बुळे पठार: ब्राम्हणी व्यवस्थेविरुद्ध ‘उलगुलान’ पुकारलेले गाव

प्रकाश रणसिंग

ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक कवी वाहरु भाऊ सोनवणे म्हणतात ‘ते’ आम्हाला दूरची वस्ती समजतात. तसेच त्यांच्या गाजलेल्या स्टेज या कवितेत वाहरु भाऊ म्हणतात आमचे दु:ख त्यांचे कधी झालेच नाही. भटक्या विमुक्तांचे नेते लक्ष्मण माने आपल्या एका भाषणात सांगतात, आदिवासिंना केवळ शोभेची वस्तु म्हणून मिरवलं जातं माणूसपण नाकारलं जातं. ह्या सगळ्या ब्राम्हणी व्यवस्थेविरूद्ध संविधानिक मार्गाने लढा देणाऱ्या बुळे पठार गावचा तिसरा वर्धापण दिन नुकताच मोठ्या उत्सहात पार पडला.


स्वतंत्र आदिवासी गाव बुळे पठार. अहमदनगर जिल्ह्यातील पश्चिम भागातील राहुरी तालुक्यातील शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या असलेले गाव. सह्याद्रीच्या डोंगर रांगामधील प्रमुख आदिवासी जमाती मधील महादेव कोळी,ठाकर, भिल्ल ह्या गावात आहेत. बुळे पठार गावाला संघर्ष आणि लढ्याची पार्श्वभूमी आहे नैसर्गिक परिसंस्था जपत जल, जमीन, जंगला सोबत आत्मिक नातं जपत रहिवास करत जल, जमीन, जंगलांच्या रक्षणासाठी इंग्रजांशीही लढा दिला आहे. राघोजी भांगरे, राया ठाकर, हणमंत नाईक, तंट्या मामा अशा बंडकऱ्यांची आणि छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, यांच्या लढ्याची प्रेरणा बुळे पठार गावाला असलेली दिसते. सन २००८ पासून ते आत्ता पर्यंत सलग आठ वर्षे श्रमिक मुक्ती दल ( लोकशाही वादी) व डॉ.जालिंदर घिगे आणि बुळे पठारच्या लोकांनी वेळोवेळी निवेदने,मोर्चा,आंदोलने करून बुळे पठार गावाला स्वतंत्र गावचा दर्जा मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. येत्या काही दिवसांत स्वतंत्र ग्रामपंचायत ही गावाला मिळेल.
दिनांक ११ जून रोजी बुळे पठार गावाचा तिसरा वर्धापन दिन अगदी सनाप्रमाणे साजरा केला. राज्यभरातून कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. हा वर्धापण दिन म्हणजे केवळ उत्सव नव्हता तर सामाजिक आणि राजकीय आर्थिक विषमते विरुद्धच्या एकूणच ब्राम्हणी व्यवस्थे विरुद्ध गावाने केलेल्या पहिल्या लढ्याचा वियोत्सव होता असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. या निमित्त धरतीआबा बिरसा मुंडाच्या घोषणेप्रमाणे उलगुलान करणाऱ्या गावाबद्दल लिहणं आत्ताच्या एकूण ध्रुवीकरणाच्या मूलभूत हक्कांवरती आक्रमण होत असतानाच्या वातावरणात महत्वाचं ठरतं.

स्वतंत्र ग्रामपंचायत मिळेपर्यंत बिगर आदिवासी समाजातील गावात बुळे पठारचा वस्ती वजा समावेश होता. स्वतंत्र महसुली गाव दर्जासाठी आवश्यक असणारी लोकसंख्या आणि क्षेत्र ह्याची पूर्तता असूनही स्वतंत्र ग्रामपंचायत शासनाने दिली नव्हती. एका बाजूला डोंगर दऱ्यात राहणारे आदिवासी समुह आणि दुसऱ्या बाजूला संपूर्णत सपाट बागायती क्षेत्रात असलेला मराठा आणि इतर जात समूह अशी एकूण परिस्थिती. ग्रामपंचायत मधील इतर जात समूहांच्या वर्चस्वामुळे विविध योजना, आणि मूलभूत हक्कांच्या पासून बुळेपठारच्या लोकांना डावलले जात. सोबतच पाण्याची, रस्ते,शिक्षण,दवाखाना इत्यादी मूलभूत सोयी सुविधा पासूनही वंचित राहत होते.

अशा सर्व परिस्थिती डॉ.जालिंदर घिगे ( सचिव- विद्रोही सांस्कृतिक चळवळ, सरपंच,कोळेवाडी) यांनी गावात काम करायला सुरवात केली. ते स्व:त आदिवासी असल्याने नेणीवेच्या पातळीवर प्रश्नांची जाणिव तर होतीच त्यामुळे सांस्कृतिक मूल्यांच्या सोबतच स्वाभिमानी उपजीविका, सांविधानिक हक्क यांची सांगड घालत त्यांनी पाणी, रस्ते, वनहक्कसाठी आंदोलन चालवले.आत्ता पर्यंत आदिवासींना केवळ टोकन म्हणून वापरले पण जर आदिवासिंची गावात स्वतंत्र ग्रामपंचायत असेल असेल तर आपले प्रश्न आपल्याला सोडवता येतील. ग्रामपंचायत आणि इतर माध्यमातून होणारा अन्याय दूर होईल. त्यामुळे स्वतंत्र आदिवासी गावची निर्मितीची मागणीसाठी सलग आठ वर्षे आंदोलन केले.
सामाजिक आणि राजकीय हक्कांच्या सोबत बूळे पठारच्या लोक आदिवासी मूल्यांच्या आधारित सांस्कृतिक वेगळेपण अधोरेखित करत आहेत. ज्या ब्राम्हणी सांस्कृतीक रचनेने माणसं माणसात भेदभाव केला. माणूस म्हणून जगण्याचा आधिकार नाकारला,उत्पन्नाच्या साधनावारील हक्क नाकारला त्या व्यवस्थेविरोधात जल,जमीन, जंगलाच्या संस्कृती सोबत सांस्कृतिक एकाधिकारशाहीच्या काळात संघर्ष करत आहेत ही मोठी गोष्ट आहे.
जल,जमीन, जंगलासाठी इंग्रजांबरोबर संघर्ष केलेल्या, राघोजी भांगरे, राया ठाकर, हणमंत नाईक, तंट्या मामा, ह्या सारख्या आदिवासी महानायकांची ब्राम्हणी इतिहासकारांणी नोंदही घेतली नाही. अशा महानायकांचा स्मृती उत्सव बुळे पठारचे लोक साजरा करतात. वेगवेगळे सन उत्सव आदिवासी संस्कृतीप्रमाणे साजरे करतात.लादलेली, एकमेकांत भेद करणारी ब्राम्हणी प्रतिकं बुळे पठारच्या लोकांनी नाकारली. ‘फडकी’ हे त्याचे उदाहरण आहे. ‘फडकी’ बुळे पठार आणि इतर आदिवासी गावांचे सांस्कृतिक प्रतीक बनत आहे. ठाकर ह्या आदिवासी जमातीतील महिला पारंपारिक वस्त्र म्हणून फडकी वापरतात. दररोजच्या उपयोगात असणारे,आपल्या अवतीभवतीच्या गरजाशी बांधील असणारी फडकी बूळे पठार सहित शेजारच्या आदिवासी गावांची ओळख होत आहे. वह्या ( गाण्याच्या प्रकार) सारखी गाण्यांची, गाण्यातून पूर्वजांचा इतिहास सांगण्याची लोप पावत असलेली परंपरा ओपासणा करू पाहत आहेत. हे काही ठळक उदाहरणे आहेतच परंतु त्याही सोबत आदिवासी समाजात पूर्वी पासून असणारे सहजीवणाचे तत्व आणि सामूहिक निर्णय प्रकिया अधिक भक्कम होत असलेली दिसते. बैठक घेऊन मतभेद लक्षात घेऊन सर्व निर्णय घेतात. ह्या सर्व सांस्कृतिक घटकांच्या सह तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी ही प्रशासनाला लोकशाही मूल्ये गावातील लोक समजावून सांगत आहेत.

ब्राम्हणी व्यवस्थेने देशात तयार केलेला धार्मिक उन्माद, एकमेकांच्या विषयीचा तिरस्कार, सांस्कृतिक हुकूमशाही, झुंडशाही अशा वातावरणात बुळेपठार गाव एक स्वतंत्र दर्जासह समतावादी, लोकशाहीवादी परंपरा जोपासत आहेत.आणि इथल्या ब्राम्हणी व्यवस्थेला धक्का देत आहेत. समाजसुधारकांची झूल पांघरलेल्या ब्राम्हणी कावेबाजांनी आदिवासिंना केवळ चॅरिटी पुरतं मर्यादेत ठेवलं. आदिवासींच्या परिस्थितीबाबत सत्तेला प्रश्न विचारलं नाही की आदिवासींच्या मधून आदिवासी नेतृत्वाला संधी दिली नाही. परंतु डॉ.घिगे सारख्या आदिवासी नेतृत्वाने लोकांना हक्क आधारित दृष्टिकोन देत आहेत. ह्या देशाच्या संपत्तीत आमचा ही हक्क आहे. त्यासाठी संविधानिक मार्गाने आदिवासी सांस्कृतिक मूल्यांना सोबत घेऊन लढणारी माणसं, पुढारी बुळे पठार मधून तयार केली आहेत.
मध्यंतरी समृती उत्सवाच्या तयारी साठी रात्री आठ वाजता गावच्या मध्ये असणाऱ्या एका डोंगरावर बसून बैठक सुरू होती. तेव्हा लोक लाईटची,पाण्याचे, शेतीचे प्रश्न,मजुरी,रोजदारी वर चर्चा करत होते. त्याच वेळेस चांदण्या रात्री आकाशातून विमान क्रॉस होत होते. ब्राम्हणी भांडवली विकासाचा हा विषमतावादी पॅटर्न लोकांच्या आदिवासी, दलित, भटक्या, विमुक्तांना मूलभूत गरजापासून आणि जगण्याच्या हक्कापासून वंचित ठेवत आहेत. या विरुद्ध लोक आपल्या स्तरावर संघर्ष करत आहे. सत्तेत आपला वाटा लढून मिळवत आहेत. परंतु काही प्रश्न अजूनही शिल्लक आहेत त्यासाठीही लोक लढत आहेत इतर ठिकाणच्या आदिवासी चळवळी सोबत जोडून घेत आहेत.आत्ता आसपासच्या गावांनी बुळे पठारच्या एकूण संघर्षाचा आदर्श घेऊन आदिवासी अस्मितेसहित भौतिक प्रश्नावर काम एकत्र येऊन काम करायला सुरवात केली आहे.
ह्या लढ्यात स्थानिक कार्यकर्त्याणी बिनीचे शिलेदार म्हणून काम केले. आमच्या लढ्याचे नेतृत्व आम्ही स्व:त करू अशी भूमिका घेऊन सो कॉल्ड ब्राम्हणी समाज सुधारकांना नाकारले. डॉ. जालिंदर घिगे म्हणतात, ‘स्थानिक लढाऊ कार्यकर्त्यांची फळी असल्या शिवाय कोणताच लढा शक्य होत नाही’. ह्या लढ्यात निवृत्ती वाघ, भिका वाघ, कैलास बुळे, हिरामण भुतांबरे, मच्छिंद्र दुधवडे, रघू बुळे, युवराज मधे, लक्ष्मण वाघ, सखाराम वाघ, गंगाराम वाघ, भिवा केदार, राजेंद्र जाधव, महादू दुधवडे, रेवजी दुधवडे, संजय दुधवडे, तावजी केदार, शिल्पा दुधवडे ई व नव्याने विचार करू लागलेले भोरू केदार, बबन पथवे, सोपान कातोरे, महेंद्र कातोर, भाऊसाहेब बुळे, गोरख जाधव, संगीता केदार, ई मुळे हा लढा नेटाने पुढे जात आहे. सोबतच विद्रोही आणि श्रमिक मुक्ती दलाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी वेळ देऊन काम केले आहे. संदीप कोकाटे, किरण विधाटे, शशिकांत विधाटे, गंगाभाऊ काकडे, सुनील गुलदगड, प्रकाश रणसिंग, कुमार भिंगारे, काशिनाथ कोकाटे, विवेक तळपे, उत्तम बर्डे,सागर दोंदे कार्यकर्त्याणी वेळ देऊन काम केले आहे.

भौतिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही बाजूनी गावांनी काम केले पहीजे हे बुळे पठारच्या लोकांनी दाखवून दिले आहे. गाडगे बाबांणी आपले काम केवळ स्वच्छते पुरते मर्यादित ठेवले तर सांस्कृतिक नेनीवा घडविण्याचं काम ही केलं त्यामुळे दोन्ही पातळीवर संघर्ष करत राहणे गरजेचे आहे. बुळे पठार लोक ते करत आहेत. त्यांच्या कामासोबत आणि ह्या सर्व लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या डॉ.जलिनदार घिगे यांच्या सोबत उभं राहणे आवश्यक आहे. कारण ब्राम्हणी व्यवस्थे विरुद्ध बुळे पठार सारख्या गावातील लोकं आणि डॉ. जालिंदर घिगे सारखे ऑर्गनिक लीडर धक्का देऊन नवे समतावादी पर्याय देऊ शकतात.

प्रकाश रणसिंग
विद्रोही विद्यार्थी संघटणेचे राज्य निमंत्रक आणि आदिवासी प्रश्नांचे अभ्यासक/ संशोधक आहेत
Prakashransing@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*