राजाभाऊ: एक धम्म अन्वयार्थी निघून गेले!

शांताराम पंदेरे

७० च्या दशकात पारंपरिक काँग्रेसवासी रिपब्लिकन पक्ष आणि वाढत जाणाऱ्या दलित अत्याचारांविरोधी बंड करणारे आदरणीय राजाभाऊ ढाले आपल्यातून निघून गेले!! त्यांच्या सोबतच्या प्रेरणादायी आठवणींना विनम्र अभिवादन! जय भिम!!

फुले-आंबेडकरी इतिहास, विचार आणि चळवळीचे भाष्यकार आणि 1972 मध्ये आदरणीय नामदेव ढसाळ आणि अन्य सहकाऱ्यांसोबत राजाभाऊंनी “दलित पँथर” उभी केली. मुंबईसह महराष्ट्रातील सा-या गावातील गावकुसाच्या आत व बाहेर एक जबरदस्त झंझावात निर्माण केला. शहरात शिकणारे तरूण-तरूणी आणि गाव-झोपडपट्या-कामगार-कष्टकऱ्यांच्या चाळींपर्यंत सा-या अशिक्षीत-अर्धशिक्षीतांपर्यंत सा-यांमध्ये ‘दलित पँथर’ हे वादळ पोहोचले होते. दलित विशेषत: तत्कालीन ज्यांना नव-बौध्द म्हटले जात होते आणि बाबासाहेबांच्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयांत शिकणारे काही विद्यार्थीही यात प्रभावित झाले होते.

या चळवळीचे एक मुख्य केंद्र बि.डी.डी.चाळी, वरळी (मुंबई) येथे होते. 70-80 च्या दशकात वरळीसह, नायगांवच्या बि.डी.डी.चाळी, शेजारच्याच आमच्या कोहिनुर मिल्सच्या चाळींची त्यावेळची अवस्था पाहायचो, अनुभवायचो; त्यापेक्षा पुणे येरवडा, मुंबईचा आर्थर रोड, औरंगाबादचा हर्सुलचा तुरुंग बरा अशी अवस्था होती. आता तर विचारूच नका.

दलित पँथरचे बंड काँग्रेसला शरण गेलेल्या व कायम आपल्याच कुटूंबात सत्ता भोगणा-या पारंपारिक रिपब्लिकन नेतृत्वाविरुध्द्व होते. काहींचे तर नायगांव, मुंबईला रस्त्यावर कपडे फाडल्याचे त्यावेळी ऐकलेही होते. तसेच सभोवतालच्या परिस्थितीने लुटलेला, गुलामी लादलेल्या व्यवस्थेविरुद्धही या युवकांनी बंड केले होते. काँग्रेस राजवटीमध्ये सतत दलितांवर अत्याचार वाढत होते. यातच पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधील बावडा प्रकरण बाहेर आले. पाठोपाठ धायरीच्या गवई बंधूंचे डोळे गावातील स्वत:ला उच्च मानणा-या शक्ती-व्यक्तिंनी फोडले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या युवकांना दलित पँथर चळवळ उभी करायला वातावरण तयार झाले.

राजाभाऊंचे वैशिष्ट्य म्हणजे राजाभाऊ एखाद्या आंदोलनात स्वतः भाग घ्यायचे. त्यानुसार वरळी हिंसाचारांनंतर वरळीतच निषेध मोर्चा काढला होता. आदरणीय नामदेव ढसाळ, राजाभाऊ ढालेंनी नेतृत्व केलेल्या संतापलेल्या या मोर्च्यात मी पण सहभागी झालो होतो.

त्यानंतर आम्हाला अटक झाली. एकाच तुरुंगात साऱ्या युवकांना ठेवल्यास सरकार व पोलिसांच्या आवाक्याबाहेरची परिस्थिती निर्माण होईल म्हणून आम्हाला मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात डांबले होते.

माझ्या नायगावच्या घराजवळच्या भोईवाडा पोलिस ठाण्यात राजाभाऊंसोबत मीही अटकेत होतो. राजाभाऊ पोलीस लाठीहल्ल्यात जखमी झाले होते. तेथे पोचल्यावर त्यांच्या डोक्यावर मोठी खोक-जखम झाल्याचे दिसले. सारे डोके रक्तबंबाळ झाले होते. डॉक्टरी इलाज करण्यापूर्वी त्यांच्या डोक्यावरील सारे केस भादरून टाकले होते.

त्यावेळी माझ्या घरच्यांना प्रथमच समजले कि, “मी हे सारे धंदे करतो.” पण मी कोणतीही चोरी, लबाडी, गुंडगिरी करून तुरुंगात गेलो नव्हतो तर यामागे अन्य सामाजिक कारणे आहेत. “राजाभाऊंसारखी मोठी माणसे माझ्यासोबत आहेत” हे घरच्यांना पटवून देण्यात मला यश आले होते.

नंतर राजाभाऊ सतत आग्रहाने मांडणी करत, “दलित पँथर हा आमचा मोठा उठाव होता. त्यांनतर आम्ही स्वत:ला गुलामीतून मुक्त करून घेतले आहे. त्यामुळे मी आता दलित नाही. त्यांचे हे सारे चिंतन “फुले-आंबेडकरी” दृष्टिकोणातून होते. राजाभाऊ ब-याचवेळा माणसाला फुले-आंबेडकरी चष्मा लावलेले (फुले-आंबेडकरी दृष्टी असलेला माणूस) चिन्ह ते वापरत असत. त्याचवेळी दलित साहित्यही पुढे येत होते. विविध नियतकालिकं-अनियतकालिकंही प्रसिध्द होत होती.

डॉ.बाबासाहेबांनी महाडला मनुस्मृती जाळून नाकारली. त्यानंतर त्यांनी संधी मिळताच स्वतंत्र भारताच्या उभारणीसाठी देशासाठी राज्यघटना लिहिली. भारतातील तमाम शोषितांसाठी, परंपरेने गुलामी लादलेल्या समूहांना सन्मानाने जीवन जगता येईल अशी घटनेमध्ये तजवीजही करून ठेवली. तर दुस-या बाजूला पूर्वास्पृश्यांना सोबत घेवून बौध्द धम्माचा स्विकार केला. हा नवा धम्म आणि राज्यघटना यात त्यांनी कधीच गल्लत केली नाही. पण या दोन्ही बाबी परस्पर विरोधीही नाहित हेही त्यांनी पाहिले. कोणताही धर्म-धम्म आणि राज्यघटना याचा थेट सबंध येणार नाही असेही पाहिले. त्याचवेळी बाबासाहेब हेही म्हणताना दिसतात की, बौध्द धम्म ही जीवन पध्दती आहे. तिचे अनुपालन हे लोकशाहीला पुरक आहे. म्हणून बाबासाहेब पुढे म्हणतात की, लोकशाही ही निव्वळ राज्यपध्दती नाही तर प्रत्येक भारतीयाने आपले घर- जीवनही लोकशाही तत्वानुसार उभारले पाहिजे. तरच भारत हे एक खरे-खुरे समृध्द राष्ट्र म्हणून विकसित होईल.

या पार्श्वभुमिवर बौध्द धम्म-विचार-संस्कृतीचे अभ्यासक-चिंतक राजाभाऊ निरंतर धम्मविषयक चिंतन करत असत; मांडत असत: लिहीत असत. किंबहुना राजाभाऊंचा तो मूळ पिंड होता. येथे निरंतर त्यांची बंडखोर दृष्टी दिसते. त्यांनी शासनाने दिलेला पुरस्कार साफ नाकारला.

भारिप बहुजन महासंघाचे माजी अध्यक्ष आणि हायस्कुल-कॉलेजच्या कालावधीत मला बौद्ध धम्म, फुले-आंबेडकर विचार-चळवळ, समाजवादी, साम्यवादी, काँग्रेस पक्ष, रा.स्व.संघ, आदी पक्ष व विचारांची चिकित्सक ओळख करून देणारे, माझ्या विद्यार्थी जीवनात सिध्दार्थ हॉस्टेल, वडाळा, मुंबई येथील त्यांच्याच खोलीत रहात असताना माझ्या जीवनाला आकार देणारे आणि आपल्या उतार वयात निरंतर ग्रंथांच्या गराड्यात राहणारे आदरणीय राजाभाऊ ढाले दि.१६ जुलै २०१९ रोजी आपल्या व्यापक परिवारातून निघून गेले. माझ्या या गुरूला साष्टांग दंडवत! त्रिवार जय भिम! जय भिम!! जय भिम !!!

~~~

शांताराम पंदेरे भारिप बहुजन महासंघाचे माजी संस्थापक महासचिव तसेच फुले-आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आणि भाष्यकार आहेत
Email: shantarambp@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*