मिनल शेंडे
महिलांना महिला म्हणून सगड्याच अधिकार आणि हक्कांसाठी सतत लढा द्यावा लागला हे जागतिक महिला दिनाचा इतिहास आठवन करुन देतो. मतदान, समान वेतन, स्वत:ची मालमत्ता, मुलांच्या संगोपनासाठी सुट्य्या, शिक्षण घेण्यापासून ते सामाजिक, राजकीय, आर्थिक सगड्याच पातळीवर, जागतिक स्तरावर त्यांचे हक्क प्रगत करण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्याची आठवण करून देतो. महिला दिन हा जागतिक कार्यक्रम आहे जो महिलांच्या उपलब्धी, संघर्ष आणि लैंगिक समानतेसाठी सुरू असलेल्या लढ्याचा उत्सव साजरा करतो. वेगवेगळ्या देशात पुरुषप्रधान व्यवस्थेच्या विरोधात मुद्दे वेगवेगळे असले तरीही ते जागतिक पातळीवरील संवेदनशील आणि अत्यंत महत्वपूर्ण विषय आहेत, हे नाकारता येणार नाही. महिला म्हणून जगात तिच्या समोरील आव्हाने सारखीच आहेत.
स्त्री ही घडवली जाते
प्रसिध्द लेखिका ‘सिमोन द बोव्हुआर’ म्हणतात, “स्त्री ही जन्मत नाही, तर ती घडवली जाते. समाज जे गुणविशेष स्त्री मध्ये गृहित धरतो, त्यांतील फारच थोडे प्रत्येक स्त्रीमध्ये निसर्गत: असतात. स्त्रीची बहुसंख्य वैशिष्ट्ये ही समाजाने तिच्यामध्ये जबरदस्ती रुजवलेली असतात”. मुलींना लहान पणापासूनच आदर्श स्त्री (मुलगी, पत्नी, सून) चे धडे घरातूनच दिले जातात. पुरुषांच्या बाबतीत मात्र तस नसते. मुला-मुलींना लिंगभेदानुसार वाढवल जाते. मुलीने जोरात हसू नये, घरातील सर्व कामे मुलींनी तर बाहेरची कामे मुलांनी, शिक्षण देतांनाही कुठले विषय घ्यायचे यातही आधी मुलाला प्राथमिकता नंतर मुलीला, नवऱ्यानी बायकांवर हात उचलणे म्हणजे सहज, पण बाईने शिव्या देणे म्हणजे बापरे! बहुदा मुलीने आकर्षक दिसावे असं दडपण तिच्यावर असते. तर लांब केस म्हणजे तिच्या सुंदरतेत भर पाडणे, किती वाजता घरी यायचे, कपडे कोणते घालायचे, काय खेळायचे, अशी अनेक कडक निर्बंध आपण घरात, समाजात बघत बघत मोठे झालेले आहोत. आता मात्र अनेक देशांमध्ये परिस्थिति सुधारत आहे. आईवडिल मुलींच्या विकासासाठी धडपडताना दिसतात. चित्र असे असले तरीही मुलींकडून स्वकर्तृत्व चमकावून दाखवण्याबरोबर तिने नोकरी, कुटूंब, घर सगडच तिला सांभाळता यायला पाहिजे अस सतत सांगितल जाते. यासाठी समाजातील काही महिलांनी सगड कसं उत्तम सांभाळल याचे दाखले दिले जातात.
स्त्री: म्हणजे पुरुषाच्या सुखाचे साधन
मानवी जन्म श्रेष्ठ असे म्हटले जाते पण पुरुष जन्म कसा श्रेष्ठ हे सांगणारे ‘नरत्वं दुलभं लोके’ या अर्थाची अनेक सुभाषित प्राचीन परंपरेत आढळतात. म्हणजे नरजन्म श्रेष्ठ आहे. पूर्वजन्माच्या पुण्याईने, भाग्याने पुरुषजन्म प्राप्त होतो. तेव्हा त्याच्या सुखाचे एक साधन म्हणूनच स्त्रीकडे बघितलं गेलं. त्याच्यामुळे नवर्याच्या सुखातच आपलं आयुष्य आहे असं सांगणारे आजी, आई, पुरुषाला बायकोच्या सुखात आपलं आयुष्य आहे हे सांगतांना दिसत नाही याच नवल वाटत नाही. एवढचं नाही तर महिलेने मुलालाच जन्म द्यावा यासाठी अनेक संस्कार विधि ऋषीं मुनींनी धर्मग्रंथात सांगितली आहेत.
महिलाचं आयुष्य नवर्याला खुष ठेवण्यासाठी आहे, संसार हा कितीही कष्टमय, सहन न करणार, वा नवरा दारुडा, मारहान करणारा असला तरीही स्त्री म्हणजे त्यागाची मुर्ती ! सहनशीलता या गोंडस शब्दाच्या नावाखाली तिची पिळवणूकच झाली आहे.
मेरी वोल्स्टनक्राफ्ट म्हणतात त्यानूसार, ‘A Vindication of the Rights of Woman (1792)’ स्त्रीचे शिक्षण आणि घडण मुळातच पुरुषी वर्चस्व जपण्याचा विचार करूनच केली जाते. त्यामुळे पुरूषांना काय आवडते हे ‘संस्कार’ या नावाखाली तिच्या मनावर ठसविले जाते, पण स्वतःला मनापासून काय आवडते, ते ठरवून निर्णय घेण्याची सोडाच, त्याचा नुसता विचार करण्याची कुवतही ती गमावून बसते. शिक्षण, काम आणि राजकारणात महिला आणि पुरुषांना समान संधी द्याव्यात असा प्रस्ताव मांडला. मुळात 1792 सालात असे विचार मांडणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखे होते. या परखड आणि धाडसी विचारांमुळे मेरीला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते.
भारतीय स्त्रियांचे उध्दारक
भारताच्या इतिहासात डोकावून पाहतांना याज्ञवल्क्य, वाल्मीकि, भृगू, इतर अनेक ॠषींनी शास्त्र निर्माण करुन ठेवली आहेत. त्यात पितृसत्ता टिकवून ठेवण्यासाठी मृत्यु च्या दारी जीवंतपणी स्त्रियांना ढकलून दिलं होत. प्राचीन काळात तथागत गौतम बुध्दांनी स्त्रियांना भिक्खूणी म्हणून संघात प्रवेश दिला आणि मुक्तीचा मार्ग खुला केला. ‘थेरीगाथा’ मधे मुक्ता नावाची मुलगी भिक्खूणी झाल्यानंतर ती आनंदाने म्हणते “अहाहा ! मी खरोखरच स्वतंत्र आहे”.
एकोणीसाव्या शतकात जगभरातील स्त्रीवादी चळवळीने जोर धरला होता. त्याचवेळी भारतातही अनेक समाजसुधारकांनी स्त्रीवर होणा-या अन्यायाला वाचा फोडली. स्त्री शिक्षण, स्त्री हक्क आणि सामाजिक सुधारनांसाठी चळवळी कार्य करीत होते. महात्मा फुले –सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची दारे उघडली. केशवपन, सत्यशोधक विवाह, शेतकऱ्यांचेशिक्षण, दुष्काळात लोकांसाठी अन्नछत्रे, बालहत्या प्रतिबंधक गृह,
मोफत शिक्षण देणे अशा अनेक सुधारणा वादी कार्य त्यानी केले. महर्षि कर्वे यांनी विधवा पुनर्विवाह घडवून आणला. देवदासी प्रथा संपूर्ण बंद केली आणि महिलांसाठी अनाथाश्रम महिलाविद्यालय सुरु केले. राजाराममोहन राय यांनी सतीप्रथेविरुध्द चळवळ विरुद्ध चळवळ उभी केली. रमाबाई रानडे यांनी स्त्रीयांचे हक्क, शिक्षण यासाठी कार्य केले होते. रघुनाथ धोंडो कर्वे यांनी समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन व लैंगिक शिक्षण यांविषयी केलेले लोकांचे मत-विचार प्रबोधन, प्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य फार मोलाचे आहे. ज्या काळात संततिनियमनाविषयी साधा उच्चारही करणे निषिद्ध मानले जायचे, त्या काळात रघुनाथरावांनी या विषयाचा प्रचार करून जनजागृती घडवून आणण्याचे एतिहासिक कार्य केले. स्त्री उध्दारक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीयांना निकृष्ट दर्जा देणारी मनुस्मृति चे दहन केल. हिंदू कोड बिल मांडून स्त्री मुक्ति ची मुहुर्तमेढ रोवली. या हिंदू कोड बिलाला सनात्यांनी प्रखर विरोध केला होता. भारतदेशाच्या संविधानात बाबासाहेबांनी समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय ही मानवी मूल्ये समाविष्ट करुन मनुष्याला सन्मानाने जीवन जगण्याची व्यवस्था निर्माण केली.
पुरुषप्रधान संस्कृतिमधील ढोंगबाजी
मनुस्मृति नुसार ‘दहा उपाध्यायांपेक्षा एक आचार्य, शंभर आचार्यांपेक्षा एक पिता आणि हजार पित्यांपेक्षा एक माता श्रेष्ठ असते. आणि मातेसारखा दुसरा गुरु नाही असे महाभारताच्या शांतिपर्वात म्हटले आहे. स्त्री ची अशी स्तुति केली आहे आणि दुसरीकडे सर्वच अधिकारापासून स्त्रीला वंचित ठेवल आहे. स्त्रीने पती, पिता, पुत्राच्या अधीन राहवं. तीने कधीही स्वतंत्र राहू नये असे अनेक नियम लादून दिले आहेत.
आ.ह.साळूंखे म्हणतात त्यानूसार, हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीच्या पतिव्रत्याचे फार गोडवे गाण्यात आले आहेत. पण पतिव्रत्याला उत्कट प्रतिसाद म्हणून पुरुषाच्या ठिकाणी पत्नीव्रताची अपेक्षा मात्र आढळत नाही. हे पतिव्रत्य मालक-नोकर, प्रभु-दासी अशा संबंधावर आधारलेले आहे. ते गुलामगिरीला, वेठबिगारीला जोपासणारे पातिव्रत्य आहे. एकतर्फी निष्ठा सांगणार्या पतिव्रताच्या संकल्पनेवर चार्वाक ने कडाडून हल्ला चढविला तो म्हणतो, “पतिव्रत्य वगैरे संकेत धूर्त व दुबळ्या पुरुषांनी निर्माण केले आहेत”. सकृद्दर्शनी चमत्कारिक वाटणार्या या विधानामधे गंभीर सत्य लपलेले आहे. एकतर्फी पतिव्रत्य नाकारणे म्हणजे व्यभिचाराचे समर्थन करने नव्हे, तर गुलामगिरी नाकारने होय, हेही मुद्दाम ध्यानात घेतले पाहिजे. आपण कमी तर पडत नाही ना, अशी एक दुबळेपणाची, मत्सराची व न्यूनगंडाची भावना पुरुषाच्या मनात असते आणि त्या भावनेपोटी तो स्त्रीवर गुलामगिरी लादतो. हे पतिव्रत्याच्या नावाखाली तो अक्कल हुशारीने करतो. अर्थात स्त्रियांच्या मनामध्येही आपण कमी पडू काय आणि आपला पती दुसरया स्त्रीकडे आकृष्ट होईल काय, अशी दुर्बलतेची भावना असतेच. पण त्या भावनेपोटी त्या पुरुषांवर गुलामगिरी लादू शकत नाहीत. हा फार मोठा फरक आहे.
पितृव्यवस्थेला मानणारे पुरुष आणि महिला
भंडारा येथे खोकरला या ठिकाणी ३ जानेवारी २०२४ ला सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मी वक्ता म्हणून उपस्थित होते. मी माझ्या प्रवचनात बोलतांना असा मुद्दा मांडला की, ज्या महिलांना काही कारणांमुळे बाळ होत नाही तेव्हा नको तेवढ ईलाज करुन स्वत:चे हाल करुन घेतांना दिसतात, महिला डिप्रेशन मधे जातात, यापेक्षा बाळ दत्तक घेण्याचा विचार का करत नाही. ज्याच्यात मातृत्व असेल असा कोणीही मग ती स्त्री, पुरुष, पारलींगी, प्रत्येक व्यक्ति ही बाळाला आईपण देऊ शकते. उत्तम संगोपन करु शकते. आपल्या लेकरांच्या मनात लहान पणापासून समता, स्वाभिमान, देशप्रेम, बंधुभाव बीज पेरले पाहिजे. सावित्रीबाई नी केवळ दत्तक मुलाच संगोपन केलं नाही तर करोडो लोकांची आई झाली.
पण माझ्या सोबत मंचावर उपस्थित पुरुष वक्त्यांनी उत्तर म्हणून ते त्यांच्या भाषणात म्हणाले की, “स्त्री जो पर्यंत बाळाला जन्म देत नाही, तो पर्यंत तीला स्त्रीत्व प्राप्त होत नाही”. ह्या वाक्याने मला अंत:करणातून हलवून टाकलं. मी एकही क्षण न घालवता त्यांना मंचावरच बोलले की मग सावित्रीबाई ना स्त्रीत्व प्राप्त नाही का? ते माईकवर बोलले तो वादाचा मुद्दा आहे. आणि चक्क त्यांनी माझ्या प्रश्नाला टाळलं. पुढे ते बोलले “बायांनो तुम्ही मुर्ख आहात”. बाई म्हणजे संसाराच्या गाडीचं मागचच चाक असते पुढचं चाक पुरुष असते. या वक्तव्यावर त्यांच्याशी चर्चा करावी म्हणून कार्यक्रम झाल्यावर मी बोलण्यास पुढाकार घेतला. पण काय म्हणाव त्यांच्या अहंकाराणे मला बोलूच दिल नाही. एकतर मी मुलगी त्यात वयाने त्यांच्यापेक्षा लहान. ते जे बोलले तेच बरोबर बाकी शून्य अस चित्र होतं.
एवढच पुरेस नव्हतं माझ्यासाठी तर अध्यक्ष म्हणून आलेल्या बाई तरी स्त्रियांच्या हिताचं बोलतील अस वाटल, पण त्यांनीही “स्त्रियांनी स्वतःच्या गर्भात बाळ वाढविल्याशिवाय आईपण अनुभव घेता येत नाही”. “नवर्याने एक थापड मारली तर घर सोडून माहेरी जाऊ नये”. असा दुजोरा दिला. दोन्ही वक्ताच बोलनं हे पितृव्यवस्थेला खतपाणी देणारं होतं हे भयानक आहे. हे सोडलं तर दोघांनीही आपल्या वक्तव्यात ते ज्या प्रतिष्ठित पदावर आहेत आणि त्यांनी तिथून समाजासाठी काय काम केलं. ते सांगितल. त्याबद्दल त्यांचे आभारी आहे.
वृत्तपत्रात कार्यक्रमाची बातमी देण्यासाठी महोदयांनी मी जे बोललेच नाही ते वाक्य माझ्या नावासमोर लिहीली. मग मात्र मी सरळ एका सरांना फोन केला. जे बातमी वृत्तपत्रात देणार होते. त्यांना आधी विचारलं, “सर, तुम्ही कार्यक्रमाला हजर होते का?” ”नाही” असं समोरुन उत्तर आल्यावर त्यांना घडलेला प्रसंग सांगितलं आणि सरळ म्हटलं मी जे बोलले त्याची रिकॉर्डींग माझ्याकडे आहे. हवं तर ऐका, पण न बोललेले वाक्य जर छापले गेले तर मात्र मी त्त्यांच्या विरोधात कार्यवाही करणार आणि त्यांनी मान्य केलं.
या घटनेची आठवण होते तेव्हा वाटत की, महिलांप्रती बंधने घालणारे, स्त्रीचं अस्तित्व नाकारणार, त्यांचं अपमान करणाऱ्या स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या चळवळीतील त्या वक्त्यांना जाबं विचारावं अस उपस्थित तीनशे चारशे महिला श्रोत्या मधून एका ही महिलेला वाटलं नाही. ही शोकांतिका आहे.
भीती वाटायला लागली भारतासारख्या देशात जगतांना धर्म, जात, लिंगभेद, बेरोजगारी, गरिबी, शिक्षण, बलात्कार, मुलीच्या लग्नात हुंडा देणे, अंधश्रद्धा अनेक आव्हानांना रोजच पुढे जात असतांना समाजात पितृसत्ता व्यवस्थेचा पुरस्कार करणारे लोक पावलापावलावर भेटतात त्यात फुले शाहू आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आहेत तर मग सगड पाण्यात दिसत.
आम्ही : गुलामिकडे की विज्ञानाकडे
आजही या देशात मुली प्रगती करीत असल्या तरी परंपरेने चालत आलेल्या रुढ़ी, प्रथा, परंपरा त्यांची प्रगती खुंटवू पाहते. ज्या मंदिरात देवी, देवांच्या मुर्तींना महिला हात लावू शकत नाही. महिलांची मासिक पाळी ज्यातून मनुष्यांची निर्मिती होते तिला विटाळ म्हणून आजही बघितले जाते. त्यांची पुजा आपण का करावी हा प्रश्न महिलांनी विचारावा. लग्न असतांना सगडे लग्नाचे प्रतीक म्हणून मंगळसुत्र, सिंदूर, जोडवे मुलगीच का घालते असा प्रश्न उच्च शिक्षित तरुणांना ही नाही पडला तर मग शिक्षणाचा उपयोग नोकरी, पैसा आणि प्रतिष्ठा ऐशोआराम इतका सिमित अर्थ घेतलेला वाटतो. पुरुष वर्ग जर कुठल्याही प्रकारचे प्रतीक न घालता लग्न होवून ही राहू शकतात. तर महिला वर्ग का नाही ? आपल्याकडे बाळाच्या जन्मापासून कर्मकांड, अधंश्रध्दा सुरु होते. बाळाच्या जन्मानंतर आई व बाळाला जोडणारी नाळ कापून टाकली जाते. आणि बाळाला दृष्ट नाही लागावी म्हणून काळा दोरा हात, पाय, कंबरलेला बांधून दिलं जात. यावर मी प्रश्न विचारला बाळ हे आई आणि बाबा दोघांच ही आहे मग ही प्रथा महिलांसाठीच का? आणि हे करण्यामागे वैज्ञानिक कारण आहे का?
अंधश्रद्धा हे व्यक्तीच्या कर्तुत्वापेक्षा दैवी शक्तीवर विश्वास घट्ट करते. माझ्या एका मित्राने मला सांगीतलं, त्याला सरकारी नोकरी लागली ती त्याने केलेल्या अभ्यासामुळे नाही तर त्याच्या आईने खूप पूजा पाठ उपवास केले त्यामुळे नोकरी लागली असे त्याच्या आईला वाटते. मंगळ मुळ नक्षत्र, ग्रहांची शांती, शनीची साडे साती या सगळ्यापायी व्यक्तीचे प्रचंड आर्थिक शारीरिक भावनिक नुकसान तर होतेच पण वक्तीमत्व ही दुबळ बनतं.
संत कबीर, पेरियार, संत गाडगेबाबा यांनी आपल्यासारखं शाळेतील शिक्षण न घेता समाजात मोठी क्रांती घडवून आणली. महामानवांचा संघर्ष हा अंधश्रद्धा, शोषण, गुलामी, असमानता विरुद्ध बंड होता. मग आपल्या शिक्षणाचा उपयोग आपण कशासाठी करत आहोत हे विचारायला पाहिजे.
पितृव्यवस्था : स्त्री-पुरुषांसाठी हानिकारक
पितृव्यवस्थेच्या विरोध करणे म्हणजे पुरुषांच्या विरोधात उभे राहणे असा नाही किंवा मातृसत्ता व्यवस्थेला आणणे नसून समतेसाठी आग्रह आहे हे लक्षात घेतले पाहिजे. कारण यात पितृसत्ता व्यवस्थेला मानणाऱ्या महिला सुध्दा आहेत. ते मी वर सांगितलेल्या अनुभवावरुन लक्षात आल असेल. तेव्हा हा विरोध असमानतेचा आहे. या व्यवस्थेने महिलांच जेवढं शोषण केलं तेवढच पुरुष वर्गाला अमानवी, हिंसात्मक बनण्यास प्रवृत्त केलं. हे फार भयंकर आहे. याने पूर्ण मानवजातिच नुकसान आहे. पितृव्यवस्था ही स्त्री पुरुष दोघांचही आयुष्य बरबाद करत आहे. एका दादांची आई मरण पावली तेव्हा पुण्यानुमोदन च्या कार्यक्रमात ते खुप रडले आणि मला शेअर केलं की पुरुष आहो म्हणून रडत नव्हतो रडन दाबून ठेवत होतो पण मी ही व्यक्ति आहे मला ही आईप्रती भावना दाटून आल्या. असे अनेक अनुभव आहेत. पुरुषांना एखाद्या गोष्ठीमुळे भीती वाटू शकते हे ही सांगता येत नाही. पुरुष म्हणूनच ते श्रेष्ठ आहेत असा समज करुन त्यांना महिलांकडून आधार घेण्यात कमीपणा वाटतो. यातून आलेला एकाकीपणा. मुलगी बेरोजगार असली तरी लग्न करु शकते पण पुरुष बेरोजगार असेल तर त्याच्यावर बेरोजगारचा दबाव हा मुलीपेक्षा जास्त असतो. लग्नासाठी मुलगा मुलीपेक्षा जास्त पैसा कमावणारा असावा अश्या सामाजिक दबावाची तर चर्चाच नको.
स्त्रीवादी आंदोलने म्हणजे समतेचा आग्रह.
हल्ली मुलींनी मुलांसारखे धिटाईने गांजा पिणे, दारू पिणे, सिगरेट ओढणे अश्या प्रकाराचे मादक पदार्थांचे सेवन करणे, किंवा पुरुषा प्रमाणे गुंडगिरी करणे वा फ्री सेक्स चा पुरस्कार करणे म्हणजे स्त्रीवादी असा अर्थ घेतला जात आहे. मला सांगा जेव्हा कित्येक संसार व्यसनामुळे उध्वस्त झाली तेव्हा दारुबंदी, व्यसन मुक्ति केंद्रांची निर्मिती झाली आहेत. मुलींनी अश्या प्रकारे पुरुषांशी प्रतिस्पर्धा करुन काय सिध्द करावं. जेव्हा हे व्यसन पुरुषांच्या स्वास्थ्य साठी जेवढं हानिकारक आहे तेवढच ते महिलांसाठी, प्रत्येक व्यक्तिसाठी हानिकारक आहे. फक्त पुरुष वर्ग महिलांना कमी समजत अस नाही तर अशा ही महिला आहेत ज्या पुरुषांवर वर्चस्व करतात . पण मुळात हा स्त्रीवादाचा लढा वर्ग, जात, पद, उच- नीच, लिंग भेदभाव, च्या विरोधात आवाज आहे. पितृसत्ता हि किती घातक आहे हे समजून घेत असताना स्त्रीवादी चळवळीचा विचार हा पुरुषांच्याही मनात रुजला पाहिजे.
भारतीय समाजा समोर धर्मशास्त्रांनी घालून दिलेल्या नियमांची चाकोरी आणि दुसरीकडे स्त्री-पुरुष समतेचे विचार अशा दोन वाटा उभ्या आहेत. उच्च मानवी मूल्ये असणार्या संविधानाला बदलण्याची भाषा करणार्यांना मला ठामपणे सांगावस वाटतं की, धर्मशास्त्रांनी धर्मग्रंथात जी मूल्ये मांडली आहेत. ती मूल्ये मनुष्य जीवनासाठी हितकारक व न्यायपूर्ण आहेत की नाही याचा प्रथम अभ्यास करणे महत्वाचे आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधूता या संविधानिक मूल्यांचा पुरस्कार करणारे धर्मशास्त्र नसतील तर या मानवी मूल्यांचा समावेश करण्यासाठी धर्मशास्त्रात आग्रह धरावा. भारतात समतेच व स्वातंत्र्याच वातावरण निर्माण करण्यासाठी इथल्या पुरुषप्रधान व्यवस्थेला समजून घेण महत्वाचं आहे कारण ही व्यवस्था धर्मशास्त्रकारांनी तयार केली आहे.
परिवर्तन शक्य आहे आणि ती गरजेचं
दलित समाजातील स्त्रियांचे वर्गव्यवस्था, जातिप्रथा, पितृसत्ता या सगळयाच पातळयांवर यांचे जेवढे शोषण या पृथ्वीवर दिसून येतात. त्याने या क्षणालाही अंगावर काटे उभे होतात. ‘खैरलांजी’ प्रकरण. महिलांना गुलामीतून काढण्यासाठी काही महिला पुढे येतांना दिसत आहेत त्यांना साथ दिली पाहिजे. पितृसत्तेचे आपल्यावर रुजलेले संस्कार पृथ्वीवरुन लगेच नष्ट होतील अस नाही पण परिवर्तन हे शक्य आहे. तेव्हा ही व्यवस्था बदलायला प्रत्येक व्यक्तिने जागृतपणे पुढाकार घेणं गरजेचं आहे. नुकतच आजही कुठल्याही समिति, संस्था, संघटना, कार्यक्रमां मधे सोबतच राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक सर्वच क्षेत्रात महिलांचा सहभाग ५०% असणे आवश्यक आहे. ते वातावरण तयार करणे हे आपले कर्त्तव्य आहे. महिलांच्या कार्यक्षमता, बुध्दिमत्ता विकसित होईल असे वातावरण तयार करता आल पाहिजे. स्त्री पुरुष यांमधे नैसर्गिक भेद आहे तो केवळ प्रजनन साठी पण स्त्रियांना अपत्यनिर्मिती आणि वंश वाढवणे अस मर्यादित न ठेवता जीवणाच्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांबरोबर तिला ही समतेच वातावरण मिळाल तर संपूर्ण मानवजातिला फायदाच होईल. अन्यथा स्त्रीवादी आंदोलने हे समतेसाठी नसून सत्तेसाठी रुप धारण करेल जे मानवजातीच्या हिताच नसणार. स्त्रियांचा समावेशाला समजून घेण्यास आणि त्याला महत्व देणार वातावरण तयार केलं तर अस जग निर्माण होईल जिथे कुणाचाही श्वास गुदमरणार नाही आणि लिंगाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक व्यक्तिच अस्तित्व फुलेल.
संदर्भ:
१) हिंदू संस्कृति आणि स्त्री – आ.ह.साळूंखे
२) द सेकंड सेक्स – सिमोन द बोव्हुआर
३) हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती डॉ. बी. आर. आंबेडकर
लेखिका: मिनल शेंडे कवयित्री आहेत. फुले, शाहू आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्ता आणि बुध्दिष्ट स्टडीज च्या अभ्यासक आहेत.
- जागतिक महिला दिन आणि आम्ही. - March 8, 2024
- अयोध्या तर एक झलक आहे, काशी-मथुरा बाकी आहे : ब्राह्मणी मिथकांची पोलखोल - January 22, 2024
- बा जोतीबा…! तू होतास म्हणून - May 19, 2023
सर्वात आधी मी मीनल ताईचा खुप खुप आभारी आहे परंपरेतून घडत आलेल्या गोष्टी आणि मानवी स्वभावाचा अधीन असलेल्या आमच्या माता बहिणींना खुप छान असं मार्गदर्शन केले अतिशय मुद्देसुद लिखाण सोबतच भाषा शैली स्पष्ट आणि सत्यता याचा मेळ घाऊल अप्रतिम लिखाण त्यांनी केलं त्यांचा लेखणी ला सलाम करतो आणि स्त्रीशक्तीचा जागर जाणिवांची दार्शनिक दृष्टी तयांनी ज्याप्रकारे मांडली ती खरच प्रेरणा देणारी आहे. स्त्रीशक्तीला तिच्या हक्कांची जाणीव करुन देणारी आणि सर्वांना विचार करण्यास प्रवृत्त करणारा लिखाण मीनल ताईंनी केल त्याबद्दल त्यांचे मना पासून आभार वेक्त करतो. धन्यवाद