बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे : आंबेडकरी चळवळीचे एक महत्वाचे शिलेदार

गौरव सोमवंशी

आज बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे (भाऊराव देवाजी खोब्रागडे) यांची ९६वी जयंती. बाबासाहेबांनी लंडनला शिकायला पाठवलेल्या १६ विद्यार्थ्यांपैकी ते एक. पण १६ पैकी राजाभाऊ खोब्रागडे आणि एन. जी. उके ( Ujjwal Uke सरांचे वडील) हे दोनच होते ज्यांनी आपला सगळा शिक्षणाचा खर्च स्वतःहून केला, जेणेकरून बाबासाहेबांना १४ ऐवजी १६ विद्यार्थी पाठवता येतील. पुढे जाऊन राजाभाऊ हे राज्यसभेचे उपसभापती देखील झाले. बाबासाहेबांच्या हयातीत शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे सरचिटणीस, तद्नंतर अध्यक्ष, आणि समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि रिपब्लिकन पक्ष या सर्व संस्थांचे काही काळ अध्यक्ष देखील होते.

  • १४ एप्रिल हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा व्हावा म्हणून त्यांनी केंद्र सरकारला तशी मागणी केली.
  • १९७७ ला इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी घोषित केली तेव्हा राजाभाऊंनी ‘लोकशाहीच्या नरडीला नख’ हा लेख प्रकाशित करून त्यांची टीका केली. तरीदेखील जेव्हा राष्ट्रीय सरकारची संकल्पना जेव्हा देशासमोर अली तेव्हा तत्कालीन राष्ट्रपतींकडे गांधींनी राष्ट्रीय सरकार करिता ज्या सहा नेत्यांची यादी सादर केली त्यामध्ये राजाभाऊंच्या नावाचा समावेश होता.
  • १४ ऑक्टोबर १९५६ च्या धम्मादीक्षेच्या सोहळ्याची जबाबदारी पेलणाऱ्यांपैकी राजाभाऊ एक महत्त्वाचे नाव होते.
  • १९६४ ला राजाभाऊंनी देशातील खेड्यापाड्यात राहणाऱ्या भूमिहीन शेतमजुरांची देशव्यापी आंदोलन सुरू केले. या लढ्याची दखल जगभरातील वृत्तपत्रांनी त्याकाळी घेतली होती.
  • १९६५ ला ब्लॅक लोकांची चळवळ समजून घेण्यासाठी त्यांना अमेरिकेतून निमंत्रण दिले, आणि तिथे त्यांची मार्टिन ल्युथर किंग सोबत भेट देखील झाली.
  • एकूण तीन टर्म्स, म्हणजे तब्बल १८ वर्ष ते वरीष्ठ सभागृहाचे सदस्य होते.
  • छोटी/ लहान राज्ये यांची निर्मिती व्हावी म्हणून द्वितीय राज्यपुनर्रचना आयोग नेमला जावा ही मागणी त्यांनी केली.
  • नवंबौद्धांच्या सवलतींची लढाई राजाभाऊंनी दिली. पंतप्रधान मोरारजी देसाई जेव्हा असे बोलले, की, “सवलती हव्या होत्या तर बौद्ध धर्म कशाला घेतला?’, तेव्हा राजाभाऊंनी सडेतोड उत्तर देऊन विषय संपवला, “पंतप्रधान महोदय, एखाद्या मागासवर्गीयाने धर्म बदलला म्हणून त्याची आर्थिक परिस्थिती लगेच एकदम उन्नत होईल काय?” त्यांच्या मागण्या मंजूर झाल्या आहेत हे इंदिरा गांधींनी राजाभाऊंना पत्र लिहून नंतर कळविले देखील.
  • फुलेंबद्दल राजाभाऊंना फार आदर होता: “फुलेंचे उदाहरण सोडले तर चतुर्वरण्यात सामाजिक विषमतेविरुद्ध आवाज काढणारी व्यक्ती निर्माण झाली नाही”.
  • बाबासाहेबांचे अनुकरण करून राजाभाऊंनी शिक्षण संस्था देखील स्थापन केल्या, उदा. १९५७ मध्ये स्थापन झालेली सिद्धार्थ शिक्षण सहाय्यक संस्था.
  • त्यांनी कामगारांसाठी देखील फार काम केले, आणि ‘किमान वेतन’ मिळावे यासाठी कायद्याची तरतूद व्हावी म्हणून प्रयत्न देखील केले.
  • राज्यसभेत त्यांनी अनेकवेळा ठोस आणि भक्कम मुद्दे मांडले होते. Proportional Representation बद्दल त्यांनी राज्यसभेत मांडलेली भूमिका बघुया:

राजाभाऊ खोब्रागडे यांनी २६-९-१९५९ ला राज्यसभेत केलेल्या भाषणात शेवटी हे बोलले होते, “केरळमधील कम्युनिस्ट सरकारला मागील सार्वत्रिक निवडणूकीत फक्त ३५% मते मिळाली; हा एक मुख्य आक्षेप आहे. ह्यावर एकच उपाय आहे. भारतात द्विपक्षीय पद्धती अयशस्वी ठरली आहे. सध्या अनेक पक्ष अस्तित्वात आहेत. त्यात पुन्हा स्वतंत्र पक्षांची भर पडली आहे. निरनिराळे दहा पंधरा पक्ष असल्यामुळे मतदान पद्धतीने लोकशाही यशस्वी होऊ शकणार नाही. मतदारांचे खरेखुरे प्रतिबिंब विधी मंडळात पडावे असे वाटत असेल तर त्याकरिता मतदान पद्धतीत बदल करून Proportional Representation ची पद्धत अंमलात आणावयास पाहिजे. अल्पसंख्याकांच्या दृष्टीने हे आवश्यक आहे. आजच्या मतदान पद्धतीमुळे अल्पसंख्याक लोकांना, अस्पृश्य आदिवासी आणि इतर, यांना आपले खरेखुरे प्रतिनिधी पाठवता येणार नाही आणि घटनेतील अधिकारांचा अल्पसंख्याकाना कोणताच उपयोग होणार नाही. यांच्या हिताकरिता झगडू शकतील असे प्रतिनिधी पाठवायचे असतील तर Proportional Representation ची पद्धत अंमलात आणावयास पाहिजे”.


१. राजाभाऊ खोब्रागडेंच्या भाषणांचे पुस्तक काही वर्षांपूर्वी प्रकाशित झाले होते. ते पाहिजे असेल तर संकेत प्रकाशन, नागपूर (९९७५०१८९९५)ला संपर्क करू शकता.

२. व्ही. डी. मेश्राम लिखित ‘महाराष्ट्राचे शिल्पकार: राजाभाऊ खोब्रागडे’ हे पुढील लिंक वर होस्ट केले आहे:

https://pdfhost.io/v/Y1EA7Ug1O_Rajabhau_Khobragade

३. भाऊ लोखंडे यांनी दिलेली राजाभाऊंबद्दल माहिती युट्युबवर पाहू शकता:https://youtu.be/KWUweR_nc9w

(महत्वाचे संदर्भ दिल्याबद्दल Sagar A Kamble यांचे आभार)

गौरव सोमवंशी

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच ते खालील इतर संस्थांशी संलग्न आहेत.
Fellow – Royal Academy of Engineering, London, Future Leader – British Council, Dalai Lama fellow – Virginia University, Member – African Blockchain Alliance

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*