लोककल्याणकारी राजा शाहू महाराजांची दुष्काळ काळातील भूमिका आणि कार्य

विकास कांबळेे

छ. शाहू महाराजांनी २ एप्रिल १८९४ मध्ये कोल्हापूर संस्थानाचा कारभार हातात घेतला तेंव्हा शाहू महाराजांच वय अवघ २२ वर्षे होत. राजा कारभार समजून घेत होता, तोच संस्थानात दुष्काळाच सावट पसरलं. त्याच काळात प्लेगने देशभरात धुमाकूळ घातला सुरवात केली. शाहूंसमोर आधी दुष्काळ आणि नंतर प्लेग अस दुहेरी संकट आ वासून उभ होत. या काळात प्लेगने घातलेल्या धुमाकूळाबाबत अनेकांना माहीती आहे पण याच काळात कोल्हापूर संस्थानात दुष्काळाचेही थैमान सुरु होते याबाबत अनेकांना माहीती नाही. प्लेगच्याबाबत केलेल्या उपाययोजनांबाबत याआधी थोडी बहूत चर्चा झालीय. आता महाराजांनी दुष्काळाबाबत केलेल्या उपाययोजनांबाबत थोडी माहीती घेण्याचा प्रयत्न करु.

दुष्काळाची वार्ता समजल्याबरोबरच शाहूंनी संस्थानातील आधी रयतेची पाहणी केली, अनेक दुष्काळी भागांना भेटी दिल्या. लोकांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. कर्नल रें यांना लिहलेल्या पत्रावरुन महाराजांनी या दुष्काळात लोकांना पुरेसा रोजगार मिळतो की नाही याकडे स्वतः जातीने लक्ष दिल्याच दिसून येत. अन्न-धान्याच्या किंमतीतील कृत्रिम वाढीला आधीच चाप लावला. दुष्काळ केंद्रे मोठ्या प्रमाणात स्थापन केली आणि या केंद्रावर राजे अचानक कधीही कसलीही पूर्वसूचना न देता प्रकट होऊन पाहणी करत. शाहू महाराजांनी १८९९-१९०० या काळात दुष्काळ विभाग हा स्वतंत्र विभागच स्थापन केला आणि आपल्या दिवाणाची तिथे दुष्काळ आयुक्त म्हणून नियुक्ती केली. त्यावेळचे पोलिटकल एजंट यांनी महाराजांच्या कामाने भारावून जाऊन, ” आपल्या संस्थांनात दुष्काळ कामाची तरतूद करण्याकडे आपण जे प्रत्यक्ष लक्ष पुरवत आहात आणि दुष्काळाचा यशस्वी सामना केला त्याबाबत मला आपले अभिनंदन करणे अत्यंत जरुरीचे वाटते.” असे गौरवोद्गार पत्रातून काढलेत.

या काळात महाराजांनी सर्वात आधी लक्ष दिले ते स्वस्त धान्य दुकानांकडे. लोकांना पुरेसे धान्य रास्त किंमतीत मिळावे याकडे महाराजांनी काटेकोर लक्ष दिले. व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना खरेदी किमतीलाच धान्याची विक्री करण्यास आवाहन केले, फायद्याचे प्रमाण अत्यंत कमी ठेवण्यास बाध्य केले. पण काही व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन धान्याच्या किंमती वाढवल्या तेंव्हा महाराजांनी दरबाराकडून धान्याची खरेदी करुन स्वस्त धान्य विक्री केंद्रांची सुरवात केली. यापुढे जाऊन महाराजांनी व्यापाऱ्यांनी तोट्यात धान्य विकावे आणि तोट्याची भरपाई दरबाराकडून घ्यावी अशी सुचना दिली, परिणामी १८९७ मध्ये भरमसाठ वाढलेल्या धान्याच्या किंमती १८९८ मध्ये अत्यंत खाली आल्याच्या नोंदी आहेत. महाराजांच्या प्रेरणेने त्यांच्या जवळच्या लोकांनी ₹ ८५०० ची रक्कम जमवून स्वत दरात धान्य दुकानांची सुरवात केली. त्यामुळे इतर व्यापाऱ्यांनाही ना नफा ना तोटा तत्वावर धान्याच्या किंमती ठेवाव्याच लागल्या. अनेक वस्तूंच्या विक्रीच्या किंमती या काळात खरेदी किंमतीपेक्षाही कमी असल्याच्या नोंदी आढळतात. जेंव्हा धान्याचा तुटवडा जाणवू लागला तेंव्हा महाराजांनी अन्न धान्य बाहेरुन आयात केले. १८९६-९७ आणि १८९९-१९०० या काळात म्हैसूरच्या राजाला पत्र लिहून धान्य आयात केले, ब्रिटीशांकडूनही धान्य मागवून घेतले. आणि त्याचे न्याय वाटप व्हावे याकडेही स्वतः जातीने लक्ष द्या.

या काळात पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून नदी कालच्या गावी नव्या विहिरी खोदल्या, विहिरीतील गाळ काढून घेतला. अनेक ठिकाणी नवी तलाव बांधले, जुने तलाव दुरुस्त केले. दुष्काळी काळात महाराजांनी रस्ते आणि पुल बांधणीची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेऊन लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला. याचा दुसरा फायदा म्हणजे रस्ते-पुलं बांधणीमुळे संस्थानात सर्वत्र अन्न-धान्य पुरवणे सोपं झाल. या काळात महाराजांनी निपाणी-दाजीपूर रस्त्यावरचे तीन मोठे पुलं बांधले. पन्हाळा वगैरे भागात रस्ते बांधणीच्या कामाची सुरवात केली.

दरबारातील मजूर लोकांना, शिक्षकांना ज्वारीच्या बदलत्या किंमतीनुसार १८९६ पासून भत्ते देण्यास सुरवात केली. ३१ मे १९०० पर्यंत जवळपास ₹ १६०००/- रुपये भत्त्यांवर खर्च केल्याची तर या काळात ज्या दुष्काळी कचेऱ्या स्थापन केल्या त्यावर जवळपास ₹ २७०००/- रुपये खर्च केल्याची नोंद आहे. त्या काळाचा विचार करता हा खर्च खुप मोठा होता.

याकाळात दुष्काळामुळे स्त्री-पुरुष दोघांनाही कामाची गरज असे अशा वेळी त्यांच्या लहान मुलांकडे लक्ष देण्यासाठी, सांभाळण्यासाठी महाराजांनी ठिकठिकाणी शेड्स उभारले. या मुलांसाठी दरबाराकडून आयांची नेमणूक केली या मुलांसाठी दुधाचा खर्च दरबाराकडून केला जात. असहाय्य लोकांसाठी महाराजांनी कळकोट, पन्हाळा, बांबवडे बाजारभोगाव, गारगोटी, वळीवडे, तिरवडा, गडहिंग्लज, शिरोळ, वडगाव अशा ठिकाणी आश्रम स्थापन केले. या ठिकाणी जवळपास ५० हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था होत होती. त्यांना कपडे, औषधेही फुकट वाटली गेली. संस्थानातील म्हातारे, आंधळे, पांगळे लोक असतील त्यांना घरपोच शिधा वाटप केले.

दुष्काळात महाराजांनी जनावरांकडेही पुरेसे लक्ष दिल्याचे दिसून येते. त्यासाठी महाराजांनी, “ज्याला आपली जनावरे पोसण्याचे सामर्थ नाही त्यांनी ती संस्थानाच्या थट्टीत पाठवावी, ती तेथे पाळली जातील, जेंव्हा मालकाला जरुरी वाटेल तेंव्हा ती घेऊन जावी.” असा एक जाहीरनामाच काढला.

छत्रपती शाहू महाराजांनी या अल्पकालीन उपाययोजना म्हणून तात्काळ अंमलात आणल्या, या काळात काही दिर्घकालीन उपाययोजनाही केल्या होत्या. त्या उपाययोजनांबाबत पुन्हा कधीतरी…..

क्रमशः


विकास कांबळे

लेखक इंडिपेंडट रिसर्चर असून आणि फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

संदर्भ:- राजर्षी शाहू गौरव ग्रंथ, कित्ता, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*