटी’ , ‘ सार्वजनिक सभा’ , ‘हितोपदेशक मंडळी’ आहेत . असे पुरोगामी सवर्ण कलाकार आणि विचारवंत बहुजनांच्या वास्तविक मूळ प्रश्नांना , आणि त्यातील जीवनानुभव , प्रत्यक्ष अनुभव ह्यांना एकतर ‘अनुल्लेखाने’ किंवा ‘अति वैचारिक चर्चा चर्वण’ करून मारून टाकतात . ही सवर्ण कलाकार आणि विचारवंतांची सवर्ण अपराधीपणा ( SAVARNA GUILT ) आणि सवर्ण परोपकारी भावनेने जन्माला येणारी कृती आहे , जिचा बहुजनांना काडीचाही उपयोग होत नाही . परंतु अशा सवर्ण कलाकार आणि विचारवंतांना आम्ही कसे सामाजिक भान जपणारे संवेदनशील व्यक्ती आहोत याचा उसना आनंद मात्र यातून घेता येतो . त्यातून काही सवर्ण कलाकारांचा ‘सामाजिक दृष्ट्या संवेदनशील कलाकार’ असा ‘मार्केट ब्रँड’ देखील तयार होतो जो त्यांना पुढे जाऊन नाटक ,सिनेमा टीव्ही सिरीयल मध्ये बहुजन पात्र रंगवून बहुजन समाजाकडून स्वीकाहार्यतेला उपयोगी पडतो . ह्यात सवर्ण कलाकारांचा जितका वैचारिक करंटेपणा आहे तिचाच त्यांचा कलाकार म्हणून आर्थिक स्वार्थ देखील लपलेला असतो हे स्पष्ट बोलण्यास आम्हाला कोणतीही लाज किंवा भीती वाटत नाही . हा एकंदरीत बहुजन समाजाचा बुद्धीभेद करून त्याच्या जीवांवर आपली वाढ आणि विकास घडवून आणण्याचा सवर्ण ब्राह्मण्यवादी कावा आहे असे आम्हाला स्पष्ट वाटते . अशा वैचारिक धूळ फेकीला बहुजनांची मागील एक अख्खी पिढी मुर्खासारखी बळी पडलेली आहे . तरी आमच्यासारख्या तरुण बहुजन तरुण कलाकार आणि विचारवंतांची नवीन पिढी ह्या बुद्धिभेदाला बिलकुल बळी पडणार नाही .
अतुल पेठे त्यांच्या लेखात असे म्हणतात की “ दुसऱ्यावर असे आक्रमण करण्यासाठी ‘नायकत्वाचा ’ अधिकार कोण देते ? माझ्या खांद्यावर माझे डोके आणि डोक्यात मीच विचार करण्याची यंत्रणा शाबूत असताना ; आपण न निवडलेली ही माणसे हे नसते उद्व्याप का करत असतात ?”
हाच प्रश्न आज माझ्यासारखी तरुण बहुजन कलाकार आणि विचारवंत व्यक्ती , तरुण तर्क , विवेक , बुद्धीप्रामाण्यवादाचा झेंडा नाचवणारे सवर्ण प्रस्थापित कलाकार , विचारवंतांच्या ‘ ब्राह्मण सवर्ण माफिया कार्टेल’ ला विचारत आहेत , परंतु ‘झोपलेल्याला जागे करता येते परंतु झोपेचे सोंग करणाऱ्याला जागे करता येत नसते’ ह्याच शब्दशः प्रत्यतच आजपर्यंत बहुजनांच्या वाट्याला आला आहे . त्याच बरोबर बऱ्याच वेळेला बहुजनांच्या प्रश्नावर बोलताना, नाटक -सिनेमे करताना बहुजन कलाकार व्यक्तीस , विचारवंत यांना संधी न देता स्वतः सवर्ण असूनही त्यावर बोलणे हा सवर्ण समाजातील कलाकार आणि विचारवंतांचा ‘न निवडता नायकत्वाने घेतलेला नसता उद्व्याप’ नाही का ? असा प्रतिप्रश्न देखील बहुजन समाज ह्या ब्राह्मण सवर्ण पुरोगामी कलाकार आणि विचारवंतांना विचारतो .
अतुल पेठे हा प्रश्न आपल्या लेखात विचारतात की नाटक करणे , चित्रपट बनवणे ह्या सामाजिक , राजकीय , सांस्कृतिक प्रश्न विचारण्याच्या ‘सभ्य ’ जागा आहेत .आणि म्हणून अशा जागांचे रक्षण होणे गरजेचे आहे . आम्ही बहुजन कलाकार आणि विचारवंत सुद्धा त्यांच्या ह्या भूमिकेचे प्रत्येक समता , बंधुता , स्वातंत्र्य मानणाऱ्या नागरिकांसारखे समर्थन करत आलो आहोत आणि पुढेही करू . कारण ह्या लढाईत बहुजनांचे भविष्य डावावर लागलेले आहे याची आम्हाला इतरांपेक्षा जास्त स्पष्ट जाणीव आहे . हे जरी खरे असले तरी अशा जागा आज कोणत्याही प्रकारे ‘सभ्य’; नाहीत हे आम्ही अतुल पेठेंना स्पष्ठ सांगू इच्छितो . सिनेमे – नाटक यांच्या ज्या सांस्कृतिक जागांना अतुल पेठे ‘सभ्य’ म्हणतात त्यामध्ये ८० टक्क्यांहून जास्त असलेल्या बहुजन समाजास न्याय , सन्मानाचा समान हक्क, पैसे , सत्ता , प्रतिष्ठा , लोकप्रियता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य पिढ्यानपिढ्या नाकारण्यात आलेली आहे . ह्या क्षेत्रात आजही श्रमाची विभागणी ‘जातीआधारित’ आहे; ज्यात कष्टाची, किरकोळ स्वरूपाची आणि मोठ्या प्रमाणात असंघटित क्षेत्रातील तृतीय -चतुर्थ श्रेणीची कामे आजही बहुजन समाजातील माणसेच मोठ्या प्रमाणात करत आहेत. अश्या जागा सभ्य नसून जातीआधारित विषमतेवर उभ्या असलेल्या जातीय शोषण व्यवस्थेचे एक प्रकारे आर्थिक , सांस्कृतिक , राजकीय ‘PRISON INDUSTRIAL COMPLEX ‘ आहेत . ब्राह्मण सवर्ण प्रस्थापित उच्चजातीय ठराविक व्यक्तींच्या फायद्यासाठी ही व्यवस्था तुंबलेल्या गटारासाठी तशीच ठेवायची आणि अशा तुंबलेल्या आणि अन्यायाचा घाणेरडा वास असलेल्या जागांना सभ्य मानून अशा सभ्यतेचे जाडजूड साजूक कातडे पांघरून त्याच जागांपासून बहुजन समाजातील कलाकार , व्यक्ती ह्यांना पैसे , सत्ता , प्रतिष्ठा , संधी , सहभाग , अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारणे असले बनावटी धंदे ही सांस्कृतिक ब्राह्मण सवर्ण व्यवस्था आजही राजरोसपणे करत आहेत ; याबद्दल अतुल पेठे काहीच बोलत नाहीत . याबद्दल त्यांची संपूर्ण लेखात असलेली ‘CRIMINAL शांतता’ बहुजन कलाकार आणि समाज चांगलेच ओळखून आहेत . ‘अन्यायी कृतीपेक्षा अन्यायी शांतता माणसाचे माणूसपण जास्त हिरावून घेते’ हे जेष्ठ लेखिका ‘टोनी मोरीसन’ यांचे वाक्य इथे तंतोतंत लागू पडते .
अतुल पेठे म्हणतात की कुठल्याही सेन्सॉरशिपने प्रश्न सुटत नाहीत . पण ज्ञानप्रक्रिया बंद होते . हे बरोबरच आहे . ही भूमिका आम्ही बहुजन देखील मान्य करतो . परंतु बहुजन समाजावर सरकारी आणि सामाजिक , जातीय आणि सांस्कृतिक पद्धतीने होणाऱ्या हजारो वर्षांपासूनच्या सेन्सॉरशिपचा प्रश्न आम्हा बहुजन कलाकार , विचारवंत , तरुण , सामाजिक कार्यकर्त्यांना जास्त प्राधान्यक्रमाचा आणि महत्वाचा वाटतो . अशा पद्धतीने बहुजन समाजाची आणि पर्यायाने महाराष्ट्र आणि भारतातील सांस्कृतिक , कला , क्षेत्राची सवर्ण व्यवस्थेने नाकेबंदी केल्याने ह्या क्षेत्रातील ज्ञानप्रक्रिया हजारो वर्षांपासून बंदच आहेत . जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात -” भारतातील सवर्ण समाज हा जास्तीत जास्त शिकून ‘EDUCATED CLASS ‘ होऊ शकतो आणि त्याद्वारे जास्तीत नोकरी -धंदा करून जगू शकतो , किंवा बहुजन समाजाचे शोषण करू शकतो , परंतु तो खऱ्या अर्थाने ‘INTELLECTUAL CLASS ‘ बनून नवीन ज्ञान तयार करू शकत नाही आणि ते नवीन ज्ञान तयार करून तळागाळातील बहुजन समाजापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही . याचे कारण भारत आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक, शिक्षण ,समाज , राजकारण , अर्थव्यवस्था अजूनही जातिव्यवस्थेच्या मगरमिठीत अडकलेली आहे . यामध्ये नुकसान बहुजन समाजाचे आहे तसेच आमच्या सवर्ण बंधू भगिनी आणि कलाकारांचे देखील आहे . कारण सृजनशीलता आणि कलात्मक नावीन्य गमावलेली सवर्ण कला आणि सांस्कृतिक व्यवस्था ही आपल्या कलात्मक जाणीव , संवेदना , अनुभव विश्व , अभिव्यक्ती , सौंदर्यशास्त्र आपल्याच हाताने चिरडून एकसुरी , रटाळ , उथळ आणि , मुर्दाड बनवते . हे यामुळे देखील होते कारण गेल्या पिढ्यानपिढ्या सवर्ण समाजातीलच कलाकार आणि त्यांच्या सवर्ण जाणिवा , सवर्ण जीवनानुभव , सवर्ण संवेदना ह्या कलेच्या व्यवहारात अति वापरामुळे गुळगुळीत झाल्या आहेत . आणि त्यातील सृजनाची शक्यता मरणासन्न झाली आहे . याची आम्हा बहुजन कलाकार आणि विचारवंतांना पूर्ण कल्पना आहे .
अतुल पेठे आपल्या ह्याच लेखात अजून एक प्रश्न विचारतात . तो असा की -“ एखादे नाटक एखाद्या समाजव्यवस्थेला भीतीदायक वाटावे , असे खरोखरच असते का ? “ ह्या प्रश्नाला अधिक स्पष्ठपणे समजून घेण्यासाठी आपण उदाहरणाखातर महात्मा फुले , सावित्रीबाई फुले यांच्या जीवनांवर झालेल्या नाटके , सिनेमे आणि टीव्ही सिरीयलचा मागोवा घेऊयात , ज्यात अतुल पेठेंच्याच ‘सत्यशोधक ‘ ह्या नाटकाचा देखील समावेश होतो . 1950 च्या दशकात आचार्य अत्रे यांनी महात्मा फुलेंच्या जीवनावर चित्रपट काढला होता . त्या सिनेमाचे दिग्दर्शन आचार्य अत्रे , आणि महात्मा फुल्यांचे आणि सावित्रीबाईंचे काम अनुक्रमे ‘भालजी पेंढारकर’ आणि ‘सुलोचना दीदी’ यांनी केले होते . महत्वाचे म्हणजे ह्या सिनेमाच्या प्रारंभ समारंभासाठी खुद्द डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माई आंबेडकर हजर होते . इथे हे समजून घेतले पाहिजे की इथे सर्व निर्णय प्रक्रिया घेणारा दिग्दर्शक, निर्माता , आणि मुख्य कलाकार सवर्ण समाजातून येतात जे बहुजन समाजातील व्यक्तीची कामे करत आहेत . आज वर्ष २०२१ चालू आहे . परंतु , आजही महात्मा फुले , सावित्रीमाई फुले ह्यांच्या जीवनावर नाटके , सिनेमे , टीव्ही सिरीयल बनतात ; तेव्हा त्या नाटक , सिनेमा , टीव्ही सिरीयल मध्ये महात्मा फुले , सावित्रीमाइ फुले यांचे काम मोठ्या प्रमाणात सवर्ण कलाकारच करताना आपल्याला दिसत आहेत . इथे हे समजून घेणे गरजेचे आहे की महात्मा फुले , सावित्रीबाई फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या बहुजन नायकांच्या जीवनावर नाटक , सिनेमे , टीव्ही सिरीयल बनवताना त्या सेटवर तृतीय , चतुर्थ प्रकारचे काम करणारा , अंगमेहनतीची काम करणारा , किरकोळ काम करणारा श्रमिक कामगार आणि कलाकार हा अजूनही मोठ्या प्रमाणात बहुजन समाजातीलच आहे . परंतु अशा नाटक , सिनेमे , तांत्रिक विभाग , टीव्ही सिरीयल यांची निर्णय प्रक्रिया , आर्थिक गणिते , कास्टिंग एजन्ट , PRODUCTION HOUSE आणि चॅनेल हेड , फिल्म डिस्ट्रिब्युटर , निर्माते अजूनही मोठ्या प्रमाणात सवर्ण समाजातीलच आहेत, ज्यांची सामाजिक , सांस्कृतिक जाणीव आणि संवेदना ह्या बहुजन समाजाच्या जीवनानुभवाच्या पेक्षा वेगळे आणि कधी कधी बहुजन विरुद्ध असते . ही सर्व व्यवस्था अशा सवर्ण व्यक्तींच्या ताब्यात असल्याने अशा नाटक , सिनेमे आणि टीव्ही सिरीयल मधून महात्मा फुले , सावित्रीबाई फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा मोठ्या व्यक्तींचे खरे विद्रोही कार्य बहुजन समाजासमोर बहुजनांच्या न्याय हक्क , संधी आणि सहभागातून बहुजन समाजासमोर येत नाही . इथे देखील बहुजन समाजातील कलाकारांना डावलल्याचा आणि अवहेलना करून किरकोळ काम देऊन त्यांना बाजूला ढकलण्याचा सवर्ण कपटी धंदा केला जातो . त्यामुळे अशा महान बहुजन नायकांचे खरे स्वरूप समाजासमोर न येता त्यांचे तद्दन बाजारू गुळगुळीत ‘सांताक्लॉज’ सारखे निरुपद्रवी स्वरूप समाजासमोर आणले जाते . यात बहुजन समाजासमोर सवर्ण सामाजिक , राजकीय , आर्थिक , सांस्कृतिक , आर्थिक अन्यायकारी व्यवस्थेला लपवून तिचे विषारी खरे स्वरूप उघडे न करता फुले , आंबेडकरांचे ‘दैवतीकरण’ करण्याचा सवर्ण ब्राह्मणी कावा केला जातो . कारण सवर्ण व्यवस्थेला हे चांगलेच माहित आहे की कोणत्याही महान नेत्याचे विचार मारण्याचा सर्वात प्रभावी मार्ग त्याचे ‘दैवतीकरण’ करण्यात असतो . सवर्ण सांस्कृतिक सामाजिक व्यवस्था हा खेळ बहुजन समाजासोबत हजारो वर्षे खेळत आली आहे . मग ते बुद्ध असो , किंवा तुकाराम , कबीर , फुले , शाहू , आंबेडकर , शिवराय , बसवाप्पा असो . इथे आपला इतिहास मागील चुकांची पुन्हा एकदा पुनरावृत्ती करताना दिसून येतो .
एक बहुजन कलाकार म्हणून मला हा प्रश्न पडतो की 1950 च्या दशकात जेव्हा आचार्य अत्रे यांनी जेव्हा फुले दाम्पत्यावर सिनेमा तयार केला, तेव्हा कदाचित बहुजन समाजातील कलाकार पुरेश्या संख्येत चित्रपट सृष्टीत काम करत नसतील आणि म्हणून त्यांनी सवर्ण कलाकारांना मध्यवर्ती भूमिका दिली असेल , परंतु साधारण 80 वर्षांपेक्षा जास्त काळ महाराष्ट्र आणि भारतात उलटून गेल्यानंतर आणि मराठी नाटक आणि भारतीय सिनेमा सृष्टीला 100 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला असूनही आजही जेव्हा महात्मा फुले , डॉ आंबेडकर , सावित्रीमाई फुले यांसारख्या बहुजन नायकांच्या जीवनावर नाटक , सिनेमा , टीव्ही सिरीयल बनवली जाते त्यात बहुजन कलाकारांना मध्यवर्ती भूमिका नाकारून न्याय संधी , समान सहभागिता , अभिव्यक्ती नाकारली जाणार असेल आणि सिनेमा ,नाटक , टीव्ही क्षेत्रात जातीआधारितच शारीरिक श्रमाची , नफ्याची , संधीची , लोकप्रियतेची , प्रतिष्ठेची विभागणी होणार असेल तर ही अतिशय गंभीर समस्या आहे . इथे प्रश्न सवर्ण कलाकार बहुजन व्यक्तींचे काम करत आहेत हा जितका गंभीर प्रश्न आहे , त्याहुनही जास्त गंभीर समस्या ही आहे की ह्या क्षेत्रातील सवर्ण दिग्दर्शक , लेखक , निर्माते , कलाकार बहुजन समाजातील व्यक्तींना त्यांची न्याय संधी नाकारत आहेत . हे त्यांच्या मनातील थेट आणि सुप्त असलेल्या सवर्ण जातीयवादी ‘ब्राह्मणी सांस्कृतिक भांडवलवादाचे’ जिवंत उदाहरण आहे .
ह्या वास्तविकतेमधून आपण हे पाहू शकतो की आजही नाटक , सिनेमा , सांस्कृतिक माध्यमे , सांस्कृतिक राजकारण , अर्थकारण यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात जातीव्यवस्था आणि जातीय शोषण कसे व्यवस्थितपणे जिवंत ठेवले जाते , वाढवले आणि टिकवले जाते . हे यासाठी केले जाते जेणे करून सवर्ण , पुरोगामी तथागतीत तर्कवादी , विवेकवादी , बुद्धीप्रामाण्यवादी कलाकार , विचारवंत यांना आपली वैचारिक , सांस्कृतिक , आर्थिक कलात्मक कारकीर्द “ सामाजिक दृष्ट्या संवेदनशील कलाकार’ आणि सवर्ण असूनही ‘बहुजनवादी कलाकार ’ म्हणून करता येईल . परंतु पुन्हा ह्यामध्ये शोषण आणि नुकसान बहुजन समाजाचेच आहे . एवढी जातीय शोषणात्मक व्यवस्था नाटकाच्या , सिनेमाच्या क्षेत्रात कार्यरत असताना बहुजनांना अशी नाटके , सिनेमे , टीव्ही सिरीयल आपल्या जातीय दमन , शोषण आणि विषमतेची लटकलेली लक्तरेच वाटतात . ह्या सर्व स्थितीची बहुजन समाजाला प्रचंड किळस , राग आणि भीती एकत्रच वाटत असताना अनेक नाटकवाल्यांना अशी नाटके , सिनेमे रुपी ‘सवर्ण सांस्कृतिक BATCH PRODUCTS ‘ ‘उपद्रवहीन’ आणि ‘निरागस’ आणि ‘सभ्य’ वाटावी , ह्यातच त्यांची सवर्ण कलाकार म्हणून असलेली सवर्ण कलादृष्टी , सवर्ण जीवनदृष्टी दिसून येते . समाजाच्या ज्या रोगट व्यवस्थेबाबत अतुल पेठे विवेचन करत आहेत , त्यात ह्या सवर्ण राजकीय , सांस्कृतिक , कलात्मक , आर्थिक , बहुजन विरोधी व्यवस्थेचा खूप मोठा सहभाग आहे हे मांडताना कदाचित ते दुर्लक्ष करत असतील , पण आम्ही बहुजन कलाकार , विचारवंत बिलकुल कोणाचीही तम न बाळगता ह्या अन्यायी व्यवस्थेचे सडके स्वरूप उघडे -भोंगळे केल्याशिवाय राहणार नाही .
शेवटी अतुल पेठे आपल्या लेखात म्हणतात की “आम्हा कलाकारांचा रोख ‘विश्वाचे आर्त’ काय आहे , हे पाहण्याकडे असतो ”. मला इथे स्पष्ठ सांगावेसे वाटते की असा उथळ युक्तिवाद माझ्यासारख्या बहुजन कलाकारांनी अनेक तथाकथित सवर्ण पुरोगामी कलाकार आणि विचारवंतांकडून डझनांनी ऐकला आहे . इथे मला माझ्या बहुजन कलाकार आणि बहुजन समाजास स्पष्टपणे म्हणावे वाटते की, जेव्हा एखादा तथाकथित सवर्ण पुरोगामी अजातीय ? , समाजवादी , साम्यवादी , मार्क्सिस्ट-आंबेडकरवाडी कलाकार , विचारवंत असली ‘बौद्धिक मादुगिरी’ बहुजनांनाच देत असेल; तेव्हा तिथेच बहुजन कलाकार आणि बहुजन समाजाने आपल्या समोर छुपी सवर्ण , जातीयवादी व्यक्ती उभी आहे हे समजून घ्यावे . मुळात अशी माणसे असे कधीच म्हणत नाहीत की ते ‘बहुजन कलाकार’ आहेत . अशा कलाकारांना बहुजन असल्याचा कोणताही शिक्का आणि त्यासोबत येणारा कोणताही जातीय बट्टा / स्टिग्मा आपल्या अंगावर नको असतो . सत्य हेच आहे की त्यांच्याकडे बहुजनांसारखे जन्माला येणारे बहुजन सामाजिक , सांस्कृतिक , धार्मिक, राजकीय, ऐतिहासिक निम्न स्थान नाही . विश्वाचे आर्त शोधण्यासाठी अशा सवर्ण कलाकारांना फक्त एक ‘निरपेक्ष कलाकार’ बनायचे असते . परंतु बहुजन कलाकारांनी आपल्या समाजात फक्त ‘निरपेक्ष कलाकार’ म्हणून कितीही निरपेक्षपणे विश्वाचे आर्त शोधण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांच्या नावावरील बहुजन समाजातील असल्याचा जातीय कुरूप डाग जात नाही . आपला समाज हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहुजन कलाकारास नाकारतो . जे सवर्ण कलाकारांना हमखास मिळते . बहुजन असल्याची जातीय निम्नपणाची अंतर्गत जाणीव आणि अस्थिरता यशस्वी बहुजन कलाकारांनासुद्धा जन्मभर सतावते. त्यामागे थेट किंवा छुप्या पद्धतीने होणारा जातीभेद आहे . असा जातीयवाद सवर्ण कलाकारांच्या वाट्याला कधीच येत नाही .
हा मुद्दा समजून घेणे अतिशय गरजेचे आहे कारण बहुजनाच्या वाट्याला येणारा अपमान , अवहेलना , दुःख , यातना , त्यांच्या श्रमाच्या निम्नस्तरीय जाणिवेतूनच त्यांच्या नाविन्यपूर्ण कलेचा जन्म होतो . हे जसे अमेरिकेत काळ्या लोकांच्या JAZZ , BLUES , NIGRO SPIRITUALS , R & B , HIP -HOP च्या बाबतीत सत्य आहे . तसेच ते बहुजनांच्या लोकशाहिरी , भीमशाहिरी , भीमगीते , जात्यावरील गाणी , शेतातील गाणी , घाण्यावरील गाणी , मच्छिमारांची गाणी यांमध्ये तयार झालेली आपण पाहतो . यामुळेच बहुजनांच्या कलेत आणि सौंदर्याशास्त्रात प्रचंड विविधता दिसून येते; जी सवर्ण कलेत दिसून येत नाही . म्हणूनच सवर्ण सांस्कृतिक व्यवस्थेतील व्यक्तीस आपले सवर्ण सांस्कृतिक दिवाळखोरी लपवून ‘विश्वाचे आर्त शोधण्याचा’ ‘ द्राविडी प्राणायाम’ करावा लागतो . परंतु बहुजन समाजाला हे करण्याची काहीच गरज नाही . बहुजन कलाकारांनी आपली बहुजन सामाजिक , सांस्कृतिक , सौंदर्यशास्त्रीय आणि जीवनानुभवाची कास जरी प्रामाणिकपणे धरली तरी कलेच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सामाजिक , राजकीय , आर्थिक , सांस्कृतिक आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही . कबीरांच्या ‘तेरे पिंड में ही ब्रह्माण्ड हैं ” या विचारधारेचा हा व्यावहारिक जिवंत प्रत्यय आहे .
विश्वाचे आर्त शोधण्याचा दावा करणाऱ्या सवर्ण कलाकारांची अजून एक गोम अशी असते की, अशा कलाकारांना त्यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळे जीवनानुभव , सामाजिक , आर्थिक , राजकीय , सांस्कृतिक अनुभव आणि जाणीव असणारे बहुजन कलाकार जेव्हा आपल्या बहुजन सांस्कृतिक अस्मितेबद्दल , अनुभवाबद्दल स्वतःच्या जीभेने आणि स्वतःच्या शब्दाने आपले विचार मांडतात तेव्हा ते कसे संकुचित विचारांचे , एकांगी आहेत आणि कलाकार हा कसा फक्त ‘निरपेक्ष कलाकारच’ असतो, असे सुचवण्याचा मोह आवरत नाही . यातून अशा सवर्ण कलाकारांचा बहुजन समाज , बहुजन कलाकार , बहुजनांचे सांस्कृतिक , सामाजिक भावनाविश्व , जीवनानुभव असलेले संकुचित ज्ञानच समोर येते .
इथे मला कृष्णवर्णीय अमेरिकन समाजातील महत्वाचे लेखक, नाटककार, कवी आणि विचारवंत ‘लान्गस्टन हुजेस’ यांच्या ‘NIGRO ARTIST AND RACIAL MOUNTAIN’ ह्या महत्वपूर्ण निबंधाची आठवण येते . ते म्हणतात- “जे काळ्या रंगाचे कलाकार असा युक्तिवाद करतात की त्यांना फक्त कलाकारच बनायचे आहे , त्यांना मुळात सुप्तपणे श्वेतवर्णीय जाणिवेने आपल्यातील कलाकार आणि कलेचा चेहरामोहरा तयार करायचा असतो . असे कलाकार श्वेतवर्णीय कलात्मक जाणीव आणि सांस्कृतिक वर्णद्वेषाचे मानसिक आणि बौद्धिक गुलामच असतात” . त्याचप्रमाणे बहुजन समाज , बहुजन कलाकार , बहुजन समाजाची सांस्कृतिक कलात्मक अभिव्यक्ती दमन करणाऱ्या सवर्ण , सांस्कृतिक , आर्थिक , राजकीय व्यवस्थेतील व्यक्ती जेव्हा ‘कलाकार ‘ म्हणून विश्वाचे आर्त शोधण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्या आतील छुप्या बहुजन विऱोधी “सवर्ण स्व” लाच ते खतपाणी घालत असतात . कारण असे सवर्ण कलाकार हे विसरतात की भारतातील सांस्कृतिक, सामाजिक दमणकारी व्यवस्था ‘विश्वाचे आर्त’ शोधण्याचा अधिकार फक्त सवर्ण कलाकारांनाच देते . म्हणून असे सवर्ण कलाकार वेळ पडल्यास विश्वाचे आर्त शोधण्यासाठी महात्मा फुले , डॉ बाबासाहेब आंबेड्करच काय; पण मातंग , वाल्मिकी , घिसाडी , डक्कलवार , तेली , खाटीक , राज नट , नट , कंजर अश्या बहुजन जातीतील व्यक्ती देखील बनू शकतात . पण बहुजन कलाकारांना मात्र सवर्ण सांस्कृतिक क्षेत्रात सन्मानाची समान हक्काची जागा , संधी , प्रतिष्ठा नाकारली जाते . इथे सवर्ण सांस्कृतिक व्यवस्था कोणत्याही कलेच्या मुळाशी असलेल्या सर्वात महत्वाच्या “सामाजिक न्यायाच्या’ तत्वाशी ‘ बेईमानी करते . म्हणूनच अशी व्यवस्था सवर्ण कलाकारांकडून बहुजनांच्या सांस्कृतिक भाषिक , साहित्यिक , सांस्कृतिक प्रतीकांची चोरी (CULTURAL APPROPRIATION , CULTURAL PLAGIARISM ) करते, परंतु बहुजन कलाकारांनाच त्यांचा न्याय संधी , कलात्मक अभिव्यक्ती , आर्थिक नफा , प्रतिष्ठा , निर्णय प्रक्रियेत समान स्थान नाकारते . म्हणूनच कट्टरतावाद्यांच्या हल्ल्याला वैचारिक , तात्वीक , सात्विक , विरोध करणारे सवर्ण पुरोगामी कलाकार, विचारवंत हे बहुजन कलाकार आणि बहुजन समाजाच्या डोक्यावरचे खऱ्या अर्थाने ‘प्रतिगामी जातीयवादी डोंगर’ आहेत .
काही महिन्यापूर्वी संपूर्ण जगाने बघितले की अमेरिकेमध्ये एका गोऱ्या पोलिसाने ‘जॉर्ज फ्लॉइड’ ह्या काळ्या माणसाच्या गळ्यावर आपला गुडघा दाबून त्याला गुदमरून मारून टाकले . हे घडत असताना जॉर्ज फ्लॉइड जिवाच्या आकांताने “I CANT BREATH …I CANT BREATH ‘ ओरडत जिवाच्या आकांताने श्वास घेण्यासाठी संघर्ष करत होता . परंतु त्या गोऱ्या पोलिसांचे मन काही स्रवले नाही . तो मात्र आपण पोलीस असून जॉर्ज फ्लॉइड हा काळा माणूस असल्याने कमी महत्वाचा असल्याने आपण जे करत आहोत तेच योग्य आहे ह्या अविर्भावात जॉर्ज फ्लॉइडकडे दुर्लक्ष करत आपले काम पोलिसी खाक्याने करत होता . त्यामुळे सगळ्यांसमोर जॉर्ज फ्लॉइड गुदमरून मेला . आज आमच्या बहुजन समाज आणि त्यातील कलाकारांची स्थिती जॉर्ज फ्लॉइड सारखी झाली आहे . फरक एवढाच आहे कि, आमच्या मानेवर एका बाजूला धार्मीक कट्टरतावाद्यांचा गुडघा आहे; तर दुसरीकडे तथागतीत पुरोगामी म्हणवणाऱ्या ‘बहुजन विरोधी’ सवर्ण सांस्कृतिक ,आर्थिक, राजकीय व्यवस्थेचा गुडघा देखील आमच्या मानेवर आहे . यातून आमची दोन्ही बाजूने घुसमट होत असून आम्ही देखील जॉर्ज फ्लॉइड सारखे “WE CANT BREATH …WE CANT BREATH ” असे जिवाच्या आकांताने ओरडत आहोत . यातून ह्या अन्यायी दमनकारी व्यवस्थेचे मन परिवर्तन व्हावे एवढीच आमची अपेक्षा आहे . आणि ते जर होणार नसेल तर एक गोष्ट नक्की की, आम्ही जॉर्ज फ्लॉइड सारखे गुदमरून मारणार नाही . उलट ह्या अन्यायकारी दमनकारी व्यवस्थेचे हे दोन्ही पाय आम्ही गुडघ्यापासून कापल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
कारण माल्कम – एक्स प्रमाणे बहुजनांची आजची तरुण पिढी हे चांगलेच ओळखते की –
” WE DIDNT LAND ON PLYMOUTH ROCK … PLYMOUTH ROCK HAS LANDED ON US ”
आनंद क्षीरसागर
लेखक M.Sc.(Microbiology), M.A.(Dev. studies TISS, Mumbai) असून नाट्य कलावंत आहेत, तसेच ते बहूरंग या बहुजन सांस्कृतिक मंचाचे संस्थापक आहेत, तसेच तुंबरु ह्या Hip-hop शी संबधित फोरम चे संस्थापक आहेत. ते बहुजनांच्या, आणि मुख्यतः ओबीसींच्या आर्थिक,सामाजिक, सांस्कतिक प्रश्नांवर काम करत आहेत.
- ओबीसी समाजाचे ‘राजकीय प्रशिक्षण’ – काळाची गरज - September 9, 2021
- चिरेबंदीवाड्यातबहुजनांचा‘मांगीर’ - March 28, 2021
- ओबीसी जातीय जनगणनेचे क्रमांक एकचे शत्रू कोण? - March 25, 2021
Well written anand
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांमध्ये सुद्धा हेच तंतोतंत लागू होते. NGO, स्त्रियांच्या चळवळी येथेही हा सवर्ण ब्राह्मण पुरोगामी डाव नक्कीच पाहायला मिळतो.