समष्टीचे भान: महाड चवदार तळे सत्याग्रह..!!

मयूर लंकेश्वर

लहानपणी एक गाणं नेहमी कानांवर पडायचं – पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी, पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी…तेव्हा गाण्यामागची नेमकी पार्श्वभूमी थेट समजायची नाही, परंतु घरात वा कधी जयंतीच्या दिवसात हे शब्द कानावर पडले की हे गाणं सतत ऐकत राहावं असं वाटायचं, ओठांवर रेंगाळत राहायचं. पुढे सावकाश इतिहास समजत गेला, वर्तमान भोवतालात भराभर घुमू लागला आणि आपल्या आज्ज्या पंज्याच्या गाळात रुतलेल्या कित्येक पिढयांना एका माणसाने सगळी ताकद पणाला लावून हात देऊन वर काढलं, पाठीवर मायेचा हात ठेवला, आधी घोटभर पाणी पाजलं, तेव्हा कुठं कित्येक खाचा झालेल्या डोळ्यांत स्वप्नं बघायला सुरुवात झाली आणि म्हणूनच आज आमची भविष्यं घडू शकली , ह्याची जाणीव निर्माण होत गेली. आज हे गाणं ऐकताना जितकं छान वाटतं तितकंच दुसऱ्या क्षणाला मला प्रचंड अस्वस्थही वाटतं. कारण हे पाणी सहजासहजी वाट्याला आलेलं नाही.

महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला आता 92 वर्ष उलटली आहेत. सत्याग्रहाच्या आधी आणि नंतरही, सत्याग्रहाची संघटनात्मक बांधणी होण्याचा त्या सुमारास महाड आणि आसपास परिसरात उद्भवलेल्या तणावसदृश वातावरणात कित्येक अस्पृश्यांची सवर्ण हिंदूकडून घरे जाळण्यात आली, वाटा अडवून मारहाण करण्यात आली. महाडचा सत्याग्रह बांधणी करण्यात महत्वाचा सहभाग असणारे संभाजी तुकाराम गायकवाड ह्यांच्या मुलालाही जबर मारहाण झाली. 1929 साली संभाजींचा मुलगा भिकाजी ह्याने शेवटी मारहाणीतुन झालेल्या जखमांना भिडत भिडत पाण्यासाठी जीव कुर्बान केला. भिकाजीसारख्या अनेक तरुणांनी आयुष्य पणाला लावलं. तर संभाजी सारख्या अनेक बापांनी भिकाजीच्या मरणाचे दुःख पचवले. पाण्याचा एक एक घोट मिळवण्याच्या हक्कासाठी दिलेला हा लढा किती जबर कठीण होता ह्याचा ह्यावरून थोडासा अंदाज येऊ शकतो.

मध्यंतरी केरळात आणि त्याही आधी तामिळनाडू मध्ये पूर येऊन लाखो लोकांचे संसार उध्वस्त झाले तेव्हा दलितांना पाणी नाकारल्याच्या दोनचार बातम्या वाचनात आलेल्या, त्या अद्यापही मनावर खोल जखम करून जातात. दरवर्षी उन्हाळ्यात कधी दूरवर कुठेतरी उत्तरभारतात तर कधी महाराष्ट्रातल्याच एखाद्या खेड्यापाड्यात कुणालातरी पाण्यासाठी मैलोनमैल अनवाणी पायपीट करताना मरणाची दाहकता कातडीवर झेलून आयुष्य उष्माघाताच्या तडाख्यात दररोज जाळावं लागतं. पेपरांच्या कुठल्यातरी रकान्यात ह्या बातम्या फिक्कट अक्षरात कधीतरी दिसत राहतात. आजही पिण्याच्या पाण्याची सहजासहजी उपलब्धता नसणारा सर्वात मोठा समूह भारतात आहे आणि तो मागासवर्गीय जातीचा, त्यातल्यात्यातही पूर्वापार अस्पृश्य ठरवल्या गेलेल्या जातींचा आहे हे एकविसाव्या शतकातील भयाण वास्तव आहे.

ह्या देशातल्या सवर्णांना स्वातंत्र्य मिळवायला फक्त एकदाच झगडावे लागले. दलितशोषित समाजाचा सर्वार्थाने स्वातंत्र्य मिळवण्याचा लढा मात्र अजूनही सुरूच आहे. महाडचा सत्याग्रह दलित शोषितांच्या अनेक स्वातंत्र्यलढयापैकी एक अतिशय महत्वाचा लढा ठरतो. निसर्गाने पाणी निर्माण करताना प्राणी बघून भेदभाव केला नाही, सगळ्या जीवांना तहान दिली आणि ती तहान भागवली, मात्र सनातनी धर्मव्यवस्थेने माणसाला पाणीही नाकारले, तहान क्षुद्र ठरवली, तहानेपायी जीव घेतला, व्यवस्थेने पाण्यावाचून हालहाल केले.

पाण्यालाही जातवास्तवाच्या गाळात गरागर जीवघेणे भोवरे घ्यायला लावणारी ही अशी क्रूरता जगाच्या पाठीवर अक्षरशः विरळ आहे. म्हणूनच महाडचा सत्याग्रह हा कुठल्याही स्वातंत्र्यसोहळ्याहून अधिक महत्वाचा आहे. इथल्या व्यवस्थेविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणाऱ्या इतिहासातल्या अनेक लढ्यांपैकी तो आद्य लढा आहे, माणसाचे माणूसपण ठळक करणारा तो आदिम संघर्ष आहे. समष्टीचे भान देणारा आणि समतेसाठी मनामनात अस्वस्थता जागवणारा हा सत्याग्रह आहे. हा नुसता पाणी मिळवायचाच सत्याग्रह नव्हता तर जनावरांहून हीन वागणूक दिल्या गेलेल्या एका मोठ्या समाजाचं माणूसपण काळाच्या कॅनव्हासवर ठसठशीतपणे अधोरेखित करणारी ती प्रखर क्रांतिकारक घटना होती. जगभरातल्या सर्व प्रसिद्ध सत्याग्रहाच्या लढाया एकीकडे आणि महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह एकीकडे.

~~~

मयूर लंकेश्वर : हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असुन त्याचबरोबर सामाजिक विषयांवर परखड लिखाण करणारे लेखक आहेत

(Photo courtesy: Siddhartha Chabukswar)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*