सुरेखा पैठणे
कित्येक शतके उलटली तरी ह्या पवित्र भारतभूमीवर अस्पृश्य आणि स्त्रिया यांची गणती माणसात होत नव्हती. किडा मुंगीला साखर घालणारा हा धर्म, पशु पक्ष्यानं दाणे घालणारा हा धर्म, पाण्यावर जातीची अन धर्माची वेटोळे घालून बसला होता. ‘पाणी वाढ वो माय’ म्हणत अस्पृश्य म्हणवल्या जाणाऱ्या अठरापगड जातीतील (केवळ महार नव्हे) माणसं पोर पाणी ह्या मूलभूत गरजेसाठी दयाळू धर्माकडे याचना करीत राहिले पण कोणाच्याही ह्रदयाला पाझर फुटला नाही.
बोलके समाजसुधारक हि स्वतःच्या धर्माच्या ह्या अभेद्य उतरंडीला हात लावू शकले नाही. गावखेड्याच्या वेशी वेशीवर हि अमानुष जातव्यवस्था अभेद्य आणि बळकट झाली होती. बहिष्कार आणि जातपंचायत हे तिचे हत्यार होते. हा कुठला राग होता, हा कसला द्वेष होता हिंदू म्हणवल्या जाणाऱ्या तुमच्या हाडामाणसाच्या माणसावर तुम्ही पिढ्यान पिढ्या धर्म सांगतो म्हणून अत्याचार करीत राहिलात. एकेका गावाची रचनाच प्रचंड द्वेषमूलक तत्वावर उभी केली होती. गावातील विहिरी, पाणवठे जातीनुसार खुले होते. ज्याठिकाणी मोकाट गुरे ढोरे बिनदिक्कत पाणी घेऊ शकत होती त्याठिकाणी अस्पृश्य व्यक्ती गेला तर पाणी बाटत होते.
आजही छाती दडपते हा इतिहास आठवला कि,राज्य येतात आणि उलटतातही, जेत्यांची संस्कृती जितांवर लादली जाते हे मान्य, हारलेले राज्य जेते राजाची गुलाम होते हेही कबूल परंतू जिंकणारा हारणाऱ्या प्रजेच्या कित्येक पिढ्यांच्या पाठीचा कणाच मोडतो हे समजत नाही। आणि तेही ठराविक जातसमूहाच्याबाबतीत. ज्या रस्त्यावर सवर्ण समाज चालतो त्या रस्त्यावरून दलित समूहाने चालायचं नाही, आणि गेलाच कोणी तर आपली पाऊले उमटू द्यायची नाही , उमटलयास धर्म बुडायचा. आपल्याच मातृभूमीवर आपल्याच पाऊलखुणा आपल्याच हाताने पुसायला सांगणारी हि कसली धर्मव्यवस्था. कट्टर म्हणविल्या जाणाऱ्या धर्माच्या दलित समूहावर असणाऱ्या निर्बंधाची मालिका आज जर जाहीरपणे वाचायला घेतली न तर लोक म्हणतील जुन उकरून काढण्यात काय हशील आहे आता तर हे नाही न.
महात्मा ज्योतिबा फुलेंनी ह्या अमानुष प्रथेविरुद्ध पहिल्यांदा दंड ठोकले अन आपला हौद सागळ्यांकरिता खुला करून दिला. त्याच साखळीचे कड जोडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाड येथील पाण्याला स्पर्श करून ते तळे महार मांगाकरिता खुले करून दिले. ऑगस्ट 1923 माध्यच बॉम्बे लीगल कौन्सिल ने ठराव पास करून सार्वजनिक पाणवठे, आणि सरकारी जागा दलितांकरिता खुल्या केल्या होत्या परंतु ह्याची अमलबजावणी सवर्ण समाज होऊ देत नव्हता. तेव्हा 1927 मध्ये बाबासाहेबांनी यासाठी चळवळ उभी केली आणि हि चळवळ कोणत्याही स्वातंत्र्य चळवळी इतकीच महत्वाची होती, कारण माणसाला माणुसकीचे किमान हक्क मिळावेत ह्याची ती चळवळ होती. पाणी ह्या मूलभूत घटकासाठी तो सत्याग्रह होता. जिथे गुरे ढोरे प्यायल्याने पाणि अपवित्र होत नव्हते परंतु अस्पृश्यांची सावली तरी पडली तरी पाणी बाटत होते अश्या अमानुष धर्मसत्तेविरुद्ध हि चळवळ होती.
पाण्याच्या ह्या संग्रामाने कित्येक शतके कणाविहीन जगणाऱ्या समाजाला कणा मिळऊन दिला तर , कित्येक शतके मनमानी करणाऱ्या अमानुष आणि क्रूर धर्मसत्तेला हादरा दिला।
सुरेखा पैठणे
लेखिका कल्याण – उल्हासनगर येथे वास्तव्यास असून त्या कवयित्री /वक्ता /निवेदिकाआहेत.
- बाबासाहेबांची प्रिय रामू, आमची रमाई! - May 27, 2021
- तेव्हा सखे सप्रेम जयभीम! - April 13, 2021
- महाडचा संगर केवळ पाण्यासाठी नव्हे तर मूलभूत मानवी हक्कांचा संगर - March 20, 2021
👌👌👍👍ताई