कलेत प्रचार नसतो आणि प्रचारकी कला ही कलापूर्ण नसते हे मला पटत नाही – अण्णाभाऊ साठे

निलेश खंडाळे

” मी हवं ते लिहितो “आणि ” मी कथा कशी लिहितो” हे अण्णाभाऊंचे दोन्ही लेख त्यांचं लेखनचरित्र सांगण्यास पुरेसे आहेत.अण्णाभाऊ आपल्या लिखानाबद्द्ल ठाम दिसतात. टीकाकारांना त्यांनी योग्य आणि प्रामाणिक उत्तरं दिलेली आहेत.ती उत्तरं अण्णाभाऊंची फक्त विचारप्रणाली सांगत नाहीत तर त्यात एक तळमळ जाणवते.
अण्णाभाऊ म्हणतात, ” मी ग्रामीण कथा लिहितो, का तर माझ्यावर ग्रामीण संस्कार झालेत, उलट त्यात नित्य भर पडते आहे. मध्यमवर्गाचे जीवन मला समजलेले नाही आणि न समजणाऱ्या जीवनावर मी कधीच लिहिणार नाही. जे पाहिलं,अनुभवलं, ऐकलं तेच मी लिहिलेलं आहे.”

अण्णाभाऊंच्या कथेची पात्र म्हणजे त्यांच्या आजूबाजूची जिवंत माणसं आहेत. ते ज्या परिसराबद्दल लिहितात, त्याला देखील आपल्यासमोर जिवंत करतात. अण्णाभाऊ पात्रांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाहीत तर ती जशी आहेत तसं मांडतात. कल्पकतेला वास्तवसाची जोड असावी हा त्यांचा मुख्य आग्रह. त्यांच्यानुसार, जे सगुण आणि साकार आहे त्यावर ते लिहितात. जे साकार नाही त्याला आकार देण्याचा प्रयत्न करत नाहीत.

अण्णाभाऊंच्या साहित्यावर अपेक्षेप्रमाणे आरोप झाला.
” प्रचारकी ” म्हणत त्याला निकाली काढण्याचा प्रयत्न प्रस्थापित करत राहिले. म्हणजे प्रस्थापितांची ती नेहमीची सवय. पण अण्णाभाऊ यावर जे उत्तर देतात ते मुळात अफलातून आणि समर्पक आहे.
अण्णाभाऊ म्हणतात, ” कलेत प्रचार नसतो आणि प्रचारकी कला ही कलापूर्ण नसते हे त्यांचे म्हणणे मला पटत नाही. आजपर्यंत च्या सर्व मराठी वाङमयात कोणता न कोणता प्रचार केलेला आहे ही गोष्ट ते दडवीत असतात. देवल, खाडिलकर, गडकरी, वरेरकर, आणि आचार्य अत्रे यांच्या प्रतिभेने प्रचार केला आहे. आणि तरीही त्यांच्या कैक कलाकृती कलापूर्ण आहेत.
तेव्हा टीकाकार सहस्रमुखी प्राणी आहे असे माझे मत आहे. आणि हे सर्व टीकाकारही कोणत्या ना कोणत्या तत्वाचे प्रचारकच असतात !! “

अण्णाभाउंची हा विचारातील ठळकपणा थक्क करणारा आहे. यातून आपल्याला अण्णाभाऊ आणि त्यांना हिनावणाऱ्या अश्या दोघांचं चरित्र दिसून येतं. यातून आपल्याला हे देखील समजायला मदत होते की अण्णाभाऊंची आणि त्यांच्या साहित्याची उपेक्षा का केली जाते.

शेवटी नायक बनत नाहीत, नायक बनवले जातात.कुणीतरी पुढाकार घ्यावा लागतो हे सांगायला की आपला माणूस किती भारिये. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागत असते, ती लावली जाते. काहींच्या प्रतिमा खऱ्या असतात तर काही लार्जर दॅन लाईफ.
मराठी साहित्यविश्व तसंच आहे जशी की कोणतीही चित्रपटसृष्टी. फरक एवढाच आहे की सिनेमा सगळे बघतात मात्र साहित्य सगळे वाचत नाहीत. अन्यथा जशे आपले हिरो, दिग्दर्शक टीकेचे धनी होतात तसेच प्रस्थापित साहित्यिक देखील झाले असते.
नागराज मंजुळे, भाऊराव कऱ्हाडे सारखं ” ग्रामीण ” साहित्यिक देखील चकाकून निघाले असते.
उशिरा का होईना ती प्रक्रिया सुरू झाली आहे. अण्णाभाऊ इतिहासाची राख झाडत उभे राहतायेत. लोक त्यांना शोधून वाचतायेत.

निलेश खंडाळे

लेखक पुणे येथे वास्तव्यास असून ते शॉर्ट फिल्ममेकर तसेच Kiaro Films चे संस्थापक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*