तथागता…

पूजा वसंत ढवळे

तथागता….

हे तथागता, महामानवा ज्ञानदाता
पापण्यांना क्षणभर उघडतोस का रे आता?
बघ मी जातेय, निघालेय मी दिगांतात
दूर दूर विश्वभ्रमणाला अगदी तुझ्याच देशात.

आज इथे प्रत्येक राष्ट्रान् राष्ट्रास न्याळतेय मी
तिथे पेटलेला अशांततेचा वणवा
अन् खदखदणारा असंतोष ही

जिथं पहाव तिथं स्वार्थीपण बोकाळलय
तथागता… !निस्वार्थीपण आता कुठ रे उरलय ?
तरी तु सांगितल होतस ना या जनांना
तृष्णा लोभापासून मुक्ती मिळवायला.

हे तथागता….!
क्रांतिकारका..!!
तुझ्या क्रांतीच्या ज्वाला शमल्यात रे आता,
राख झालीय त्यांची..,
विझलाय मानवतेचा दिप तु लावलेला.
येथील देश नावाच्या हिंस्र गुहेत,
अमानुषता बोकाळली आहे.

इथे, दंडेलशाहीला सलाम,
किळसवानी रीत बायको गुलाम आहे.

हे तथागता
तु म्हणाला होतास ना
जगात जशी दुःख ,दुःखाची कारण
तसेच दुःख मुक्तीचे मार्गही आहेत.

त्याउपरी
या दुःखाच्या प्रश्नावर तु दिलेल
दुःख मुक्तीच solution किती दुर्दम्य
अगदीच खात्रीलायक आहे.

पण,आम्हाला मात्र त्याची गरजच वाटली नाही रे कधी,
का, कोणास ठाऊक ?
किती आगतीक आणि शुद्र हे जीव.
म्हणूनच…, तर आम्ही तुडुंब डुंबलोय,
या दुःखाच्या सागरात
प्रचंड दुःखाचा भार स्पंदनात साठवत.

कधी कधी कल्पनेच्या पल्याड जातं हे आमचं बेबस वागणं का? अस् का? वागलो आम्ही विरूध्दांगी
तु सांगीतलेल्या विचारांच्या तुझ्या तत्वांच्या.
म्हणूनच.., तोंडघशी पडतोय..जिथं..तिथं आम्ही.

तु ,म्हणाला होतास ना
‘जगा आणि जगु द्या’!
पण,आम्ही मात्र जगण्यासाठी तडफडतोय,तळमळतोय
जगू मात्र कोणालाच देत नाही..

सारे खेकडेच रे आम्ही एकमेकांची तंगडी खेचनारे

आणि जग ही एक प्रचंड खेकडाच बणलय आमच्यासारखच….
आणि जगातील सारे देशही खेकडेच
उरावर दहा-दहा अणुबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब
वागवत…

तथागता, मला प्रश्न पडलाय गहन.
सारी मानवजातच नष्ट करताहेत की काय?
हे मुजोर सत्ताधारी खेकडे…

वाटतं यांच्या नांग्या तोडून बाजूला फेकाव्या…
पण,तथागता,आम्ही बांधील आहोत रे…वचनात,
तुझ्या अहिंसेच्या तत्वात हे बसत नाही ना,…म्हणून.

म्हणूनच..,त्यांना टोचनार आहोत आम्ही.
ते शांतीच शीत इंजेक्शन… त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी..

पण,कोन ? ऐकतो रे इथे…आमचं
कोण ? टोचून घेणार ते शांतीच इंजेक्शन
इथ तर प्रत्येक जन स्वयंघोषित शहाणे,
सारे यांचेच बहाणे…

म्हणूनच..,मी शहाणं होण्याच टाळते
वेडी म्हणून जगते..या कवितेच्या गावात

तथागता, येथील प्रत्येक मानवाच्या मेंदूत पेरायचेत मला
तुझे विचार…विश्वशांती खातर.

तु मांडलेली ती कारूण्याची परिभाषा
तु अत्।दिप।।भव्।।। चा दिलेला नारा
तु मांडलेल ते सखोल गाढ तत्वज्ञान
आणि अजूनही बरंच काही…

तथागता,
अनासक्तपणे जिवन जगत
तु दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करत

करू शकतील का? रे तुझे अनुयायी
हे विश्व बौध्दमय
हे विश्व बौध्दमय

पूजा वसंत ढवळे

लेखिका नांदेड येथील रहिवासी असून वाणिज्य शाखेच्या स्टुडंट असून कवियित्री आहेत.

1 Comment

  1. खुपच सुंदर लिहिले आहे. बुद्धाचा मार्ग दाखविला जाऊ शकतो परंतु त्यावर स्वतःलाच चालावे लागते हे निश्चित तेव्हाच त्याची अनुभूती होते. भन्ते Rakhinta यांनी धम्म देसना देतांना फार सुंदर पणे बुद्ध मार्गावर चालण्याची माहिती करून दिली ती अशी की एक पंचशील पालन करा अनुभूती घ्या. नक्कीच ते तुम्हाला फायदेशीर ठरेल. मग दुसर्‍या पंचशील चे पालन करावे असे करता तुम्ही बुद्धाने सांगितलेल्या मार्गावर मार्गक्रमण करत राहत.

Leave a Reply

Your email address will not be published.


*