सामाजिक क्रांतीचे प्रणेते : डॉ.बाबासाहेब आंबेडकर

नानासाहेब गव्हाणे

आंबेडकरांच्या क्रांतिकारी जीवितकार्यात राजकीय कार्याप्रमाणेच अस्पृश्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी जे चिंतन केले व सनदशीर संघर्ष केले, त्यांचे फार मोठे महत्वाचे स्थान आहे.खरे तर डॉ. आंबेडकर हे मूलतः अर्थतज्ज्ञच होते. पण हेही खरे आहे की, बाबासाहेबांचे जीवनकार्य बहुआयामी Multi-dimensional होते. त्यावरुन ‘Genius’ विषयी डॉ. जॉन्सन यांनी केलेल्या विधानाची सत्यता पटते. डॉ. जॉन्सन म्हणतात- ‘True genius is a mind of large general powers, accidently determined to some particular direction, ready for all things, but chosen by circumstances for one’परदेशात उच्चशिक्षणासाठी जाण्यापूर्वीच समाजशास्त्राबरोबरच अर्थशास्त्र व विशेषतः पब्लिक फायनान्स या विषयांचाही अभ्यास करण्याची मनिषा त्यांनी सयाजीराव गायकवाडांशी झालेल्या संवादात बोलून दाखविली होती व त्यानुसारच परदेशातील या संगात त्यांनी अर्थशास्त्राला प्राधान्य दिले होते. या अभ्यासाच्या आधारे त्यांनी सादर केलेला ‘रुपयाचा प्रश्नः उद्गम आणि विकास’ हा प्रबंध याच चिंतनाचे फलित आहे. या चिंतनात भारतीय अर्थशास्त्राचे जनक समजले जाणारे न्या. महादेव गोविंद रानडे, भारताचा आर्थिक इतिहास लिहिणारे रोमेशचंद्र दत्त, जॉन स्टुअर्ट मिल, मेजर विंगेट वगैरे पूर्वसूरींच्या विचारांचा मागोवा घेत असताना बाबासाहेबांनी त्यांच्याबरोबरच आपले मतभेदही नोंदविले आहेत. पुढे १९२३ साली प्रकाशित झालेल्या, वर उल्लेखिलेल्या ‘रुपयाचा प्रश्नः उद्गम आणि विकास या प्रबंधात बाबासाहेबांनी, आधुनिक अर्थशास्त्रात क्रांती घडवून आणणाऱ्या प्रा. जॉन मेनार्ड केन्स् यासारख्या महान अर्थतज्ज्ञाने सुवर्णविनिमय परिणामाचा पुरस्कार करताना काढलेल्या बहुतेक सर्व निष्कर्षांचे खंडन केले आहे.डॉ. आंबेडकर जगातील अग्रगण्य विद्यापीठातील सर्वोच्च अर्थतज्ज्ञपदावर पोहोचले आणि तरीही परदेशातून परतल्यावर स्वतःच्या आर्थिक उन्नतीचा मोह टाळून गरीब जनतेच्या कल्याणाला त्यांनी वाहून घेतले, अशी सामाजिक बांधिलकी मानणारा अर्थतज्ज्ञ विरळाच.पण, भारतानेच जिथे बाबासाहेबांच्या आर्थिक विचारांची दखल घेतली नाही तिथे बाहेरील देशांना त्यांच्या आर्थिक विचारांची गंधवार्ताही नसावी, हे स्वाभाविकच आहे.

आज जगातील देश आर्थिक प्रश्नांमुळे जीवनमरणाच्या किनाऱ्यावर उभे आहेत. विश्वव्यापार संघटन WTO हे त्याचे प्रतीक आहे.आज आंतरराष्ट्रीय सामाजिक आर्थिक रचना मांडणाऱ्या अर्थतज्ज्ञांचा संपूर्ण अभाव आहे. अशावेळी पश्चिमी अर्थतज्ज्ञांनी या विषयातील ज्यांच्या क्षमतेविषयी विश्वास प्रकट केला आहे. त्या बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाची उणीव अधिकच तीव्रतेने भासते. त्यादृष्टीने डॉ. आंबेडकरांची अर्थशास्त्रीय ग्रंथसंपदा पाहण्यासारखी आहे. ‘Administration and Finance of East India Company’, ‘The Evolution of Provincial Finance in British India’, ‘The Problem of the Rupee,’ ‘History of Indian Currency and Banking, (Vol.l) ‘Miscellaneous Essays’ इ.भारतीय परिस्थितीच्या संदर्भातील हा आर्थिक विचार असला तरी एकूण अर्थशास्त्रीय मूलतत्वांचा त्याला आधार आहेच. म्हणूनच डॉ. आंबेडकरांचे अर्थचिंतन जागतिक कीर्तीच्या अर्थतज्ज्ञांच्या प्रशंसेला पात्र ठरले.असे असल्यामुळेच अस्पृश्यांची स्थिती हा त्याच्या जिव्हाळ्याचा विषय तर होताच, परंतु अर्थशास्त्रीय दृष्टयाही त्यांच्या चिंतनाचा विषय होता. हे त्यांनी केलेल्या सूक्ष्म चिकित्सेवरुन लक्षात येते.अस्पृश्यांच्या गुलामगिरीचे स्वरुप म्हणजे ‘सर्व गुलामगिऱ्यांचा अर्क’ असे म्हटले होते. म्हणून बाबासाहेबांनी अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्यासाठी धार्मिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक अशा चार आघाडया दलितांच्या मुक्ति संग्रामात उघडलेल्या होत्या. अस्पृश्यांच्या शापाचे वर्णन त्यांनी अनेक अंगांनी केले होते. त्यापैकी आर्थिक भूमिकेचा व आर्थिक प्रश्नांसंबंधी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा येथे विचार करावयाचा आहे. त्यासंबंधीची आंबेडकरांची भूमिका समजून घेण्यास पुढील तीन उतारे उपयुक्त उरतील.अस्पृश्यतेच्या प्रच्छन्न गुलामगिरीसंबंधी बाबासाहेबांनी म्हटले होते. ”व्यक्तिस्वातंत्र्य हा भांडवलशाहीचा महामंत्र आहे. भांडवलशाहीने प्रत्यक्ष स्वरुपात दिसणारी प्रमजीविकांची वैयक्तिक (देहाची) गुलामगिरी जगाच्या पाठीवरुन नष्ट केली. अस्पृश्यतेच्या प्रच्छन्न रुपाने ही गुलामगिरी अजूनही या देशात वावरत आहे. अस्पृश्यतेच्या रुढीमुळे भांडवलशाहीच्या उघडया बाजारात त्यांना आपल्या श्रमशक्तीची विक्री करण्याला मज्जाव करण्यात येत आहे. कित्येक धनोत्पादक धंदयांची दारे त्यांना बंद आहेत. अस्पृश्य शेतकरी, कामकरी वर्गाला आपली श्रमशक्ती उघडया बाजारात विकण्याचे स्वातंत्र्य हवे आहे. अस्पृश्य मजुरांना आधनिक भांडवलशाही उद्योगात प्रवेश करण्याला इतर स्पृश्य मजरांच्या बरोबरीने समतेचा हक्क मिळवावयाचा आहे. अस्पृश्य मजुरांना आधुनिक भांडवलशाही उद्योगात प्रवेश करण्याला इतर स्पृश्य मजुरांच्या बरोबरीने समतेचा हक्क मिळवावयाचा आहे. शास्त्रशुध्द समाजसत्तावादाच्या तत्वांचे पूर्ण ज्ञान असल्याची शेखी मिरविणाऱ्या हिंदी समाजसत्तावादयांनी अस्पृशांच्या चळवळीला ‘मध्यमवर्गाची जातीय चळवळ’ असे नाव देऊन विरोध करावा, याचे नवल वाटते.””अस्पृश्यता विध्वंसनाला भांडवलशाहीचा विरोध नाही. अस्पृश्यता नष्ट होऊन या मजुरांना स्पृश्य मजुरांबरोबर उघडया बाजारात श्रमशक्ती विकता यावी, अशीच भांडवलशाहीची इच्छा असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे मजुरांच्या खड्या फौजेची संख्या वाढेल. स्पर्धा तीव्रता होऊन मजुरीचे दर कमी होतील. भांडवलशाही शासन संस्थेच्या सहाय्याने अस्पृश्यता घालवणे शक्य असल्यामुळे, अस्पृश्य वर्गाने सनदशीर मार्गाने राजकीय सत्ता अंशतः तरी हस्तगत करुन घेण्याचा प्रयत्न केल्यास कोणाही न्यायप्रिय व्यक्तीला त्यांच्याबद्दल हेवा देवा वाटण्याचे कारण नाही. आज अस्पृश्य वर्गाला राजकीय क्रांतीचे ध्येय आपल्या पुढे ठेवता येणार नाही. नवीन सुधारणा कायद्यान्वये हाती आलेल्या राजकीय हक्कांचा उपयोग करुन घेवून सनदशीर मार्गाने आपली सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक उन्नती होईल तितकी करुन घेणे हेच त्यांचे कर्तव्य आहे.”आणखी एका अंगाने विचार करताना बाबासाहेब म्हणतात, ‘अस्पृश्यतेचे निमूलन झाल्यावाचून शेतकरी कामकरी वर्गाच्या आर्थिक लढयाला संघटित तोंड लागणार नाही. हिंदी श्रमजीवी वर्गात धार्मिक, सामाजिक, आर्थिक वगैरे सर्व प्रकारच्या शृंखलांवाचून ज्यांच्याजवळ गमावण्यासारखे दुसरे काहीच नाही. असा जर कोणता गट असेल तर तो अस्पृश्य समाजच होय. हिंदू धर्माने शुद्र गणलेल्या स्पृश्य शेतकरी कामकरी वर्गाला आपण धार्मिक आणि सामाजिकदृष्टया पांढरपेशा वर्गापेक्षा हीन असलो तरी अस्पृश्यांपेक्षा आपला दर्जा उच्च आहे, या भ्रामक भावनेचे समाधान तरी लाभत असते. या भावनेचा त्याग करण्याला स्पृश्य शेतकरी कामकरी नाखुश असतो. नव्हे, त्या भावनेसाठी तो आर्थिकदृष्टया समान पातळीवर असलेल्या आपल्या अस्पृश्य कामकरी बांधवाचा वैरी बनतो.बाबासाहेबांनी म्हटले आहे, अस्पृश्यतेचा प्रश्न हा वर्ग कलहाचा प्रश्न आहे. स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन समाजातील तो कलह आहे. एका माणसावर होत असलेल्या आगळिकीचा प्रश्न नव्हे. एका माणसावर होत असलेल्या अन्यायाचा प्रश्न एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर चालविलेल्या अन्यायाचा प्रश्न आहे. हा वर्ग कलह सामाजिक दर्जासंबंधीचा कलह आहे. एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी वागताना आपले वर्तन कसे ठेवावे, यासंबंधीचा आग्रह धरला म्हणूनच हा कलह उपस्थित होतो. तसे जर नसते तर चपातीचे जेवण घातल्यामुळे तांब्या पितळे भांड्यात पाणी आणल्यामुळे, घोड्यावरुन वरात नेल्यामुळे ही भांडणे झाली नसती. जो अस्पृश्य चपाती खातो. उंची पोशाख करतो. तांब्या पितळेची भांडी वापरतो, घोड्यावरुन वरात नेतो. तो वरच्या वर्गाचे केणतेही नुकसान करत नाही. आपल्याच पदराला खार लावितो असे असताना वरच्या वर्गाला त्याच्या करणीचा रोष का वाटवा? कारण एकच आहे व ते हेच की, अशी समतेची वागणूक त्यांच्या मानहानीला कारणीभूत होते. तुम्ही खालच्या दर्जाचे अपवित्र आहात, खालच्या पायरीने तुम्ही राहिलात तर ते तुम्हांला सुखाने राहू देतील. पायरी सोडली तर कलहाला सुरुवात होते. ही गोष्ट निर्विवाद आहे. वरील उदाहरणांवरुन आणखी एक गोष्ट सिध्द होते ती ही की, अस्पृश्यता ही नैमित्तिक – नित्याची आहे. हीच गोष्ट स्पष्ट भाषेत सांगायची म्हणजे हा स्पृश्य आणि अस्पृश्य या मधील कलह नित्याचा आहे. व तो त्रिकालबाधित असा राहणार आहे. कारण, ज्या धर्मामुळे तुम्हांला खालची पायरी देण्यात आली आहे तो धर्म वरच्या वर्गाच्या म्हणण्याप्रमाणे सनातन आहे. त्याच्यात कोणत्याही प्रकारचा फेरबदल कालमानानुसार होऊ शकत नाही. तुम्ही आज जसे खालचे आहात, तसे तुम्ही नेहमी खालचे राहिले पाहिजे. याचाच अर्थ असा की, स्पृश्य व अस्पृश्य यांच्या मधील हा कलह कायमचा राहणार आहे.”अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया’ या अग्रलेखात अस्पृश्यांनी आर्थिकदृष्टया स्वावलंबी कसे व्हावे, याची चर्चा करताना बाबासाहेब म्हणतात की, ‘तुमच्या आर्थिक परावलंबी अवस्थेचा गैरफायदा घेऊन अस्पृश्यतेची बेडी तुमच्या पायात कायम राहावी यासाठी सवर्ण लोक प्रयत्न करतात. म्हणून शेती, विणकाम आदी जोडधंदे काढून त्यांनी आर्थिक स्वावलंबन केले पाहिजे’. उदा. बाबासाहेबांनी सुचविले आहे, ‘ सर्वच महार लोकांना शेतीवर उपजिवीका करता येईल इतके मोठे क्षेत्र सापडणे कठीण आहे. तेव्हा शेतीला जोडून दुसरा काहीतरी धंदा महार लोकांनी करणे आवश्यक आहे. महार जात ही धंदेवाईक जात नाही. अर्थात तिला जो धंदा करता येईल तो धंदा तिने करण्यास काही हरकत नाही. एवढी गोष्ट कबूल करणे प्राप्त आहे की, पैशाच्या व अनुभवाच्या अभावी श्रेष्ठ प्रतीचे किफायतशीर धंदे या जातीतील लोकांना करता येणे शक्य होणार नाही. शक्य झालेच तर एखादा कनिष्ठ प्रकारचा धंदा हाती घेता यईल. परंतु ब्राम्हण्याच्या भूताटकीने पछाडलेले महार लोक हीन धंदा पत्करण्यात तयार होतील, असे संभवत नाही. ज्या धंदयात स्पर्धा नाही किंवा जो अमूक एका जातीचा धंदा होऊन बसला नाही, असा एखादा धंदा करता येण्यासारखा असला तर तो करण्यास कदाचित महार लोक उद्युक्त होतील. आमच्या मते, अशाप्रकारचा एकच एक धंदा म्हणजे खादी विणण्याचा आहे. व महार लोकांना आमची शिफारस आहे की, तुम्ही खादी विणा”अस्पृश्यांच्या आर्थिक उन्नतीबाबत बाबासाहेब आग्रही होते. कारण, मनुष्य आर्थिक स्थिती सुधारली किंवा राजकीय पदान्नती झाली की, समाजात त्याला आपोआप अधिक मान्यता प्राप्त होते. हा अनुभव युरोप-अमेरिकेत त्यांनी घेतला होता. आपल्याकडे ही गोष्ट इतकी सरळ नाही. तरी पूर्वीच्या काळी व्यक्तीला राज्यपद प्राप्त झाल्यानंतर त्याची व त्याच्या कुटुंबाची सामाजिक पदोन्नती तुरळक उदाहरणे उपलब्ध आहेत. परंतु जाती या नात्याने आर्थिक व सांस्कृतिक दर्जा सुधारला तर त्या जातीला पूर्वीहून अधिक सामाजिक मान्यता मिळू शकते, असे काही उदाहरणावरुन दिसते.महार-वतने, खोती, शेतमजुरांचे प्रश्न हाती घेऊन बाबासाहेबांनी अस्पृश्यांचा आर्थिक प्रश्न हाती घेतला. आर्थिक व अस्पृश्यता हे प्रश्न अत्यंत निगडीत आहेत म्हणून त्याचा विचार स्वतः बाबासाहेब करीत होते. ते म्हणत, ‘मला असे वाटते की, माझा जन्म सर्वसाधारण जनतेची जबाबदारी घेण्यासाठीच असावा. मी देखील मजूर वर्गापैकी एक असून इंप्रूव्हमेंट ट्रस्टच्या चाळीत राहतो. इतर बॅरिस्टरांप्रमाणे मला देखील बंगल्यातून राहता आले असते पण माझ्या शेतकरी व अस्पृश्य बंधुंकरीता चाळीत राहून काम केले पाहिजे. याबद्दल मला केव्हाही वाईट वाटत नाही. मला मुंबईला येऊन अवघी चार वर्षे झाली अत्यंत हीन मानलेल्या समाजात जन्म झाल्यामुळे त्याच समाजासाठी जिवापाड मेहनत करणे मला भाग पडले आहे. तशात अस्पृश्य कामगारांना इतर कामगारांचे हक्क मिळवून देणे माझे कार्य आहे’.बाबासाहेबांना कल्पना होती की, खेडयापाडयात जे अस्पृश्य आहेत ते आर्थिक दृष्टीने असमान असल्यामुळे आर्थिक पिळवणुकीस तोंड देऊन सामाजिक बहिष्कारासारख्या सामाजिक संकटासही तोंड देत आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक मनी आर्थिक स्वावलंबनात आहे.लंडन येथे भरलेल्या गोलमेज परिषदेत दारिद्रय व सामाजिक बहिष्कार ही अस्पृश्य शेतकऱ्यांचे दोन्ही दुःखे त्यांनी आपल्या निवेदनात सांगितली होती. त्यांनी सांगितले होते : ‘अस्पृश्यांचे दारिद्रय ही त्यांच्या मार्गातील दुसरी मोठी धोंड आहे. मुंबई इलाख्यातील बहुतेक अस्पृश्य जनता परावलंबी आहे. काही जण स्पृश्य सनातन्यांच्या, तर काही जण मजूर म्हणून या लोकांच्या शेतावर खपून आपली पोटे भरतात. बाकीच्यांचा उदरनिर्वाह, गावकीच्या नोकरीबाबत (बलुते) गावकरी लोकांकडून मिळणाऱ्या अन्नावर व धान्यावर होते. अस्पृश्यांनी जरा स्वाभिमान दाखविला की, हे सनातनी स्पृश्य गावकरी त्यांच्याकडून जमिनी घेतात. त्यांना आपल्या कामावरुन दूर करुन त्यांची रोजची मीठ-भाकरी बंद करतात’. बाबासाहेबांचे हे मूलगामी विचार अतिशय अभ्यसनीय आहेत.

नानासाहेब गव्हाणे

लेखक हे वालचंद महाविद्यालय,सोलापूर येथे पदव्युत्तर मराठी विभागात अध्यापनाचे कार्य करत असून प्रगतिशील लेखक संघ, सोलापूरचे सदस्य आहेत.

संदर्भ व सूची:

१) ‘आंबेडकरी चळवळ’ – य.दि. फडके, पृ. क्र. ८८-८९, २) ‘आंबेडकरी चळवळ’ – य.दि. फडके, पृ. क्र. ८८, ३) ‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात’, शंकरराव खरात, पृ.क्र. १२९-१३०, ४) ‘बहिष्कृत भारत’, डॉ. आंबेडकरांचे अग्रलेख, रत्नाकर गणवीर, पृ.क्र. ३८६

2 Comments

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक सबलीकरणातून सामाजिक समता साधण्याचा कालजयी तत्त्वज्ञान सोदाहरण स्पष्ट करणारा अप्रतिम लेख.

Leave a Reply

Your email address will not be published.


*