लक्ष्मण कांबळे
बुध्दलेणी आणि पर्यटन हा विषय तसा महत्वाचा पण स्वतःला बौध्द म्हणून घेणार्यांनी दुर्दैवाने दुर्लक्षित केलेला विषय. आम्हाला फक्त अजंठा, एलोला किंवा वेरूळ, एलिफंटा याविषयीची काहीशी माहिती असते याचे कारण या लेण्या भारताचा प्राचीन इतिहास जपणारा पर्यटनाचा मानबिंदू म्हणून या ओळखला जातो त्यामुळे या लेण्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक क्रमवारीत असल्यामुळे कधीतरी पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमात अभ्यासायला मिळाली असावी किंवा इतर काही ठिकाणाहून किंवा मीडियाच्या माध्यमातून या लेण्यांबाबत माहिती मिळाली असावी. पण या जगप्रसिद्ध लेण्यांव्यतीरीक्त तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात असलेल्या ज्याला आपण महाराष्ट्राच वैभव म्हणतो त्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात शिवाय महाराष्ट्रात इतरत्र असलेल्या टिकाऊ अग्निजन्य खडकामुळे जवळपास एक हजार ते बाराशे इतक्या कोरीव लेण्यांची अतिशय सुरेख आणि देखणी कातळ शिल्प कोरलेली आहेत. ही कातळ शिल्प किंवा लेण्या सुध्दा भारताच्या प्राचीन इतिहासाचे मानबिंदू आहेत. हे समजून घेतल पाहिजे. प्रागैतिहासिक काळात माणूस नैसर्गिक गुहांमध्ये राहत होता. अनेक प्राणी सुध्दा याच नैसर्गिक गुहांमध्ये राहत होते. परंतु पुढे जसजसा मानव प्रगती करत गेला तसतसा त्याने या नैसर्गिक गुहांबरोबर तो स्वतः मोठमोठ्या खडकात फक्त छिन्नी आणि हाताड्याच्या सहाय्याने लेणी खोदू लागला हा आहे गुहा आणि लेणी यातील फरक आजही काही लोक लेण्यांना गुहा असेच संबोधतात परंतु गुहा ही नैसर्गिक असते आणि लेणी ही मानवनिर्मित असल्यामुळे तीला लेणीच म्हणायला हवे, गुहा नाही. हा मुख्य फरक आपण समजून घ्यायला हवा.
खरतर भारतामध्ये बौध्द स्थापत्यकलेची खूप मोठी देण आहे. कारण स्थापत्यकलेची सुरूवातच मुळात बौध्द संस्कृतीपासून झालेली आहे. या स्थापत्यकलेची सुरुवात सम्राट अशोकाच्या काळात झाली. इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात भारतात पहिली लेणी कोरली ती बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यात असलेल्या बाराबर टेकडीवर. जिला आपण लोमश ऋषीची लेणी म्हणतो. सम्राट अशोकाच्या कालखंडानंतर यानंतर मुख्यत्वे महाराष्ट्रात आणि भारतात इतरत्र लेण्या कोरण्यासाठी सुरुवात झाली. त्याला मात्र सातवाहन कालीन राजांचा इतिहासाची जोड द्यावी लागेल. इ. स. पुर्व ३०० ते इ. स. ७०० हा बौध्द स्थापत्यकलेचा उत्कर्षाच्या काळ समजला जातो. बौध्द धम्माचा प्रसार जेव्हा मोठ्या प्रमाणावर होऊ लागला तेव्हा महाराष्ट्रातील काळ्या पाषाणात बौध्द भिक्खूंच्या वास्तव्यासाठी, एकांतवासासाठी भक्कम आणि टिकाऊ अशा सुरेख आणि नक्षीदार लेण्यांची निर्मिती केली गेली. विशेष म्हणजे या लेण्या भोर घाट, नाणे घाट आणि थल घाट या प्राचीन व्यापारी मार्गावर कोरलेल्या आहेत. प्राचीन भोर घाटावर कार्ले, शेलारवाडी, बेडसे, भाजे कोंडाणे, ठाणाले या प्रमुख लेण्यांचा समावेश करता येईल. प्राचीन नाणेघाट या मार्गावर जुन्नर विभागातील लेण्या आणि मुंबई जवळच्या लेण्यांचा समावेश करता येईल. त्याचबरोबर प्राचीन थल घाट आज आपण त्याला कसारा घाट म्हणतो त्या मार्गावर त्रिरश्मी बुध्दलेणी नाशिक आणि विभागातील लेण्यांचा समावेश करता येईल. मुंबईच्या जवळच असलेल्या धारापूरी, कान्हेरी, कोंडिवटे, आणि महाकाली या लेण्या आहेत. नाशिकमध्ये असलेली त्रिरश्मी बुध्दलेणी असेल किंवा जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री, माणमोडी डोंगरावर असलेल्या अंबा-अंबिका, भिमा शंकर, भुत लेणी याशिवाय शिवनेरी, तुळजा या गटातील लेण्या असतील किंवा मावळ तालुक्यातील कार्ला, भाजे, बेडसे यासारख्या देखण्या कातळ शिल्पांचा समावेश करावा लागेल. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील कुडा, कोंडाणे, नाडसूर – ठाणाले, महाड, चोल या लेण्या याचबरोबर सातारा जिल्ह्यातील शिरवळ, वाई आणि कराड तालुक्यातील लेणीसमुह त्याचबरोबर कोल्हापुरच्या जवळ असलेल्या पन्हाळा गडाच्या पायथ्याशी असलेली पोहाले लेणी आणि महत्वाच म्हणजे शिल्पकलेतील शिरोमणी ठरलेल्या जगप्रसिद्ध अजंठा, एलोला, वेरूळ, पितलखोरा यासारख्या असंख्य लेण्या बौध्द धम्मासोबतच महाराष्ट्राच्याच नाही तर संपूर्ण भारताच्या ऐतिहासिक वैभवात भर टाकत आहेत.
प्रत्येक लेणीची शिल्पाकृती बघीतली तर आपणास दिसून येईल की, लेण्यात पाण्याची टाकी कोरण्यात आलेली आहेत बौध्द भिक्खूंना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून ही सोय केली होती. भिक्खूंना निवासासाठी शैलगृहांची सोय होती. धम्मदेसना देण्यासाठी शिवाय वादविवाद करण्यासाठी सभागृहांची निर्मिती केली. ध्यानधारणा करण्यासाठी चैत्यगृहांची निर्मिती केली. डोंगरावरती चढण्यासाठी निर्माण होणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी काही ठिकाणी पायर्या कोरलेल्या आहेत. आणि हे सर्व एखाद्या आधुनिक तंत्रज्ञानाला लाजवेल अशा प्रकारे अगदी कलात्मक पध्दतीने फक्त छिन्नी आणि हातोडीच्या सहाय्याने केलेली कलाकृती आहे. बौध्द स्थापत्यकलेचा विचार करायचा झाल्यास बौध्द परंपरेचे मुख्य दोन भाग आहेत. एक आहे थेरवाद किंवा हिनयान आणि दुसरा महायान. दोघांच ध्येय एकच आहे, धम्माचा प्रसार. इ. स. पुर्व ३०० ते इ. स. २०० हा थेरवाद परंपरेचा काळ समजण्यात येतो त्यालाच आपण हिणयान म्हणतो. तर इ. स. ३०० ते ७०० हा महायान परंपरेचा काळ समजण्यात येतो. या दोन्ही परंपरेमधील स्थापत्यकलेची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. थेरवाद किंवा हिणयान स्थापत्यकलेमध्ये लेण्यांमध्ये बुध्द प्रतिकांना विशेष स्थान आहे. त्यामध्ये लेण्यांमध्ये कोरलेले स्तूप असतील. धम्मचक्र असेल, बोधिवृक्ष असेल किंवा बुध्दांचे पदकमल या बुध्दप्रतीकांना विशेष आदराच स्थान होत. परंतु महायान परंपरेमधील स्थापत्यकलेमध्ये या प्रत्यक्ष बुध्द मुर्तीची निर्मिती करून बुध्द मुर्तीला विशेष स्थान निर्माण झाले. काही लेण्यांच्या निर्मितीचा कालखंड खूप मोठा आहे उदा. कान्हेरी ही लेणी निर्मितीचा कालखंड हा हजार बाराशे वर्षाचा एवढा प्रदीर्घ आहे. याच लेण्यांमध्ये थेरवाद किंवा हिनयान आणि महायान या दोन्ही परंपरेच्या काळातून निर्माण झालेली असल्यामुळे या लेणीवर दोन्ही परंपरेच्या स्थापत्यकलेचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो.
स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेल्या या नक्षीदार लेण्यांमध्ये असलेले कोरीव स्तंभ किंवा लेण्यांमध्ये कोरलेले शिलालेख असतील किंवा शिल्पपट असतील ही तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, समृध्द जीवनशैलीचा सर्वोत्कृष्ट पुरावाच म्हणावा लागेल. स्त्रीपुरुष समानतेची प्रतीकं आपल्याला बुध्दलेण्यांमध्येच कोरलेली दिसून येतील. लेण्यांमध्ये कोरलेले शिलालेख प्राचीन अर्थव्यवस्थेवर भाष्य करतात. लेण्या कोरण्यासाठी समाजातील प्रत्येक वर्गाकडून दिले गेलेल्या दानाचा उल्लेख शिलालेखामध्ये आढळतो. शेतकर्यांपासून ते व्यापारी आणि सत्तेत असलेल्या राजकीय व्यक्तीकडून या लेण्यांच्या निर्मितीसाठी आणि संवर्धनासाठी दान दिल्याचा उल्लेख शिलालेखामध्ये आढळतो. उदा. अनेक देणगीदारांनी कान्हेरी येथे ग्रंथालयासाठी दान दिलेले आहे. पहिल्या अमोघवर्षाच्या कारकिर्दीत, नवव्या शतकाच्या सुरुवातीला, भद्रविष्णुने आपल्या देणगीपैकी काही भाग ग्रंथ खरेदीसाठी दिलेला उल्लेख आहे. तसेच अविघ्नकार नावाच्या बंगाली व्यापार्यानेही कान्हेरी येथील संघास ग्रंथ खरेदीसाठी दान दिल्याचा उल्लेख आहे. याचाच अर्थ ह्या लेण्या प्राचीन काळात धम्माचा प्रसार करणारी मुख्य केंद्र होतीच सोबतच समाजात समतामुल्यांची जपणूक करण्यासाठी समाज शैक्षणिकदृष्ट्या प्रगल्भ होण्यासाठी म्हणून ज्ञानदानाच बहुमुल्य कार्य याच लेण्यांमध्ये होत होतं. त्यामुळे लेण्यांचा उपयोग ज्ञानदानासाठी होत असल्यामुळे लेण्या ज्ञानदान करणारी मोठी विद्यापीठं होती. व्यक्तिस्वातंत्र्य, कला, सामाजिक भान जपणारी ठिकाणे होती.
या ऐतिहासिक प्राचीन लेण्यांची नोंद भारतीय पुरातत्व विभागाकडे आहे आणि त्या प्राचीन वास्तूंच जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारीही या सरकारी विभागाचीच आहे. परंतु सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष आणि आपल्याला या ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंच महत्त्व न कळल्यामुळे या वास्तू आज अनेक प्रकारच्या अवहेलना सहन करत आहेत. अतिक्रमण आणि विकृतीकरणाच्या विळख्यात सापडलेल्या आहेत. या प्राचीन वास्तूंकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण या वास्तू म्हणजे आपल अस्तित्व आहे. आपला समाज, आपली संस्कृती सर्व दृष्टीने प्रगल्भ असल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. त्यामुळे हे अस्तित्व आणि ऐतिहासिक पुरावे जपण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. वेळ मिळेल तेव्हा आपण लेणींवरतीच गेलं पाहिजे. लेण्यांकडे पर्यटनाच्या दृष्टीकानातून बघितल पाहिजे. लेण्या पर्यटनाच्या दृष्टीने मुख्य केंद्र झाली पाहिजेत. अनेक ठिकाणी आपण पाहतो लेण्यांवरती बाजार मांडला जातोय या बाजारातून अंधश्रद्धा जोपासली जातेय. त्यातूनच आर्थिक हितसंबंध साधले जात आहेत आणि तेही एका विशिष्ट समुहाकडून होत आहे. इथेच फक्त एकाच समुहाची मक्तेदारी का चालते? जर हा प्राचीन वारसा संपूर्ण भारताचा आहे. आपण बौध्द म्हणून घेणार्या लोकांनी पर्यटनाच्या माध्यमातून आपला व्यवसाय कसा निर्माण होईल यादृष्टीने विचार करावा लागेल. अजंठा वेरूळ सारख्या ठिकाणी सरकारी परवाना धारक गाईड असतात येणाऱ्या देशी परदेशी पर्यटकांना खोटी माहिती दिली जाते. विकृत पध्दतीने लेण्या सांगितल्या जातात. अशा ठिकाणी आपण काही करू शकतो का हे पाहिले पाहिजे. आपली मुलं या इतिहासाचा अभ्यास करून इथे पोहोचली पाहिजेत. लेणी पर्यटनासाठी टुरिझमच्या माध्यमातून आवश्यक गाड्यांची आपल्याच लोकांकडून उपलब्धता कशी होईल हा विचार केला पाहिजे. लेणीसंवर्धन का महत्वाचे आहे हे पटवून देण्यासाठी लोकांना लेणीकडे जाण्यासाठी जास्तीत जास्तं प्रवृत्त केले पाहिजे. लोकं पर्यटनाच्या दृष्टीने बघतील तरच तीथे होणार्या अतिक्रमणास आळा घालण्यासाठी मदत होईल तसेच सरकारी यंत्रणा तिथे सोईसुविधा पुरवून लेण्यांपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या, टॉयलेट्स, पाणी यासारख्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी लेणीसंवर्धकांना बळ मिळेल.
देय मेत्ता च्या माध्यमातून विदेशी पर्यटकांना लेणी दाखवण्यासाठी ABCPR चे लेणीसंवर्धक सुदर्शन सालवे नेहमी प्रयत्न करत असतात. ब्राझील, स्पेन, पोर्तुगाल, जर्मनी, जपान, चीन, कोरिया या देशांतून येणाऱ्या या पर्यटकांना भारतामध्ये फक्त ताजमहाल किंवा अजंठा यासारख्या प्राचीन वास्तूंची माहिती होती परंतु ABCPR च्या माध्यमातून याव्यतिरिक्त बौध्द वास्तू त्यांनी बघितल्यानंतर ते नेहमी आमच्या संपर्कात राहून कृतज्ञता व्यक्त करतात. आणि गरज लागेल तेव्हा मदत घेतात.
मला वाटतं सर्वांनी मिळून हा प्राचीन ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी प्रयत्न करायला हवेत तरच भारतात बौध्द धम्म आणि बौध्द संस्कृती कायम टिकून राहील.
लक्ष्मण कांबळे
लेेेखक यांचे शिक्षण BA (इतिहास )शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून असून नोकरी निमित्त मुंबईत पंधरा वर्षांपासून वास्तव्य करत आहेत तसेच बुद्धलेणी संवर्धनासाठी प्राचीन बुध्दलेणी संवर्धन आणि संशोधन या टीममध्ये मागील तीन वर्षांपासून काम करत आहेत.
- बुध्दलेणी आणि धम्मामध्ये स्त्रियांचे स्थान - March 16, 2021
- बुध्दलेणी आणि पर्यटन… - January 9, 2021
Leave a Reply