जयंत रामटेके
दोन दिवसांपूर्वी पुण्यात एका इंजिनिअरींग झालेल्या युवकाने आत्महत्या केली. एमपीएससी परीक्षा पास होऊनही नौकरी मिळत नाही असे त्याने कारण सांगितले. आज सम्राट पेपरने पहिल्या पानावर ह्या बातमीला जागा दिली. उशिरा का होईना सम्राटच्या संपादकाला ह्या विषयाचे गांभीर्य समजले. अन्यथा हे सम्राट व इतर अनेक पेपर्स सरकारी नौकऱ्यांचे उदात्तीकरण करण्यात अग्रेसर असतात. रिक्षावाल्याचा मुलगा “कलेक्टर” झाला, घरकाम करणाऱ्या बाईची पोरगी “डीवायएसपी” झाली व त्यांचा कसा ठिकठिकाणी सत्कार होतो, वैगरे अशा sensational breaking news मोठ्या चवीने हे पेपरवाले छापुन आणतात. हे पेपरवालेच नाही तर तर सगळ्या सामाजिक, वैचारिक दृष्ट्या मागासलेल्या एससी/एसटी व ओबीसी च्या जातीमधील शिकले-सवरले लोक हे सुद्धा ह्या सरकारी बाबूंच्या नौकऱ्यांचे उदात्तीकरण करण्यात पुढे असतात. ह्या सगळ्या बातम्या वाचुन, एससी/एसटी व ओबीसी जातींच्या युवकांना व त्यांच्या पालकांना ह्या सरकारी नौकऱ्यांचे स्वप्न पडायला लागतात व इथूनच ते ह्या सरकारी नौकऱ्यांचे तयारीच्या मायाजाळामध्ये ओढले जातात.
सिव्हील इंजिनिअरींगमध्ये बीई असलेला हा तरुण MPSC परीक्षेच्या चक्रव्यूहात सापडला. २०१९ ची पुर्व व मुख्य परीक्षा पास करुन तो दिड वर्षापासुन मुलाखतीची वाट पहात होता. २०२० ची पूर्व परीक्षा पण तो पास झाला होता. वाढते वय, हाताला काम नाही. आपले शिक्षण झालेल्या इंजिनिअरींगच्या क्षेत्रात ऊद्योगधंदा, नौकरी करायचे सोडून, ज्या सरकारी नौकऱ्यांमध्ये कसलेही skills लागत नाही, विशेष बुद्धिमत्तेची गरज नाही, कमुनिकेशन व इतर सॉफ्ट स्किल्स ला जिथे कोणी विचारत नाही, अशा सरकारी क्लास-१/क्लास-२ च्या कारकूनी नौकऱ्यांसाठी, हजारो उच्चशिक्षित युवक आपले आयुष्य बरबाद करत आहेत. ह्याला जबाबदार कोण ? सरकार जे MPSC ला बरोबर चालवुन, वेळात परीक्षा/मुलाखती घेऊ शकत नाही ? की तो समाज जो सरकारी नौकऱ्यांना अवास्तव महत्व देतो व उच्चशिक्षित युवकांना सरकारी नौकऱ्यांच्या तयारीच्या खाईत ढकलतो? MPSC/इतर सरकारी नौकऱ्यांची तय्यारी करता करता नैराश्य आलेल्या बेरोजगार तरुणांचा मोठा वर्ग समाजात तयार झाला आहे. ह्या युवकांची वेळीच counselling करुन त्यांना, MPSC रुपी चक्रव्यूहातून बाहेर काढुन alternate career options बद्दल सल्ला देणे, खूप आवश्यक आहे.
मुळात सरकारी नौकऱ्यांच्या तयारीने करीअरची बरबादी ही आज कोरोनामुळे आलेली समस्या नाही. ही समस्या १५-२० वर्षांपासुन आहे. आज ह्या समस्येने भयंकर विक्राळ रुप घेतले आहे व कोरोनाने त्यात भर टाकली आहे. कोरोना किंवा नो कोरोना, दरवर्षी एमपीएससी च्या ४०० जागांसाठी ४ लाख विद्यार्थी परीक्षा देतात. ह्याचा अर्थ एक हजार परीक्षार्थीमधून फक्त एकच विद्यार्थी हा सिलेक्ट होणार. १ हजारातून, ९९९ विद्यार्थी हे फेलच होणार. पुढच्या वर्षी परत एकच विद्यार्थी सिलेक्ट होणार. म्हणजे, जर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चार लाख फिक्सड राहिली तर, हजारातून दर वर्षी एक व्यक्ती ह्या वेगाने सर्व विद्यार्थी सिलेक्ट व्हायला ९९९ वर्ष लागतील ! हे साधे गणित न समजल्यामुळे अनेक विद्यार्थी आपल्या करिअरची माती करत आहेत.
वरील गोष्टी ह्या फक्त एमपीएससी ची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना लागू आहेत असे नाही. युपीएससी सिव्हील सर्विसेस सुद्दा असाच मायाजाळ आहे. दुसरे म्हणजे ह्या सरकारी नौकऱ्यांच्या तयारीमध्ये फक्त गरीब मुले किंवा अशिक्षित पालक असणारे युवकच सापडले आहेत असे नाही.
पुण्यामध्ये बहुतेक एमपीएससीचे कोचिंग क्लासेस चालविणारे लोक ब्राम्हण आहेत. बुक स्टोअर्स हे ब्राम्हणांचे आहेत. एमपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी बाहेरुन आलेल्या विद्यार्थ्यांची राहाण्याची व्यवस्था ही ब्राम्हणांच्या घरात, खानावळी सर्व ब्राम्हणांच्या. पण ह्या एमपीएससी व युपीएससी परीक्षेंच्या तयारीच्या मायाजालात किती ब्राम्हण विद्यार्थी फसले आहेत ? खुप कमी. नगण्य. मग पुण्याचे व इतर शहरातील ब्राम्हण युवक काय करतात ? ते जोगच्या इंन्सटिट्युटमध्ये जावुन GRE/GMAT/TOEFL/IELTS ची तय्यारी करत आहेत. ते CAT/CET ची तयारी करत आहेत. ते NDA/CDS ची तयारी करुन मिलीटरीचे अधिकारी बनु पहात आहेत. ते CA/CS ची तयारी करताहेत. ते सद्या इंडस्ट्री मध्ये डिमांडमध्ये असणारे Data Science, Analytics, AI, IoT, Robotics, Data Visualization, Graphic Design, Social Media Marketing, Cyber Security, Cloud Computing हे सगळे कोर्सेस करत आहेत. ज्यांना स्वतः विचार करुन आपला समोरचा करीअर पाथ ठरविता येत नाही अशा लोकांनी, आज देशातील सर्वात प्रगत समाज काय करतो हे समजुन त्यांच्या पाऊलांवर पाऊल टाकायचा प्रयत्न करायला पाहिजे.
बाबासाहेब म्हणतात एखाद्या समाजाची(जातीची) प्रगती ही त्या समाजातील स्त्रियांनी केलेल्या प्रगतीवर ठरविली जाऊ शकते.
त्याचप्रमाणे, आज असे म्हणता येईल की एखाद्या समाजाचा(जातीचा) सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक मागासलेपणा हा त्या जातीतील उच्चशिक्षित युवकांचा सरकारी नौकऱ्यांकडे कल किती प्रमाणात आहे ह्या नुसार ठरविला जाऊ शकतो. ज्या जातींचे युवक अजुनही सरकारी नौकऱ्यांच्या पाठीमागे धावतात, त्या जाती सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक दृष्टीने खूप मागासलेल्या आहेत असे म्हणता येईल. ज्या जातीतील युवक हे सरकारी नौकऱ्यांना दुय्यम समजून, त्यांनी ग्रॅज्युएशन/पोस्ट ग्रॅज्युएशन केलेल्या क्षेत्रांमध्ये उद्योगधंदे किंवा खाजगी क्षेत्रात नौकरी साठी प्रयत्न करतात, अशा जाती ह्या सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक दृष्टीने खूप प्रगत आहेत असे म्हणता येईल.
जयंत रामटेके
लेखक Meritorium Knowledge Academy चे संस्थापक असून आयआयटी मुंबई, तसेच आयआयएम कलकत्ता येथून पदवी/पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे, तसेच विविध MNCs मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर वीस वर्षांपेक्षा अधिक कामाचा अनुभव आहे.
- मिलीटरी अधिकाऱ्यांच्या नौकऱ्यांप्रती बहुजनांची उदासीनता - July 18, 2021
- सरकारी नौकऱ्यांच्या तयारीचा मायाजाळ… - July 5, 2021
Well said Jayant!
Mananiya Jayant ramteke saheb, brahman mule govt exam madhe compete karat nahi kinva kami pramanat kartaat , sc/st/obc peksha he tumhi kontya varshicha data varun conclude kela?! Ki aapla nehmichach brahman dvesh ukali futun var aala?!. ( kahi pdf/xl sheet banvli asel tar share kara ) Ani karat hi nasel tar dosh reservations var tar deu nahi shakat. Lokanchya bhavana dukhtaat. Mag marg konta urato? Private job chach. 20 varshacha anubhav tumhala. Kadhi paryant brahman dvesh karal. Aso. Chalu dya.