
प्रज्ञा जाधव
वरवर सगळं कितीही आलबेल वाटत असलं तरी माणूस आतून खंगत जातो, त्यात जर मी कशालाच आणि कोणालाच घाबरत नाही असं म्हणणारा कोणी असला तर नेमकं काय बिघडतय, कुठं जुळवता येईल हे शोधण्याचीही शक्यता मावळते.
चळवळ मोठी संकल्पना आहे,माणसाने निर्माण केलेली आहे परंतु माणसांशिवाय चळवळीचे काय अस्तित्व आहे? त्यातला एखादा निघून जाणं म्हणजे एक मोठा स्तंभ कोसळण्यासारखे आहे.
मृत्यू अनित्य आहे, हे कितीही मान्य असलं तरी एखादी चालती फिरती, बोलणारी व्यक्ती अचानक दिसेनाशी होणं, हे पचवणं वाटतं तितकं सोपं ही नाही.
चळवळीशी बांधिलकी, जगण्याची धडपड आणि त्यातून निर्माण होणारा गुंता हा त्या व्यक्तीला बहुतेक कळेनासा होतो कारण, सततचा अवघड प्रवास सरावाचा होऊन जातो, परंतु बाहेरून पाहणाऱ्याला ते वस्तुनिष्ठतेने पाहता येते, किमान तसा दावा तरी करता येतो, कोणाची कार्यपद्धती काय आहे, कोण कोणत्या विचारसरणीचा आहे, कोण रस्ता बदलून वेगळ्या वाटेने जातोय वगैरे वगैरे.. पण गुंत्यात अडकलेल्याला तेवढेही स्वातंत्र्य नसते, आणि ही गोष्ट बाहेरून पाहणाऱ्या कुणाच्याही लक्ष्यात येत नाही. त्यात कोणासमोरही न झुकण्याचा बाणा हा कधीच मोडला जात नाही आणि मग बाहेरच्याला कोण खरा, कोण खोटा, कोण आंबेडकरी, कोण डावा किंवा कोण समाजवादी हे ठरवण्याची मुभा मिळत जाते.
आत अडकलेला तो गुंता सोडवत जाण्यातच क्षीण होत जातो.
काही माणसे कधीच नजरेआड जाणार नाहीत, कितीही काही झालं तरी ते आपल्या आसपासच राहणार आहेत अशी आपण समजूत करून घेतो, त्यातलाच एक बुद्धप्रिय कबीर. कुठल्याही कार्यक्रमात हमखास दिसणारा आणि कोणीही पाहता क्षणी त्याच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडावं असा देखणा. ‘अरे, भाई मैं हुं ना कह्याला कोण लागतं बाकीचं तुला’ हे त्याच धीर देणारं आश्वासक वाक्य नेहमी ऐकवायचा, तो होताच असा कोणालाहि आपल्याच घरातला जिवाभावाचा वाटावा असा.
२०१८ मध्ये पहिल्यांदा त्याच्या तब्बेतीचं समजलं, दिल्लीतून इथे येणे शक्य नव्हते, म्हणून आईला भेटायला पाठवलं, बोलण्यास मनाई असल्याने त्याने आई ला वहीवर लिहून सांगितलं, ‘अक्का, मला फक्त फळाचा रस पिता येतो, तू दगदग करत येत नको जाऊ दवाखान्यात इथं खूप लोकं आहेत सोबत मला, पोरीला ला सांग एकदा फोन करायला’ मी तो फोन कधीच केला नाही त्याला त्या अवस्थेत पाहणे शक्य नव्हते.. पण काही काळाने तो उठून उभा राहिला आणि हायसं वाटलं. आणि भेटी होत राहिल्या.. तू एवढा चिडचिड नको करत जाऊ सांगितलं की म्हणायचा, अरे माझा बाप कोण आहे, त्यानं हळू आवाजात बोलायला नाही शिकवलं मला. तू लै कडू बोलतो असं मला त्याला हक्कानी सांगता यायचं. २ वर्षांपूर्वी पर्यंत दर महिन्याला किमान एक तरी फोन आवर्जून यायचा, चांगलं है ना तुझं सगळं नीट अभ्यास कर, लवकर डॉक्टर हो असं दटावून सांगायचा. त्याच्या भल्यामोठ्या सहिचं मला लहान असल्यापासून च अप्रूप होत, मी कोर्टातून मंजूर करून घेतेल आहे हि सही, साधी सुधी नाहीये बाई ती. सडेतोड होता, तिखट बोलणारा होता पण त्याच्या मायाळू असण्यालाही सीमा नव्हती. मी खरा आहे म्हणून आवाज मोठा आहे माझा हे त्याचं नेहमी सांगणं असायचं. कुठं बी बसलो ना मी पन माझा विचार नाही सोडत असं ठणकावून सांगायचा.
व्यक्त होणं सोपं नसतं, ते एका प्रक्रियेतून जावं लागतं, त्याच्या सोबतचा शेवटचा संवाद तक्रारीचा होता, काहीतरीच अवतार करून फिरतोय, असं म्हंटल्यावर मला वाटत तसाच राहतो मी असं सांगत होता. बाबाच्या कार्यक्रमाची पत्रिका त्यानेच बनवली होती, तेव्हांचीच आमची शेवटची भेट.
मोकळ्या-ढाकळ्या बुद्धप्रियाने निर्वतने हे चटका लावून जाणारे आहे, तो रोखठोक होता, खंबीर होता, शंभर लोकांतही दुरूनच ओळखता येईल अशा शारीरिक उंचीचा तसेच वैचारिक प्रगल्भतेचाही होता, त्याच्यात कुठला आव नव्हता, मी कोण आहे हे सांगण्याची भूक नव्हती, काहीही गमावण्याची भीती नसणारा होता. कुठेही सामावून जाणारा पण स्वतःचे अस्तित्व अबाधित राखुन ठेवणारा होता. त्याच्या वावरण्यात, दिसण्यात जी आग होती ती कधीही शमली नाही
चळवळी जगवाव्या लागतात, पोसाव्या लागतात आणि याचं प्रचंड ओझं काहीच जण अविरत वाहत असतात. कोण किती मोठा झाला यापेक्षा काय काय काम करून मोठा झाला हे महत्त्वाचं ठरतं, काम करून मोठा झालेल्याला त्याचा मोबदलाही मिळतो, पण तुटपुंज्या स्वरूपात, ज्याने जगण्याचे प्रश्न बहुतेकदा अनुत्तरित राहतात.
भानावर येण्यासाठी एखादा फटका कारणीभूत ठरतो, कोण कसा? त्याचं काम काय?त्याची विचारसरणी काय हे त्याला ना विचारताच ठरवून मोकळं होणं हे किती अन्यायकारक असू शकतं. चळवळीचं उदात्तीकरण करताना त्याचा पाया मजबूत राहतोय का? की कुठे डागडुजी करायची आहे हे पाहता आलं पाहिजे..
काहीतरी घडून गेलं की प्रश्न पडायला, आत्मपरीक्षण करण्याला सुरुवात होते, पण हे अंधारात चाचपडण्यासारखं आहे.
हे असं का होत असेल, चळवळ माणसापेक्षा मोठी असू शकते का? केंद्रस्थानी कोण असायला पाहिजे? कुणाच्या असण्या-नसण्याने चळवळ थांबत नाही, असं का? मुळात चळवळीचं स्वरूपच काय?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत कधीतरी.
लिहायचंहि बाकी आहे खूप,तूर्तास एवढंच!
बुद्धप्रिय कबीराला जयभीम.

Leave a Reply