विश्वदीप करंजीकर
दलित पँथरच्या अस्तित्वाचा उद्देश दलितांची दु:खे जगाच्या वेशावर टांगणे हाच होता. दलित पँथर संघटना नसून ‘जिवंत विद्रोही भावना’ होती. ‘सम्यक क्रांती’ हा दलित पँथर चा संकल्प होता.
दलितांचा लढा इतका व्यापक आहे की तो सामाजिक आणि केवळ आर्थिक असू शकत नाही. ज्याचं अस्तित्वचं नाकारलं जात त्याचा लढा ही सर्वव्यापी असतो. ‘मी माणूस आहे’ हा त्याचा पहिला हुंकार असतो. त्याचा स्वाभिमान जागा होतो. त्या स्वाभिमानात वेदना आणि विद्रोह असतो. त्याला नवीन समाजव्यवस्था हवी असते. दलित पँथरला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यावर अभिप्रेत समाजाची रचना अपेक्षित होती.
दलित पँथरनंतर वंचितांच्या चळवळीला प्रकाश आंबेडकरांच्या रुपाने नवीन नेतृत्व मिळाले. भारतीय दलित पँथर आणि दलित मुक्तीसेना यांनी एकत्र येऊन ६ डिसेंबर १९८५ रोजी प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व स्वीकारण्याचे जाहीररित्या मान्य केले होते.
पँथरच्या जहाल विद्रोही भाषण लेखनामुळे साहित्यिकांना नवीन प्रेरणा मिळाली. ज्यातून दलित साहित्य निर्माण झाले. दलित साहित्य हे आंबेडकरी चळवळीचे अपत्य आहे. दलित साहित्याचा केंद्रबिंदू ‘माणूस’ आहे. काळ्या लोकांच्या ‘ब्लॅक लाईव्स मॅटर्स’ला काॅपी करुन ‘कास्ट मॅटर्स’ लिहण्याइतकं किंवा काळ्या लोकांसारखी केशरचना करुन ब्लॅक-दलित चळवळीला सरसकटीकरण करण्याइतके ते सोप्पे आणि उथळ नक्कीच नाही. नामदेव ढसाळांनी एका मोठ्या मोर्च्यात ‘दलित पँथर’ नावाचा बॅनर आणल्यापासून ते नाव मिळाले. महाडच्या संमेलनात डाॅ. म.ना. वानखडे यांनी ब्लॅक चळवळीच्या अनुषंगाने केलेल्या भाषणाचा पँथरच्या संस्थापकांवर प्रभाव होता. पण त्यांची मांडणी पूर्णत: जातीयताविरोधी होती.
१९७४ च्या मध्य मुंबई लोकसभा पोटनिवडणूकीत काँग्रेस-रिपाईचे दोन्ही गट-शिवसेना यांची युती झाली. तरी सुध्दा हारण्याची कुणकुण लागल्याने दलित पँथरच्या जाहीर सभेत राजा ढाले भाषण करत असताना पोलिसांनी स्टेज वर चढून त्यांचे डोके फोडले आणि शिवसेनेच्या गुंडांनी पेट्रोल बॉम्ब, तलवारीने सभेवर हल्ला चढवला. राजा ढाले यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मुंबईमध्ये महाभारतातील युध्दासारखे आमने-सामनेचे युध्द भडकले. राजा ढालेंवर झालेल्या हल्ल्यामुळे मुंबईच्या इतिहासातील शिवसेनेला महागात पडलेली एकमेव दंगल घडली ती म्हणजे ‘वरळीची दंगल’.
शरद पवार मुख्यमंत्री असताना नागपूर येथे दलित पँथरने अतिभव्य असा मोर्चा काढला ज्यामुळे महाराष्ट्र सरकारला ‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र प्रकाशन समिती’ची स्थापना करावी. दलित पँथरने तमाम वंचितांसाठी केलेली सर्वांत मोठी लढाई म्हणून मी याकडे पाहतो. तीच दलित पँथरची सर्वात मोठी उपलब्धी आहे.
महाराष्ट्रात सवर्णांकडून दलितांवर होणारे अत्याचर थांबले नाही तर लेखणीच्या ठिकाणी आम्ही बंदुका हातात घेऊ हे मुख्यमंत्री वंसतराव नाईक सरकारला इशारा देणारी पँथरच होती. जिथे जिथे दलित पँथरच्या कार्याचा उल्लेख आहे तिथे राजा ढालेंना सोडून तो इतिहास मांडता येणार नाही. सतत रोमॅन्टिक, थ्रिलिंग कृती करायला मिळेल अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा असते. प्रत्यक्षात चळवळीत असे फार थोडेच क्षण असतात. उरलेला वेळ चिकाटीने, जिद्दीने काम करीत घालवण्याचा असतो. फार बारकाईने तपशीलात काम करण्याची गरज आहे एवढं आजच्या कार्यकर्त्यांनी समजून घेण्याची गरज आहे. पँथर राजा ढाले सरांचे पँथर नंतरचे जीवन-चरित्र जीवन-कार्य आपल्याला क्षणोक्षणी हेच सांगते.
“ माझं नाव राजा ढाले. दलित ही माझी आयडेंटिटी नाही. मी गुलाम नाही. जे गुलाम असतात मनाने, ते कधीही स्वतंत्र होत नाही. मात्र ज्याच्यावर गुलामगिरी लादलेली असते तो मात्र स्वतंत्र झाल्याशिवाय राहणार नाही.
पँथर राजा ढाले यांना विनम्र अभिवादन.
~~~
संदर्भ : Annihilation of caste Dr. B.R.Ambedkar, दलित पॅंथर शरणकुमार लिंबाळे, आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ : खंड ४ ~ ज.वि. पवार
~~~
विश्वदीप करंजीकर गव्हर्नमेंट इंजिनीअरिंग कॉलेज येथे विसिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहेत
- आंबेडकरी गीतांचे स्वरांकित विद्यापीठ प्रतापसिंगदादा बोदडे - June 10, 2022
- महिला प्रश्न जितका माझ्या आई बहिणीचा आहे तितकाच तो माझ्या बापाचाही आहे - March 8, 2021
- बिजनेस पार्टनर्स हवे आहेत - November 26, 2020
Leave a Reply