नानासाहेब गव्हाणे
✒️ सावित्रीबाई फुले : उद्यमशील समाज शिक्षिका
शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या सावित्रीबाईंना आपण पहिल्या शिक्षिका म्हणून ओळखतो. आपले पती जोतिबा फुले यांना त्यांनी विविध पत्रं लिहिली होती.
या पत्रांतून त्यांच्या अंगी असलेल्या विविध गुणांचं दर्शन होतं. कधी त्या सामाजिक सुधारणेसाठी ठाम भूमिका घेतात, तर कधी वास्तवाची दाहकता दाखवतात.या त्यांच्या पत्रांतून उद्यमशीलतेचा प्रत्यय येतो.त्या किती अविरत कार्यरत होत्या.आणि त्यांच्या कार्यशीलतेत किती तळमळ होती.हे आपल्याला सहज लक्षात आल्याशिवाय राहत नाही.त्यांच्या या धडपडीचे चित्र जोतिबांना लिहिलेल्या काही पत्रांतून आपल्याला घडते.
सावित्रीबाईंनी जोतिबांना लिहिलेली ही तिन्ही पत्रं महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या ‘सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय’ या पुस्तकात समाविष्ट केलेली आहेत.
□ आंतरजातीय विवाह आणि कुमारी माता :
सावित्रीबाईंनी लिहिलेल्या या पत्राची तारीख ही 29 ऑगस्ट 1868 आहे. पण त्यावेळचं हे वास्तव आजही आपण आजूबाजूला पाहतो. शहरी भागातील मूठभर अपवाद वगळता भारताच्या ग्रामीण भागात आजही आंतरजातीय विवाह ही सहजसोपी गोष्ट नाही.
“सत्यरूप जोतिबा स्वामी यांस,
सावित्रीचा शिरसाष्टांग दंडवत,
पत्रास कारण की , येथे एक अघटित वर्तमान घडले. गणेश नामे एक ब्राह्मण यास पोथी पुराणांचा नाद असून गावोगाव फिरून पंचांग सांगून उदरनिर्वाह करत करत गावी येता झाला. परंतु येथील नुकतीच वयात आलेली सारजा नामक पोरीवर त्याची प्रीती जडली असोन, त्यापासून तीस सहा महिने दिवस गेले आहेत. त्याचा बोभाटा होऊन गावातील दुरमती दुष्ट टवाळांनी त्या उभयतांस आणून मारपीट करुन गावातील गल्लीबोळातून वाजतगाजत मिरवत ठार मारण्यास चालविले. ही भयंकर गोष्ट मला कळताच मी तेथे धावतपळत गेले व त्या लोकांस इंग्रज सरकारचे भय दाखविले व त्या क्रूर कर्मापासून वळविले. सदुभाऊने तोडीमोडी दावून बोलणे केले की, या भटुकड्याने या महारणीने आमचे गाव सोडून जावे. हे उभयतांनी कबूल केले. या उभयतांस मी वाचविले…
आपली
सावित्री जोतीबा”
- सावित्रीबाई फुले समग्र वाङमय (सावित्रीबाईंनी लिहिलेल्या पत्रामधून)
आंतरजातीय विवाहांना विरोध करणाऱ्या खापपंचायत, जातपंचायत या व्यवस्था समाजात आजही अस्तित्वात आहेत. ऑनर किलिंग, घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी केल्या जाणाऱ्या हत्या आजही होत आहेत.
विवाहाच्या आधीचं मातृत्व, लग्नाआधीचं गरोदरपण आजही कलंकित मानलं जातं. देशातले सगळे अनाथाश्रम प्रामुख्याने या अशा अविवाहित मातृत्वातून जन्माला आलेल्या संततीनेच भरले आहेत.
या अशा स्थितीत 1868 मध्ये आंतरजातीय प्रेम आणि विवाहपूर्व गरोदरपण या गोष्टी तत्कालीन समाजाला मृत्युदंडाची शिक्षा फर्मावण्याएवढ्या भयानक वाटल्या तर त्यात नवल ते काय?
इथे आश्चर्यकारक गोष्ट अशी घडली की, एक 37 वर्षांची स्त्री ही बातमी कळताच ताडकन उठली आणि धावत घटनास्थळी गेली. एवढंच नाही तर जमलेल्या गर्दीला इंग्रज सरकारची, आजच्या भाषेत कायद्याची भीती दाखवत तिने त्या जोडप्याला गर्दीच्या तावडीतून सोडवलं. त्यांचा जीव वाचवला.
गर्दीला आडवं जात त्या जोडप्याच्या बाजूने ठामपणे उभी राहणारी स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले. आंतरजातीय प्रेम आणि विवाहपूर्व गरोदरपण या दोन्ही गोष्टींकडे सावित्रीबाई गुन्हा म्हणून बघत नाहीत, त्या तरुणीला कलंकित मानत नाहीत तर एक सहज मानवी व्यवहार म्हणूनच त्या या सगळ्या घटनांकडे बघतात. म्हणूनच समाज आणि ते जोडपं या दोघांच्या मध्ये त्या उभ्या राहतात.
खुद्द सावित्रीबाईंनी जोतिबा यांना लिहिलेल्या पत्रांमधून ही घटना आपल्याला कळते.
सावित्रीबाईंनी जोतिबांना लिहिलेली तीन पत्रं आज अभ्यासकांना उपलब्ध झाली आहेत. यातील पहिलं पत्रं 1856 चं आहे, दुसरं 1868 चं आहे तर तिसरं पत्रं 1877 चं आहे. ही तिन्ही पत्रं सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्त्वातील वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकतात.
सावित्रीबाईंची ओळख केवळ पहिल्या महिला शिक्षिक एवढ्यापुरतीच मर्यादित नाही तर स्वतंत्र बाण्याची क्रांतिकारक स्त्री, हीच त्यांची खरी ओळख आहे, हेच या पत्रांमधील सावित्रीदर्शनानं स्पष्ट होतं. घराबाहेर पडून सार्वजनिक कार्य करणारी आद्य सामाजिक कार्यकर्ती जशी या पत्रांमधून आपल्याला भेटते तसंच काळाच्या पल्याड पाहणारी, तिची मानवी हक्कांची भाषा उमगलेली एक संवेदनशील वैचारिकताही समोर येते.
□ दुष्काळग्रस्तांना मदत :
सावित्रीबाईंनी जोतिबांना लिहिलेलं दुसरं पत्र त्यांनी आपल्या माहेरगावाहून म्हणजे नायगावहून लिहिलं आहे. तिसरं 1877 चं पत्रं त्यांनी ओतूर, जुन्नर या भागातून लिहिलं आहे. हे पत्र वाचताना सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्वाचा व्यापक परीघ लक्षात येतो.
एकोणिसाव्या शतकात 1876 आणि 1896 असे दोन मोठे दुष्काळ पडले होते. 1876-77 मधला दुष्काळ हा एकोणिसाव्या शतकातला सर्वांत भीषण दुष्काळ मानला जातो. या दुष्काळात सावित्रीबाई सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांसोबत गावोगाव फिरून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे काम करत होत्या.
हे काम करत असताना जुन्नरहून 20 एप्रिल 1877 ला जोतिबा फुले यांना लिहिलेल्या पत्रात सावित्रीबाई तत्कालीन भीषण दुष्काळाचं वर्णन करताना लिहितात-
” पत्रास कारण की गेले 1876 साल लोटल्यानंतर दुष्काळाची तीव्रता अधिक वाढून सर्वजण व जनावरे चिंताक्रांत होऊन गतप्राण होत धरणीवर पडू लागली आहेत. माणसांना अन्न नाही, जनावरांना चारापाणी नाही, यास्तव कित्येक देशांतर करुन आपले गाव टाकून जात आहेत. कित्येक पोटची पोरे व तरण्याबांड पोरी विकून परागंदा होत आहेत. नद्या, नाले शुष्क व कोरडे ठणठणीत होऊन मृगजलानी व्याप्त झाले आहेत. झाडाझुडपांची पाने वाळून ती भूमीवर पडली आहेत. भूमीला भेगा पडल्या असून त्यातून अंगाला झोंबणाऱ्या झळ्या बाहेर पडतात. अनेक लोक क्षुधित व तृषाक्रांत होऊन भूमीवर पडून मरत आहेत. कित्येक निवडुंगाची बोंडे अन्न म्हणोन खातात व मूत्र पाणी म्हणोन पितात व संतोष पावतात. देहत्यागापूर्वी भूकेची व तहानेची इच्छा पुरवितात व मृत्यूच्या स्वाधीन होतात, असे इकडचे भयानक वर्तमान आहे. ”
- सावित्रीबाई फुले समग्र वाङमय (सावित्रीबाईंनी लिहिलेल्या पत्रामधून)
दुष्काळाच्या तीव्रतेची, तत्कालीन सामाजिक परिस्थितीची माहिती सावित्रीबाई जोतिबांना कळवत आहेत. सत्यशोधक कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्त भागातील लोकांना अन्नधान्य पुरविण्यासाठी दुष्काळनिवारण समित्या स्थापन केल्या होत्या. त्याची माहितीही सावित्रीबाई देतात.
यावेळी जोतिबा नगरला काही कामानिमित्त गेले होते. त्यामुळे सावित्रीबाई त्यांना या पत्रात कामाचा सगळा तपशील देत आहेत. दुष्काळग्रस्त भागात काम करताना सावित्रीबाई प्रत्यक्ष इंग्रज अधिकाऱ्यांशी चर्चा करत होत्या. आपल्या कार्यकर्त्यांवर घेतला जाणारा आळ दूर करत होत्या.
सावित्रीबाई लिहितात,-
“दुसरी चिंतेची बाब अशी की, सावकारांना लुटावे, त्यांची नाके कापावी अशी दुष्ट कर्मे या भागात घडत आहेत. तस्मात मोठेमोठे दरोडे पडत आहेत. हे श्रवण करुन कलेक्टर तेथे आला. त्याने मसलत केली. गोरे सार्जंट पाठवून बंदोबस्त बसविला. 50 सत्यशोधक पकडून नेले. त्याने मला बोलाविले. तेव्हा मी उत्तर केले की आमच्या लोकांवर आळ व कुभांड घेऊन कैदेत ठेवले ते सोडा. कलेक्टर न्यायी आहे. तो गोऱ्या फौजदारास रागे भरुन बोलला की, पाटील का दरोडे घालतात. त्यांना सोडून दे. कलेक्टर दुष्काळ पाहून कष्टी झाला व कळवळून त्याने आपल्या केंद्रात ज्वारीच्या चार गाड्या पाठविल्या आहेत. ”
- सावित्रीबाई फुले समग्र वाङमय (सावित्रीबाईंनी लिहिलेल्या पत्रामधून)
सावित्रीबाईंनी कलेक्टरशी जी चर्चा केली तिचा सकारात्मक परिणाम झाला होता. सत्यशोधक कार्यकर्त्यांची सुटका तर झालीच पण त्यांच्या दुष्काळनिवारण केंद्राला मदतही मिळाली. एक नेत्या म्हणून असलेलं सावित्रीबाईंचं ठसठशीत रूप आपल्याला इथे दिसतं.
मुळात सावित्रीबाईंचं पत्रलेखन हीच गोष्ट त्या काळाचा विचार करता अनोखी आहे. त्याकाळात पत्नीने पतीला पत्र पाठविणे हीच गोष्ट काळाच्या पुढची होती. एकांताशिवाय चार माणसात पतीपत्नीने एकमेकांशी बोलणं हेच तेव्हा शिष्टाचारात बसत नव्हतं.
शिवाय महिलांपर्यंत शिक्षणच पोहोचलेलं नसल्याने राजघराण्यातील महिला वगळता सर्वसामान्य महिलांचं पत्रलेखन ही बाबच अस्तित्त्वात नव्हती. या अशा काळात सावित्रीबाई पतीला पत्रं लिहित होत्या.पत्रांमधून कोणत्याही कौटुंबिक, खासगी बाबींची चर्चा न करता हाती घेतलेल्या सामाजिक कार्याविषयी लिहित होत्या. ही पत्रं बारकाईने वाचली असता लक्षात येतं की हे केवळ पतीपत्नीमधलं हितगुज नाही तर एकाच कार्यात गुंतलेल्या दोन सहकाऱ्यांचा हा संवाद आहे. - ‘सदासर्वदा कामात गुंतावे’
सावित्रीबाईंनी 1856 मध्ये लिहिलेलं पहिलं पत्रं याद्दष्टीने अधिक बोलकं आहे.
हे पत्रं लिहिताना सावित्रीबाई नायगावला आपल्या माहेरी आहेत. तिथे सावित्री-जोतिबा शूद्र-अतिशूद्रांसाठी काम करतात म्हणून सावित्रीबाईंचा लहान भाऊ त्यांना दोष देत त्यांचे कार्य कुळाला बट्टा लावणारे आहे, असे म्हणतो.
पण, सावित्रीबाई संतप्त न होता शांतपणे प्रतिवाद करतात. याविषयी त्या पत्रात लिहितात-
” मी त्याच्या मताचे खंडन करुन बोलले, भाऊ तुझी बुद्धी कोती असून भट लोकांच्या शिकवणुकीने दुर्बल झाली आहे. तू शेळी, गाय यांना जवळ घेऊन कुरवाळतोस, नागपंचमीस विषारी नाग पकडून त्यास दूध पाजतोस. महार-मांग हे तुझ्यासम मानव असतात. त्यास अस्पृश्य समजतोस त्याचे कारण सांग, असा त्यास प्रश्न केला. ”
- सावित्रीबाई फुले समग्र वाङमय (सावित्रीबाईंनी लिहिलेल्या पत्रामधून)
इथे भाऊ आपल्याला काही बोलला त्याचा राग न मानता सावित्रीबाई त्याचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्याहीनता ही पशुत्वाची खूण आहे, असे सांगून जोतिबा महारमांगांना शिकवतात यात अनुचित काय आहे, असे त्याला विचारतात.
भावाबरोबरच्या या वादात सावित्रीबाई एक महत्त्वाचं विधान करतात. त्या सांगतात , ” या कामायोगे मला परमानंद होतोच होतो. या व्यतिरिक्त मनुष्याची सीमा द्दग्गोचर होते . ” प्रत्येकानं स्वत:च स्वत:च्या सीमा पाहिल्या पाहिजेत, वाढवल्या पाहिजेत.”
भावाबरोबरचा आपला हा संवाद पत्राने जोतिबांना सांगत असतानाच सावित्रीबाईंमधील कार्यकर्ती जोतिबांनाही शेवटी सांगते,
” पुण्यात आपल्याविषयी दुष्टावा माजविणारे विदूषक पुष्कळ आहेत. तसेच येथेही आहेत. त्यांना भिऊन आपण हाती घेतलेले कार्य सोडून का द्यावे? सदासर्वदा कामात गुंतावे. ”
- सावित्रीबाई फुले समग्र वाङमय (सावित्रीबाईंनी लिहिलेल्या पत्रामधून)
टीकेला न घाबरता हाती घेतलेले काम करत राहावे, असं सांगत सावित्रीबाई इथे कर्मसिद्धांतच मांडत आहेत. मानवतेचा धर्म मानणाऱ्या सावित्रीबाईंचं हे कर्मवादिनीचं रूप त्यांच्या तिन्ही पत्रांमधून उलगडतं. समाजक्रांतीचं कार्य करणाऱ्या एका निर्भीड कार्यकर्तीचं दर्शन या पत्रांमधून होतं. त्यामुळेच ही तिन्ही पत्रं म्हणजे एक महत्त्वाचा सामाजिक, ऐतिहासिक दस्तावेज आहेत.
( सावित्रीबाई फुले यांनी जोतिबांना लिहिलेली ही तिन्हीपत्रं महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या ‘सावित्रीबाई फुले समग्र वा ङम य’ या पुस्तकात आहेत. या पुस्तकाचं संपादन डॉ. मा. गो. माळी यांनी केलं आहे. पहिली दोन पत्रं मोडी लिपीत असून ती मूळ स्वरुपात आहेत. सावित्रीबाईंचे तिसरं मूळ मोडी लिपीतले पत्र उपलब्ध नसून त्याचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे. मूळ पत्रांमधील सावित्रीबाईंचे हस्ताक्षरही त्यांचेच आहे, याविषयीची खुलासाही माळी यांनी पुस्तकात केला आहे .)
नानासाहेब गव्हाणे
लेखक मराठी भाषा आणि साहित्याचे अभ्यासक आहेत.
- सावित्रीबाई फुले : उद्यमशील समाज शिक्षिका - January 3, 2022
- आधुनिक मराठी साहित्याचे जनक – महात्मा फुले - December 10, 2021
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता आणि सद्यस्थिती - December 6, 2021
Leave a Reply