गांधींच्या भूमिकेची आंबेडकरी चिकित्सा!

राजकिरण उमा मुकूंद बोकेफोडे

आंबेडकरवादी जेव्हा गांधी किंवा गांधीवादावर टीका करतात, तेव्हा ती टीका व्देषावर आधारित नसते. ती टीका/चिकित्सा असते गांधींच्या भूमिकांची व गांधीवादाच्या व्यवहार्यतेची.

गांधींवर सगळ्यात मुख्य आक्षेप आहे पुणे करारात त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर. जर बाबासाहेबांची मागणी मान्य झाली असती तर आज sc समुदायाची राजकीय स्थिती नक्कीच वेगळी असती. अनेक वर्षे खर्च करून बाबासाहेबांनी वेगळ्या मतसंघांची मागणी मान्य करून घेण्यात यश मिळवले होते. पण गांधींनी उपोषणाचा शस्त्रासारखा वापर करून sc समुदायाच्या राजकीय भविष्यावर कायमचा बोळा फिरवला. आज जरी मतदारसंघ आरक्षित असले, तरी आपली राजकीय आत्मनिर्भरता/ताकद कायमस्वरूपी संपली आहे.
Thanks to gandhi, for sabotaging amtanirbharta of sc community.

आज आरक्षित जागेवरून निवडून गेलेला आमदार/खासदार आपल्या समुदायावर होणाऱ्या अन्यायावर आवाज उठवू शकत नाही. कारण त्याला माहित आहे कि, त्याने जर आपल्या समुदायासाठी मागण्या केल्या, तर पुढल्या वेळी त्याला उच्च जातींची मत मिळणार नाहीत. त्यामुळे त्याची अवस्था दात नसलेल्या वाघासारखी झाली आहे.
Again, thanks to gandhi, for diminishing political bargaining power of dalits.

बंदिस्त खेडी-गावं ही वंचित समाजाच्या जीवन-भवितव्य-आशा-आकांक्षांची graveyards होती आणि आहेत. ह्या डबक्यात दलितांना अन्याय, दमन आणि गुलामगिरीशिवाय काहीच मिळत नव्हते. त्यामुळे ह्या तून बाहेर पडण्यासाठी बाबासाहेबांनी खेडी सोडून शहराकडे जा, असा सल्ला समस्त दलित वर्गाला दिला होता. कारण शहरात सगळं काही चांगले नसले तरी मोकळा श्वास तरी घेता येत होता. पण ‘गावाकडे चला’ म्हणून गांधी परत दलितांना त्या डबक्याकडं खेचू पाहत होते.
That’s why woke ambedkarites reject gandhi’s ramrajya utopia, which supports caste-based occupations and varna system.

Annihilation of caste वरून आंबेडकरांशी झालेल्या वादानंतर जातींविषयी गांधींची भूमिका बदलली, अस मी एके ठिकाणी वाचलं. पण ही भूमिका फक्त आंतरजातीय विवाहावरच जोर देते, कारण गांधींनी हे जाहीर केलं होतं की, ते फक्त आंतरजातीय विवाहालाच उपस्थित राहतील. पण रोटी-बेटी व्यवहार आणि शिवता-शिवत मिटवणे म्हणजेच फक्त जातनिर्मूलन नाही. असे केल्याने जातीयता संपेल असे समजणे हा भाबडेपणा आहे..
कारण आंबेडकरवाद फक्त जातीय अन्याय नाही, तर या अन्यायाला कारणीभूत असलेल्या जात-वर्ण व्यवस्थेलाच नष्ट करण्यावर जोर देतो. नुसतं गटारीतून घाण पाणी आणि गाळ बाहेर फेकून ती बंद होत नसते, तिचं उगमस्थान कायमस्वरूपी बंद करणे हाच एकमेव उपाय आहे. कारण वर्णव्यवस्था कायम ठेवून जातीयवाद/जात संपणार नाही.

ब्रिटिश राज्याशी तसं पाहिलं तर उच्च जातींना काहीच problem नव्हता. कारण ब्राह्मण तर त्या वेळी देखील इंग्रजी सरकारात मोठ्या पदांवर काम करत होते. आणि त्यांना धार्मिक नंगानाच करायची पण फुल्ल परवानगी होती, कारण ब्रिटिश धार्मिक बाबींमध्ये ढवळाढवळ करत नव्हते. आणि म्हणूनच अस्पृश्यता हा हिंदू धर्माचा अंतर्गत मामला आहे, हीच या उच्च जातींची आणि त्यांना represent करणाऱ्या गांधींची भूमिका होती. पण ब्राम्हणी हिंदू वर्णव्यवस्थेत दलितांना स्थान च नाही, तर मग ते हिंदू कसे? आणि गांधी त्यांचे नेते कसं काय होऊ शकतात? असा रास्त सवाल आंबेडकरांनी विचारला. आणि तेच खरे नेते आहेत हे देखील ब्रिटिश सरकारला पटवून दिले.

दलित समुदायाचे नेतृत्व आणि जातीअंत, हिंदू-धर्म चिकित्सा ह्या मुद्दयांवर आंबेडकर आणि गांधी मध्ये मतभेद होते. दलित वर्गाचे प्रतिनिधी म्हणून आंबेडकरांचे नेतृत्व तयार झाले होते. त्यामुळे मीच हरिजनांचा नेता आहे, हा गांधींचा दावा फोल ठरला. हिंदू धर्म आणि जातीअंत ह्या वादात आंबेडकरांनी त्यांना संपूर्ण पणे निष्प्रभ केले होते. आणि ह्याच कारणामुळे सर्व उच्च जातीय मिडिया ने आंबेडकरांची धर्मद्रोही अशी प्रतिमा तयार करून त्यांच्या बदनामीची मोहीम सतत सुरू ठेवली होती.

पहिल्या महायुद्धानंतर भारतासारख्या अवाढव्य प्रदेशावर सत्ता कायम ठेवणं ब्रिटिश सरकारला कठीण जात होतं. आणि स्वातंत्र्य आंदोलन ही तीव्र होत होते. म्हणून लवकरात लवकर भारत सोडून जायचं त्यांनी ठरवलं होतं.

हा स्वातंत्र्य लढा सवर्ण आणि अवर्ण लोक आपापल्या पध्दतीने लढत होते. सवर्ण हिंदूंचा लढा हा फक्त विदेशी-विधर्मी असलेल्या इंग्रज या एकमेव शत्रूशी होता. आणि हा लढा पूर्णपणे राजकीय वर्चस्वासाठी होता. कारण इंग्रजांना हटवून सवर्ण हिंदूंना सत्ता काबीज करायची होती. त्यामुळे त्यांचा लढा तुलनेने सोपा होता.
याउलट दलित वर्गाचा लढा होता, जो दुहेरी आणि जास्त कठीण होता. कारण दलितांना राजकीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढायचे होते तर धार्मिक स्वातंत्र्य आणि गुलामगिरी विरोधात गबरगंड असलेल्या सवर्ण हिंदू सोबत ही लढायचे होते. कारण कधीतरी ब्रिटिशांना भारत सोडून जायचे च होते. त्यामुळे परकीय गुलामगिरी तशी ही संपणारच होती. त्यामुळे ब्रिटिशसत्तेचा तितकासा धोका नव्हता जितका धोका ब्रिटिश गेल्यानंतर येणाऱ्या सवर्ण हिंदू-ब्राह्मण सत्तेचा होता. कारण ब्रिटिश गुलामी जरी दिडशे वर्षे टिकली, तरी परकीय लोक जास्त काळ सत्ता गाजवू शकणार नव्हते, त्यांच्या सत्तेला limit होती, पण सवर्ण-हिंदू-ब्राह्मण सत्ता ही स्वकीय-स्वधर्मी, हजारो वर्षांपासून चालत आलेली होती आणि ही सत्ता जास्त अमानुष, माणूसपण नाकारणारी होती. आणि त्यात पुन्हा ती unlimited. त्यामुळे तिच्या विरोधात 24×7 लढावं लागणार होतं आणि आजही लढावं लागतय.
त्यामुळे ब्रिटिश सत्तेपेक्षा जास्त घातक असलेल्या धार्मिक सत्तेविरुद्ध दलितांना जास्त लढावं लागले. त्यामुळे स्वातंत्र्य आंदोलनात आंबेडकरांचे योगदान काय? असा हलकट प्रश्न विचारणाऱ्यांनी वरील मुद्दे पण लक्षात घ्यावे.

एकदा का ब्रिटिश गेले, की सत्ता कुणाच्या हातात जाणार? हा महत्त्वाचा प्रश्न होता. अशरफ मुसलमानांनी वेगळा पाकिस्तान घेवून आपल्या राजकीय वर्चस्वाची खाज कायमस्वरूपी मिटवली होती. खरी अडचण होती ती नव्याने स्वतंत्र झालेल्या भारतात. कारण सत्ता सवर्ण-हिंदूंकडे च जाणार हे स्पष्ट होतं. पण वर्चस्व कुणाचं राहणार? कट्टर संघी हिंदूंचं की गांधीवादी मवाळ हिंदूंचं?
आणि ह्या दोघांच्या साठमारीत गांधीवादी, मवाळ पण सनातनी हिंदूंची सरशी होणार, हे स्पष्ट झालं होतं. त्यामुळे चिडून जाऊन कट्टर हिंदूराष्ट्रवादी ब्राह्मण संघटन असलेल्या RSS ने नथुराम गोडसे या सावरकरवाद्या मार्फत गांधींचा ‘वध’ केला.

किती ही मतभेद असले तरीही खून करण्याइतपत एखाद्याचा व्देष आंबेडकरवादी कधीच करणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि याला इतिहास आणि वर्तमान दोन्ही साक्षीदार आहेत. कारण आजपर्यंत एकाही दलित-आंबेडकराईट संघटनेनी कुणाची हत्या वा कुणावर अत्याचार केलेला नाही आणि भविष्यात ही करणार नाहीत, हे सत्य आहे. कारण विरोधकांना खून करून संपवणे ही सनातनी ब्राह्मणी-सरंजामी संस्कृती आहे, बौद्ध धम्म-आंबेडकरी संस्कृती नाही.
त्यामुळे आंबेडकरी चळवळ ही व्देषावर आधारित आहे म्हणणाऱ्या ने स्वतः ला लाज वाटू द्यावी.

भारत जर त्याच वेळी हिंदूराष्ट्र झाला असता, तर दलितांचे सोडाच पण ब्राह्मण वगळता इतर सर्वच सवर्ण हिंदूंची ह्या ब्राह्मणांनी पद्धतीशीरपणे ठासली असती.
आजची च परिस्थिती बघा. ठराविक उद्योगपती वगळता इतर सर्वांना देशद्रोही ठरवण्याची मोहीम RSS ने आखली च नसती(just read what RSS said about Baman Narayanmurthy’s Infosys)
आज साऱ्या जगाला शहाणपण शिकवणाऱ्या सवर्ण बायांना देखील चूल-मूल करत बसावं लागले असते. त्यामुळेच वेळीच हा धोका ओळखून त्यावेळचे सारे बनिया उद्योगपती जातीनं बनिया असलेल्या गांधींच्या मागे उभे राहिले. कारण जर का भारत हिंदूराष्ट्र बनला असता, तर ब्राह्मण विरुद्ध भारतातल्या ब्राह्मणेतर जाती आणि दलित समुदाय तसेच हिंदी-संस्कृत सक्ती विरोधात दक्षिणेकडील राज्यं अशी यादवी सुरु झाली असती. अन् या यादवीत सारा देश बेचिराख झाला असता. मग उद्योगपती, उद्योग, सवर्ण लाइफस्टाइल(western inspired) हे सारं मातीत गेलं असतं. त्यामुळे जातीय विशेषाधिकार कायम ठेवून, दलितांना थोडेफार अधिकार देऊन, western मुखवटा असणारी ब्राह्मण-बनिया-सवर्ण राजवट त्यांनी स्थापन केली. ज्याचे नेतृत्व आधी गांधी अन् नंतर नेहरूंनी केले. लोकशाही जरी आली, तरी सर्व सत्ता, संसाधनांवर ब्राह्मण-बनियांची मालकी असेल ही तजवीज ह्या जातींनी केली.

त्यामुळे गांधीवाद भले “अहिंसक” असो, उदात्त असो, पण तो ज्या रामराज्याची बात करतो, तिथं सर्व जाती एकत्र बसतील, उठतील, समरसतेत दिवसभर समरस होतील. पण दिवसाअखेर सर्वांना पुन्हा आपापल्या जातींच्या खुराड्यात परत जावे लागेल. कदाचित भेदभाव मिटेल, पण जातींच्या पायऱ्या कायमच राहतील. फळाची/मोबदल्याची किंवा संसाधनांवर हिस्सा/मालकीची अपेक्षा न करता आपापले व्यवसाय करत बसावे लागेल.
आणि ज्याला स्वाभिमान आहे, न्याय-समतेची चाड आहे, तो ह्या असल्या खुळचट रामराज्याला फाट्यावर मारून जातविरहीत समाज स्थापनेसाठीच लढत राहील.

खून करून परत पुन्हा त्यांनाच प्रातःस्मरणीय करून, त्यांच्या तसबीरला हार घालून, नकली नमस्कार करून आदर व्यक्त करण्याचा मुंह में राम, दिल में नथुराम हा असला संघी-तालिबामनी फालतूपणा आंबेडकरवादी कधीच करणार नाही.

जे आहे ते अगदी सरळ, स्पष्ट आणि रोखठोक.
दलित-वंचितांच्या राजकीय भवितव्याचे अतोनात नुकसान करणाऱ्या गांधींना आम्ही नेहमीच सहानुभूती व्यक्त करु. कारण ज्या सनातनी व्यवस्थेला कायम ठेवण्यासाठी त्यांनी दलितांच्या राजकीय कल्याणाचा बळी दिला, त्याच कट्टर हिंदू-ब्राह्मण धर्माने त्यांचा ‘वध’ केला.

ज्या साबरमती नदीकाठी कधीकाळी नरसी मेहतांच्या “वैष्णव जन तो तेने कहिए रे, पीर परायी जाने रे’ या भजनाचे सूर घुमले, त्याच अमदावादच्या साबरमती चे पाणी 2002 साली रक्तानं लाल झाले.

तेव्हा गांधीजी तुमच्या सर्व शिकवणूकीचा पराभव तुमच्याच लाडक्या सवर्ण हिंदूंनी केलाय.

परत एकदा सहानुभूती.

असो.

राजकिरण उमा मुकूंद बोकेफोडे

लेखक स्वतंत्र संशोधक आहेत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*