ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच कामगार वर्गाचे दोन शत्रू- भाग ३

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जर तुम्हाला तुमच्यावरील अन्यायाचे परिमार्जन करावयाचे असेल तर त्यासाठी तुम्ही संघटन उभारू नये हा प्रश्नच उद्भवत नाही. पुढील प्रश्न असा की तुमच्या संघटनेला कोणते द्येय साध्य करून घ्यावयाचे आहे? तुमच्या उद्योगविषयक हेतूसाठी तुम्ही संघटन उभारले पाहिजे हे न सांगताही कळण्यासारखे आहे. परंतु प्रश्न असा की या हेतूसाठी तुम्ही वेगळे संघटन उभारावे की आधीच अस्तित्वात असलेल्या एखाद्या संघटनेत सहभागी व्हावे? कार्यावाहिला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वीच तुम्ही या प्रश्नाचा गंभीरपणे विचार करावयास हवा.

भारतातील कामगार संघटन हा एक खेदाचा विषय आहे. कामगार संघटनेचा मुख्य उद्देश पूर्णतः दृष्टिआड झालेला आहे. कामगार वर्गाच्या जीवनस्तराचे कमी होण्यापासून संरक्षण करणे हा कामगार संघटनांचा मुख्य उद्देश आहे. जन्मापासून व प्रशिक्षणामुळे जाणीव झाल्यामुळे युरोपातील प्रत्येक माणूस आपला जीवनस्तर समाधानकारकपणे योग्य स्थितीत ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत असलेला दिसतो. तो कमी करण्याचा कितीही भयानक प्रयत्न झाला तरी त्याला तो प्रतिकार करतो. भारतीय कामगारात हा दृढनिश्चय आढळून येत नाही, ही एक सुप्रसिद्ध बाब आहे. केवळ जिवंत राहण्यासाठीच तो धडपडत असतो आणि मिलने दर्शविल्याप्रमाणे “जेथे कोठे या निकृष्टतेकडे नेण्याच्या प्रयत्नांना निग्रही प्रतिकार करण्याची व समाधानकारक जीवनस्तर सांभाळण्याची लोकांची वृत्ती नाही तेथे मोठमोठ्या प्रगतीकारक राष्ट्रातही गरीब लोकांची अवस्था केवळ जीव धारण करण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचते.” माझ्या मते, जर कामगार संघटनांची नितांत आवश्यकता असणारा कोणता एखादा देश असेल तर तो भारत हाच होय. परंतु मी म्हटल्याप्रमाणे, भारतातील आजचे कामगार संघटन हे एक दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचे डबके झालेले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे कामगारांचे नेतृत्व एक तर भित्रे, स्वार्थी किंवा पथभ्रष्ट आहे. त्यात काही असेही नेते आहेत की जे केवळ आरामखुर्चीवरचे तत्वज्ञानी आहेत किंवा केवळ वर्तमानपत्रात आपले वक्तव्य प्रसिद्ध करण्यातच खूष असणारे राजकारणी आहेत. कामगारांना संघटित करणे, त्यांना शिक्षित करणे आणि संघर्षामध्ये त्यांना मदत करणे हा त्यांच्या कर्तव्याचा भागच नाही. ते केवळ कामगारांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी व त्यांच्या वतीने बोलण्यासाठी चिंतातुर तर आहेत, परंतु कामगारांशी प्रत्यक्ष संपर्क ठेवण्याचे मात्र ते टाळतात. कामगार नेत्यांचा दुसरा प्रकार असा की, ते केवळ स्वतःला सेक्रेटरी, अध्यक्ष किंवा असेच एखादे पद मिळविण्याच्या हेतूने कामगारांच्या संस्था उभारण्यात दंग राहतात. त्यांची ही पदे सांभाळण्यासाठी ते आपल्या संस्था नेहमी वेगळ्या व परस्परविरोधी ठेवण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी तर असेही लज्जास्पद व थक्क करून सोडणारे प्रसंग पाहण्यास मिळतात की, या विभिन्न संस्थातील लढाई, कामगार आणि मालक जर असेल तर त्यांच्यातील लाढाईपेक्षा फारच दुर्धर असते आणि हे सर्व कशासाठी, तर काही लोकांना कामगारांचा पुढारी म्हणून मिरवून घेण्याची व त्यावर सत्ता गाजविण्याची केवळ हौस असते एवढ्याचसाठी!

तिसऱ्या प्रकारचे नेतृत्व कम्युनिझमच्या तत्त्वावर विश्वास असणाऱ्यांचे आहे. त्यांचा हेतू कदाचित चांगलाही असेल परंतु ते भलत्याच मार्गाला लागलेले आहेत आणि त्यांच्यापेक्षा कामगारांचा अधिक नाश दुसऱ्या कोणीही केला नाही, असे म्हणण्यास मी मुळीच कचरणार नाही. आज जर कोणत्या कारणाने कामगार संघटनेच्या पाठीचा कणा पूर्णतः तुटला असेल, जर आज मालक कोणत्या कारणाने वरचढ झाले असतील, जर आज कामगार संघटन ही एक शापित वस्तू होऊन बसली असेल तर त्याचे एकमेव कारण म्हणजे एकेकाळी कामगार संघटनेवर कम्युनिस्टांचा पूर्णतः कब्जा झाला होता व याचा त्यांनी दुरुपयोग करून घेतला हेच होय. कामगारांमध्ये कोणत्याच प्रकारचे असमाधान नाही, असे समजून त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण करणे, हे त्यांचे ध्येय असावे, असे दिसते. कारण असंतुष्ट कामगार वर्गाच्या संघटनेद्वारे क्रांती घडवून आणता येईल व कामगारांचे राज्य स्थापन करता येईल असा त्यांना विश्वास वाटतो म्हणून कामागारात असंतोष निर्माण करण्याची व त्याद्वारे कामगार संघटन बांधण्याची त्यांनी मोहीम उघडली आहे. क्रांती यशस्वी होण्यासाठी केवळ असंतोष पुरेसा नसतो; त्यासाठी कशाची आवश्यकता असेल तर न्याय्यतेची, गरजेची आणि सामाजिक व राजकीय हक्कांच्या गंभीर व परिपूर्ण जाणीवेची.

क्रांतिकारक मार्क्सिस्टही जितकी रानटी पूजा संपाची करीत नाहीत इतकी रानटी पूजा सिंडिक्यॉलिस्ट (केवळ कार्यकारी मंडळ असलेले) कम्युनिस्टांनी मागील काळात केलेली आहे. क्रांतिवादी मार्क्सिस्टांनी संपांना काधीही ‘क्रांतीचा पाहिला पाठ’ मानलेला नसून सर्व उपाय थकल्यानंतर वापरावयाचे एक गंभीर व अंतिम साधन म्हणूनच मानले आहे. परंतु कम्युनिस्टांनी हे सर्व वाऱ्यावर भिरकावून देऊन कामगारांमध्ये असंतोष निर्माण करण्याचे एक दैवी साधन या दृष्टीने संपाकडे पाहिले. त्यांनी अधिक जास्त असंतोष निर्माण केला असो की नसो परंतु त्यांच्या शक्तीचा व सत्तेचा मुख्य स्त्रौत असलेल्या कामगार संघटनेचा मात्र निश्चितच सर्वनाश केला आणि सध्या ते भांडवलशाही संघटनांचा आश्रय शोधण्याच्या मार्गास लागलेले आहेत. अशा प्रकारच्या निरर्थक चळवळीपासून या पेक्षा अधिक काय अपेक्षा करता येण्यासारखी आहे. आगीत भडका उडवून देण्याच्या प्रयत्नात आपल्या स्वतःच्या घराचीही काळजी न घेणाऱ्या आगलाव्यासारखाच कम्युनिस्ट माणूस सिद्ध झालेला आहे.

याचा परिणाम असा झाला की कामगारांनी जिच्यावर विसंबून राहावे अशी एकही संघटना अस्तित्वात राहिली नाही. मुंबईच्या कापड गिरण्यात जी अस्वस्थता पसरली आहे तिच्याबद्दल मी बोलत नाही. त्या संबंधी जितके कमी बोलले जाईल तितके बरे. परंतु जी.आय.पी. रेल्वे कामगारांचे संघटन १९२० साली उभारण्यात आले. ते १९२२ ते १९२४ पर्यंत मृतप्रायच होते. त्याचे पुनरुज्जीवन १९२५ साली करण्यात आले. १९२७ मध्ये दुसरे एक संघटन ‘जी.आय.पी. रेल्वेमेन्स युनीयन’ या नावाने काढण्यात आले. १९३१ साली या दोन्ही संघटनांमध्ये ऐक्य करून ‘रेल्वे वर्कर्स युनियन’ ही संस्था काढण्यात आली. १९३२ मध्ये या संस्थेत पुन्हा फूट पडली आणि ‘रेल्वे लेबर युनियन’ या नावाने दुसरी एक संस्था काढण्यात आली. १९३५ मध्ये जुन्या ‘जी.आय.पी. स्टॉफ युनियन’ चे पुनरुज्जीवन करण्यात आले आणि नवीन संस्था म्हणून सुरु करण्यात आली. ती आता मान्यता पावलेली संस्था असून रेल्वे कामगारांच्या हितासाठी जपणाऱ्या या संघटनांमध्ये जोरदार विरोध व शत्रुत्व आहे. कम्युनिस्ट पुढारी व कम्युनिस्ट नसलेल्या रेल्वे कामगार पुढाऱ्यांमध्ये नेतेपदासाठी चाललेल्या चढाओढीचा हा सारा परिणाम आहे. ‘ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस’ ही कामगारांची केंद्रीय संघटना १९१९ साली स्थापना करण्यात आली. कामगारांच्या सर्व संघटना या काँग्रेसला १९२९ पर्यंत जोडून देण्यात आल्या होत्या. १९२९ साली नागपूरला फूट पडली आणि कम्युनिस्ट पुढाऱ्यांचे नेतृत्व नाकारणारे फुटून बाहेर पडले व त्यांनी ‘नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशन’ या नावाची नवीन संस्था स्थापना केली. या दोन संस्थांमध्ये तीव्र स्वरूपाचा शत्रुभाव कार्यरत आहे. १९३१ व १९३२ साली या दोन विरोधी संस्थांमध्ये एकी घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु तो अयशस्वी झाला. त्या बाबत आताही प्रयत्न होत आहेत. त्यातून काय निष्पन्न होणार आहे कोणास ठाऊक.

अशा परिस्थितीत तूमहाला काही उपदेश करणे माझ्यासाठी मोठे कठीण काम आहे. जर तुमच्याजवळ अशी संस्था संभाळण्यासाठी माणसे असतील तर तुम्ही तुमचे स्वतःचे वेगळे संघटन उभारले असते तरी सुद्धा त्यात काहीही वाईट झाले नसते. अर्थात ही एक मोठी अट आहे. एखाद्या संघटनेची भरभराट व्हावयाची असल्यास तिने कार्य केले पाहिजे आणि कोणतीही संघटना जर समर्थ व्यक्तींची सेवा उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरली तर ती कार्य करू शकत नाही . तुमचे संघटन चालविण्यासाठी अशी माणसे तुम्ही मिळवू शकाल काय? जर तुम्हाला हे शक्य असेल तर तुम्ही स्वतःचे संघटन तयार करा. वस्तूतः तुम्ही असे केले तर अधिक चांगले होईल. कारण विभिन्न संघटनांचा परिणाम विभक्ततेच्या भावनेत किंवा दुर्बलतेत होतोच असे नाही. ही तुमची संघटना समान उद्देशांच्या व समान कार्याच्या एखाद्या कामगारांच्या केंद्रीय संघटनेशी तुम्ही जोडूनही देऊ शकता. जर तुमची स्वतंत्र संघटना तुम्ही उभारू शकत नसाल तर सध्या अस्तित्वात असलेल्या एखाद्या संघटनेत तुम्ही सहभागी होऊ शकाल. परंतु अशी संघटना आपल्या स्वतःच्या कार्यासाठी तुमचा दुरुपयोग करून घेणार नाही, याची काळजी घ्या. असे घडण्याचा धोका फारच मोठ्या प्रमणात आहे. मुंबईच्या कापड गिरण्यात असेच घडले होते. तेथे विणकरांच्या हितासाठी लागोपाठ संप पुकारण्यात येत असे आणि त्या संपाला कताईवाले पाठिंबा देत राहिले. हे टाळण्यासाठी तुम्ही दोन शर्तींसाठी आग्रह धरला पाहिजे. प्रथमतः तुम्ही कार्यकारी मंडळामध्ये खास प्रतिनिधित्वाच आग्रह धरावा. म्हणजे तुमच्याशी संबंधित खास प्रश्नांकडे संघटनेचे लक्ष तुम्हाला वेधून घेता येईल व पाठिंबाही मिळेल. दुसरी अट अशी की तुमच्या वर्गणीपैकी काही भाग आवश्यकता पडल्यास केवळ तुमच्या तक्रारी निवारण करण्यासाठी राखीव ठेवण्यात यावा, असा आग्रह तुम्ही धरला पाहिजे. जर तुम्ही तुमची स्वतःची संघटना उभारण्याचा निर्णय घेतला नाही व दुसऱ्या एखाद्या संघटनेत सामील होण्याचे ठरविले तर या दोन अटी तुम्ही मान्य करून घेतल्या पाहिजेत.

~~~

क्रमशः

येथून https://roundtableindia.co.in/Marathi/?p=2212&fbclid=IwAR3vNLoSdEncsMPimINHlpdFIwMn4r91rccgMOG_wnkdCMLd1JnEl3caMNU

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे आपले संविधान-2 “ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच कामगार वर्गाचे दोन शत्रू!” पृष्ठ क्र.१३-१७, कौशल्य प्रकाशन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*