सिनेमाचा ब्राह्मणी गेझ (gaze) आणि प्रतिनिधित्व

दिक्षा सरोदे

‘बधाई दो’ सिनेमा बघितला आणि आयुष्याची २ तास ३० मि. वाया घातली. सिनेमामध्ये स्ट्रेट कलाकारांनी समलिंगी पात्र साकारली आहेत. एक चित्रपट टिम ज्यात LGBTQIA+ चे एकही प्रतिनिधित्व नाही अशी टिम जेव्हा समलैंगिगतेवर चित्रपट बनवते तेव्हा सिनेमात समलैंगितेप्रती केलेली रुढीबद्धता दिसून येते.

चित्रपटात राजकुमार राव ने समलैंगिक आणि गर्विष्ठ ठाकूरचे पात्र साकारले आहे. मुख्य पात्राच्या जातीवादी वर्तनाला चित्रपटात अतिशय यशस्वीपणे सामान्य केले आहे. चित्रपटातील एका दृश्यात सुमन (भूमी) शार्दुल (राजकुमार) ला त्याच्या स्त्रीद्वेशी वर्तनासाठी खरी-खोटी सुनावते पण त्याच प्रगतशील सुमनला शार्दुलची जातीयवादी वागणूक संपूर्ण चित्रपटात कधीच लक्षात येत नाही. एका लिबरल सवर्णाच्या कल्पनेतुन अस्तित्वात आलेली ही पात्र आहेत. सुमन आणि शार्दलु एलिट सवर्ण समाजाचे प्रतिनिधत्व करतात. ज्यांच्यासाठी जातीवाद ही एक भूतकालीन गोष्ट आहे. आज समाजात कितीही जातिवाद असला तरी तो त्यांना कधीही दिसत नाही.

चित्रपटात असेही दाखवण्यात आले आहे की समलैंगिक पुरुष आणि समलैंगिक महिला बाळासाठी सेक्स करण्यास तयार होतात. आजच्या काळातील queers च्या जीवनावर आधारित, स्वतःला प्रगतिशील म्हणून घेणारे सिनेमेदेखील १९व्या दशकातील बॉलीवुड प्रेम कथासारखेच आहेत. एक प्रेमींची. जोडी दोघेही जातीने सवर्ण. घरच्यांचा आणि समाजाचा लग्नासाठी नकार. सिनेमात ब्राह्मणवादी संस्कृतीची भरमार. फक्त एक फरक असतो तो म्हणजे विषमलिंगी जोडप्यांच्या जागी समलिंगी जोडपी दाखवली जातात. माझ्या मते हा चित्रपट समलैंगिकतेचे प्रतिनिधित्व करत नाही. मुळात ही तर सवर्ण विषमलिंगी समाजाने समलैंगिक व्यक्तींबदल केलेली एक कल्पनाच आहे. एक अशी कल्पना ज्यात रुढीबद्धता आणि चुकांचा गढच बांधला गेला आहे.

हा सिनेमा बाघितल्या नंतर एक विचार मनात येतो तो म्हणजे भारतीय सिनेसृष्टीत उत्पीड़ित समाजाच्या प्रतिनिधीत्वाचा. ब्राह्मणवादी संस्कृती हि उत्पीड़नाची जननी आहे आणि भारतीय सिनेसृष्टीत ब्राह्मणवादाचे वर्चस्व फार मोठे आहे. असणार पण का नाही, सिनेसृष्टीत सुरवातीपासून सवर्ण समाजाचे वर्चस्व राहिले आहे.

भारतीय सिनेमात पीड़ित समाजाच्या प्रतिनिधित्ववाला नेहमी नज़रअंदाज केले आहे. पीडितांचे दु:ख पडद्यावर विकुन सिनेसृष्टीतील सवर्णनांनी यश कमावले पण कधीही पिडित् समाजाला प्रतिनिधित्व दिले नाही.

सिनेमातिल प्रतिनिधित्वाचा प्रश्न जाती लैंगिकता ,रंग ,लिंग इ. अनेक उत्पिडित ओळखींचा आहे. सिनेमांमधली काळ्या-सावळ्या रंगाची पात्र नेहमी गोरे नट-नटी साकारताना दिसतात. मेकअपची सहायता घेतली जाते व गोऱ्या कलाकारांना काळे केले जाते. एक प्रश्न मनात येतो तो म्हणजे ,काय एवढ्या मोठा सिनेसृष्टीत एकही काळ्या रंगाची व्यक्ती अभिनय करण्यायोग्य नाही का? काळ्या रंगाचे कलाकार मेकअपची सहाय्यता घेऊन श्वेत रंगाची पात्र साकारताना का बर दिसत नाहीत ?

हा प्रश्न फक्त प्रतीनिधित्वाचा नाहीतर आपल्या समाजात खोलवर रुजलेला वर्णद्वेषाचा पण आहे. सिनेमांमधील तृतीयपंथी विषयीची रूढीबद्धता ही अस्वस्थ करणारी आहे. सिनेमांनमध्ये हास्यासाठी तृतीयपंथीयांची पात्रे दाखवली जातात. तृतीयपंथीनच्या ओळखीचा आणि त्यांच्या अस्तित्वाचा विनोद केला जातो.एका विशिष्ट लिंगा बद्दल समाजात सिनेमा चुकीची धारणा पसरवताना दिसतो. भारतीय सिनेमांनमध्ये तृतीयपंथी पात्र नेहमी स्त्री आणि पुरुष निभावताना दिसतात. एखाद्या स्त्रीचे किंवा पुरुषाचे पात्र तृतीयपंथी व्यक्तीनी निभावल असं आपण कदाचित कधीही पाहिलं नसेल पण त्या उलट तृतीयपंथींची पात्र नेहमी स्त्री/ पुरुष कलाकारांनी निभावणे भारतीय सिनेमांनमध्ये फार सामान्य आहे.

तृतीयपंथींच्या वेदनेच्या कहाण्या विकून व्यवसाय तर या सिनेजगतात केला जातो पण या संपूर्ण प्रक्रियेत तृतीयपंथींना कुठेही प्रतिनिधित्व दिले जात नाही. सिनेमांमध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमातीची जी पात्र दाखवली जातात त्यामध्ये नेहमी रूढीबद्धतेची मानसिकता दडलेली असते. जसे की ही पात्र नेहमी रंगाने काळीसावळी, गरीब, दुबळीदाखवली जातात.

जेव्हा अनुसूचित जातीतील उच्चशिक्षित व प्रभावी राजकारणी महिलेवर आधारित सिनेमा बनवला जातो तेव्हा कलाकार हातामध्ये झाडू धरून उभी असलेली दृश्य पोस्टरवर दाखवले जाते. पण अशी रूढीबद्धता जेव्हा सवर्ण जातीतील महिला राजकारणी वर आधारित सिनेमा बनवला जातो तेव्हा मात्र दाखवली जात नाही.

ब्राह्मण – सवर्ण दिग्दर्शकांनी पिडीत जातीची पात्रे नेहमी कमजोर व असहाय्य दाखवली. सिनेमानध्ये एक सवर्ण पात्र असते जो या दलित पात्रांचा तारणहार असतो. तारणारी सवर्ण जातीतील माणस फक्त सिनेमातच आढळता खऱ्या आयुष्यात असे काही घडताना दिसत नाहीत. चित्रपटाची पडद्यावरची टीम असो की मग ती पडद्यामागची टीम असो जर एखादा सिनेमा समाजातील पीडित घटकांवर व त्यांच्या सामाजिक समस्यांवर आधारित असेल तर त्यात त्या समाजाचे प्रतिनिधित्व असणे गरजेचे असते.

सिनेमा हा समाजाचा आरसा असतो असे म्हटले जाते. सिनेमा फक्त समाजाचा आरसा नसून तो लोकांसाठी त्यांची चिंता , वेदना विसरून काही तासच का होत नाही जगण्याचा एक आसरा पण असतो. भारतीय समाजात सिनेमांचे प्रभुत्व फार मोठे आहे सिनेमा प्रोत्साहित करतो स्वप्नेही दाखवतो किंवा समाजात चुकीची धारणा पसरवण्याचे काम देखील करतो. कलेचा उद्देश काय आहे? ही वास्तवातून सुटका नाही का? आपल्या आजूबाजूला असलेल्या कठोर सत्यापासून काहि तासांची सुटका. जरी ते खोटे असले तरी प्रेक्षकांना त्यांच्या अस्तित्वाची भयानकता विसरून काही तास तरी त्यांच्या कल्पनेत जगण्याची गरज असते. शेवटी कलेतील काल्पनिकता वास्तव बनायला जास्त वेळ लागत नाही.

दिक्षा सरोदे

लेखिका मेडिकल स्टुडंट असून नांदेड येथील रहिवासी आहेत.

1 Comment

  1. “मुळात ही तर सवर्ण विषमलिंगी समाजाने समलैंगिक व्यक्तींबदल केलेली एक कल्पनाच आहे.”
    ❤️

Leave a Reply

Your email address will not be published.


*