आदिती रमेश गांजापूरकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता आणि सद्य परिस्थिती त्याची प्रासंगिकता
व्यासंग विद्वत्ता ज्यांच्या बुध्दीप्रकर्षाने जाणवते असे सर्वव्यापी व्यक्तिमत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर. अर्थशास्त्र, कायदा, तत्वज्ञान, सामाजिक शास्त्र, धर्म-मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, वित्त आणि न्यायतत्वशास्त्र, संविधान निर्माते इत्यादी क्षेत्रातील निपुण प्राविण्य असलेलं अद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कायम अस्पृश्यांचे प्रश्न, कामगारांच्या समस्या, स्त्रियांचे स्वातंत्र्य, शेतकऱ्यांचे प्रश्न, मानवी हक्क, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, पत्रकारिता यांसह जगाच्या पाठीवर असा कोणताच विषय नाही की ज्यात बाबासाहेबांचे योगदान नाही. बाबासाहेबांनी त्यांच्या अभ्यासाचा उपयोग स्वतःच्या उत्कर्षासाठी न करता भारतातील अस्पृश्य, शोषित व वंचितांच्या लढ्यासाठी आणि उद्धारासाठी केला. या प्रोमोथियम लढ्यासाठी त्यांनी शिक्षणाचे सुवर्ण कण वेचले. प्रत्येक विषयाच्या गाभ्याला स्पर्श करून बाबासाहेबांनी ते समजून घेण्याचा प्रयत्न केला व तेवढ्याच उमेदीने प्रत्येक विषयाला न्यायभावना दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर निश्चित भूमिकेतून पत्रकारितेकडे वळले होते. त्याकाळच्या वृत्तपत्रांचे प्रमुख दोन उद्देश दिसुन येतात. पहिला म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनाला गती देणे व दुसरा म्हणजे समाज सुधारणा घडवुन आणणे. बाबासाहेबांची पत्रकारिता मात्र यापेक्षा वेगळी म्हणजेच मानवमुक्तीचा धगधगता अंगार होती. वरकरणी समाज सुधारणा बाबासाहेबांना मान्य नव्हती. एका बाजुला राजकीय स्वातंत्र्यासाठी आकाश पाताळ एक करणारे नेते याच देशात माणसाला माणसासारखी वागणुक मिळावी यासाठी चकार शब्दही काढयला तयार नव्हते. याउलट बाबासाहेबांच्या मानवमुक्तीच्या लढ्याला देशविरोधी कसे ठरविता येईल यासाठीच त्यांचे कार्य सुरू होते. ब्राम्हण संचलित उच्चभ्रू पत्रकारितेवर बाबासाहेबांचा विश्वास नव्हता, या देशातील अस्पृश्य व दिनदलितांच्या समस्या त्याकाळच्या वृत्तपत्रांकडून सोयीस्करपणे दुर्लक्षित केल्या जात असत. दिनदलित वर्गाच्या समस्या या अत्यंत टोकाच्या होत्या त्यांना वाचा फोडण्यासाठी वृतपत्राची मोठी गरज होती हे बाबासाहेबांनी ओळखले होते.
जानेवारी १९१९ मध्ये भारतीयांना विशेष राजकीय हक्क प्रदान करण्यासाठी लॉर्ड साऊथब्युरो यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती भारतात आलेली होती. या समितीने एकुण ३६ जणांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी आमंत्रित केले होते. त्या ३६ जणांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुद्धा समाविष्ट होते. साऊथब्युरो कमिशनला त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांच्या मागणीचे पाहिले निवेदन दिले होते. अमेरिकेत विद्यमान असलेल्या विभिन्न सामाजिक भेदभावांसह अमेरिकेत प्रातिनिधिक सरकार स्थापन होऊ शकते तर भारतात का नाही? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय चळवळीचा पाया घातला. या राजकीय हक्कांच्या मागणीला पाठबळ मिळवण्यासाठी त्यांनी मूकनायक वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. अन्याय अत्याचार सहन करत खितपत पडलेल्या मुक समाजाला त्यांच्या व्यथा, वेदना मांडण्यासाठी वृत्तपत्र हे योग्य साधन ठरेल. मुक्याला वाचा फोडता येईल, बोल दिला जाईल त्या शिवाय गत्यंतर नाही. या प्रबळ इच्छाशक्तीने व विचाराने बाबासाहेबांनी मूकनायक ची सुरुवात करत पत्रकारितेत प्रवेश केला. दुभंगलेल्या, मोडलेल्या, वाकलेल्या, खितपत पडलेल्या, माणूस म्हणुन ओळख गमावून बसलेल्या आणि व्यवस्थेतील मुके लोक अशीच ज्यांची ओळख होती अशा मुक्यांचा मूकनायक बाबासाहेब बनले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर विलायतेत शिक्षण घेताना त्यांनी निग्रोंची चळवळ जवळुन पाहिली होती. वर्णभेदाविरोधी चळवळीत ‘द क्रायसिस’ नावाच्या वृत्तपत्राने प्रमुख भूमिका पार पाडत विश्व ढवळून काढले होते, आंदोलनाचा आवाज हे वृत्तपत्र बनले होते.
त्याकाळचे भारतीय वृत्तपत्रप्रमुख ब्राह्मणी असल्याने गैरसमज पसरवून दिनदलितांच्या चळवळीचा आवाज क्षीण केला जात आहे त्यामुळे बाबासाहेबांना या विषयाचे गांभीर्य असल्याने त्यांनी स्वतःची मुद्रित प्रकाशने सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांनी १९२० साली मूकनायक, १९२७ साली बहिष्कृत भारत, १९३० साली जनता, १९५६ साली प्रबुद्ध भारत इत्यादींची सुरुवात केली. प्रबुद्ध भारत स्वतंत्रपणे जन्माला आले नाही तर ते ‘जनता’ चेच रूपांतर होते.
वृतपत्राच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न निर्भीडपणे समाजासमोर मांडले.
काय करून आता धरूनिया भीड !
नि शक हे तोड वाजवील!!
नव्हे जगी कोण मुकियाचा जाण!
सार्थक लाजांनी नव्हे हीत!!
मूकनायकाचे ध्येय सोष्टोक्ती करण्यासाठी त्यावर बाबासाहेबांनी संत तुकारामांच्या अभंगाच्या या ओळी बिरूदासाठी निवडल्या हे एक औचित्य आहे.
बाबासाहेब आपल्या मूकनायक या पत्राच्या ३१ जानेवारी १९२० च्या पहिल्या अंकात म्हणतात, “आम्हाला या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वृत्तपत्रासारखी अन्य भुमीच नाही”.
बाबासाहेबांचे सर्व वृतपत्रिय लेखन चिंतनशील, अभ्यासपूर्ण, मार्मिक आणि कृतीस आवाहन करणारे आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली वृतपत्रे ही वैचारीक नेतृत्वाची धगधगती उदाहरणे कायम अजरामर आहेत. बाबासाहेबांची मानवतावादी लेखणी इथल्या पूर्वग्रहदूषित व्यवस्थेवर प्रहार करणारी होती.
“कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते, ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते.” अशी बाबासाहेबांची भूमिका आजही आपल्याला मार्ग दाखविणारी आहे.
सद्य परिस्थिती त्याची प्रासंगीकता
देशातील मेन स्ट्रीम इलेक्ट्रॉनिक पत्रकारितेची सद्यपरिस्थिती अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली आढळते. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पण हा स्तंभ पूर्णपणे ढासळला गेला आहे. पत्रकारितेत कॉर्पोरेट चा शिरकाव आणि धंदेवाईक पत्रकारिता सुरू झाली आहे.
आज भारत देश बातमीच्या स्वरूपात जे ग्रहण करतो तो मुळातच ब्राम्हणी प्रचार आहे. त्यांच्या अजेंड्यानुसार जनतेचा माईंड सेट करण्याचे काम केले जात आहे. टिव्ही पाहणाऱ्या लाखो लोकांच्या समस्येवर हे लोक कोणतेही स्पष्ट उपाय सांगत नाहीत. टिव्ही वरच्या बातम्यांचे जग आता ज्ञान मिळवण्यापेक्षा वेळ घालवण्याचे साधन बनले आहे. या परिस्थितीत मिडिया, जो अन्याय-अत्याचार सारखे
किळसवाने, माणूसकीला काळीमा फासणारे कृत्य करतो त्या शोषक वर्गाला जनतेसमोर हाईलाईट न करता उलट शोषित वर्गाचे क्रिमिनलायझेशन करत आहे.
शिक्षण, बेरोजगारी, महागाई, आरोग्य यासारखे मुळ मुद्दे सोयीस्कररित्या दुर्लक्षित करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटना निवडकपणे समोर आणल्या जात आहेत.
दर मिनिटाला बलात्कार, अन्याय-अत्याचार, खून , मारामारी जातीवाद इत्यादी गुन्हे दिवसाढवळ्या घडतात याची नोंद घेण्यासाठी, बातमी देण्यासाठी मीडियाकडे पुरेसा वेळ नाही पण तारक तारीकांच्या व्यक्तिगत पातळीवरचे आयुष्य दाखवण्यात पत्रकारितेला आधिक रस दिसून येतोय. मीडियाचे काम जनतेचा आवाज बनुन सत्तेला जाब विचारणे असताना वर्तमान परिस्थिती मध्ये मिडिया दिवस रात्र सरकारचे
गुणगाण गात आहे, जनतेत विज्ञानवाद रुजविणे गरजेचे असताना जनतेला अंधश्रद्धा व कर्मकांडाकडे वळवनारे प्रयोग जाणून बुजून सुरू आहेत. एकविसाव्या शतकात जगात विज्ञान तंत्रज्ञान महत्वाचे असताना, भारतातील मिडिया फक्त धर्म, मंदिर, कट्टर धर्मांध राजकारण या सारख्या पोफळ विषयाला अधोरेखित करून वातावरण दूषित करण्याचे काम करत आहे. कोविड च्या काळात तर मीडियाने नीचांक गाठला होता, सामान्य माणसाच्या समस्या न जाणून घेता जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा स्तर मीडियाने गाठला.
व्यक्तीस्वातंत्र्य धोक्यात आणण्याचे कृत्य वर्तमान परिस्थितीतील
पत्रकारितेत जोमाने होत असलेले आपणाला आढळून येत आहे. कुठेतरी लोकशाहीला उध्वस्त करण्याचे काम वर्तमान पत्रकारिता करत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
ब्राह्मणी माध्यमांनी नेहमीच जाणूनबुजून इथला वंचित वर्ग दुर्लक्षित ठेवला आहे.
शोषित वर्गाच्या समस्या कधी प्रस्थापित माध्यमांना मांडव्या लिहाव्या वाटल्याच नाहीत ही वस्तुस्थिती आज आहे. काहीअंशी समस्या मांडल्या तरी त्यात प्रामाणिकता व न्यायभावना नसते हे मुख्य प्रवाहातील इलेक्ट्रॉनिक पत्रकारितेचे वास्तव आहे. यांत प्रिंट मीडिया व स्थानिक पत्रकारिता काही प्रमाणात तरी जनतेशी नाळ धरून आहे परंतु त्याचा व्यापक परिणाम होत नाही.
प्रासंगिकता लक्षात घेता सध्याच्या परिस्थितीला मुख्य प्रवाहातील पत्रकारितेत वंचित व शोषित घटकातील माध्यमांचे प्रमाण बोटावर मोजण्याइतपतच आहे. त्यामुळे वंचित शोषित समूहाचे तळागाळातील प्रश्न मांडणारी चळवळीची प्रसारमाध्यमे असणे काळाची मोठी गरज आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात असताना समतेची शिकवण देणाऱ्या भारतीय संविधानाच्या छत्रछायेत जीवनाचा प्रागतिक संघर्ष करत वंचित व शोषित समूह स्वतःच्या संविधानिक हक्क अधिकाराची लढाई लढत आहे हेच या देशाचे जातवास्तव आहे.
आदिती रमेश गांजापूरकर
लेखिका/कवियत्री नांदेड येथील रहिवासी असून Government Nursing Officer आहेत.
- जात वर्ग समाजातील प्रेम : कल्पना आणि वास्तव - August 5, 2024
- बाबांची रामू कारुण्याची मूर्ती - November 22, 2023
- करुणामय प्रियदर्शी सम्राट अशोक - April 6, 2023
Great article 👌👌👌👍👍👍👍