“मेरिटॉक्रसी: एक घातक मिथक” (भाग 2) ~ गौरव सोमवंशी

थोडं मनातलं…

वरवरून एकेमेकांशी संबंध नसलेल्या काही विषयांवर लिहितोय इथे, जर शेवटपर्यंत संबंध नाही लागला तर क्षमस्व . अनेक गोष्टींवर बोलायचंय पण वेळ कधीमधून एकदाच मिळतो, त्याचे परिणाम.

तर. सुरुवात करतो रोजगारापासून. सध्याचं जॉब मार्केट हे अत्यंत अदृश्य पण कणखर फिल्टर्सने ग्रासलेले आहे जे की खात्री करत की विशिष्ट जात-वर्गातील समूहच आत प्रवेश करू शकेल, आणि उरलेले अपवाद फक्त नियमाला अधोरेखित करायचं काम करतील. मग यास उपाय काय?माझ्याकडे उत्तर नाही, पण “परस्यूट ऑफ हॅपिनेस” सारख धडपड करत राहणं हे त्यातील एक भाग आहेच, किती जरी ढोबळ वाटला तरी . 100% यश मिळेल वगैरे असं काही नसतं कारण वरच्यांनी साठवून ठेवलेल्या साधनसंपत्ती पासून जो तुकडा उरतो त्यामध्ये वाटा मिळवणे यामध्ये नशीब पण येतच. या मेरिट,हुशारी, टॅलेंट वगैरे या संकल्पना त्यांच्या थट्टेच्या स्वरूपातच या समाजात अस्तित्वात आहेत असे मी मानतो, स्वतःला पण त्यातील एक भाग मनात. या धडपडीमध्ये एका गोष्ठीमागे, मग ती स्पर्धापरीक्षा असो किंवा कोणती स्टार्टअप /धंदा, यामागे चिकाटी असावी पण “आता पर्यंत इतकं गमावलाय थोडं अजून वर्षे करून पाहू” ही भावना नसावी.

माझा एक भावासारखा मित्र एका स्पर्धापरीक्षाच्या मागे अनेक वर्षांपासून होता, आणि शेवटपर्यंत काही ना काही क्षुल्लक कारणामुळे त्याच झालं नाही.वयोमर्यादा संपली.पण इतके वर्ष तो मन लावून करू शकला म्हणून नंतर त्याला नवीन सुरुवात करणे सहजशक्य झाले.माझे तसे नव्हते. 2 वेळा युपीएससी प्रेलीम काढली पण स्वःताची मेन्सच्या अभ्यासासाठी असलेल्या काळात केलेलं दैदिप्यमान टाईमपास पाहून मला कळले की हे नाही वाचू शकणार मी कोणत्याच वर्षी. स्वतःलाच खोटं बोलतोय मी की पुढच्या वेळी नक्की अभ्यास करू वगैरे.

तेच मला माझ्या 4 जिवलग आय.आय.एम. च्या मित्र-मैत्रिणीं सोबत पण अनुभव आला जेव्हा 2 वर्षाची बंगलोर मधील स्टार्टअप आम्ही जास्त न रेटायच ठरवलं आणि सगळे जण पुन्हा एकदा
नौकरीत गेले, आणि मी माझी पहिली, आणि थेट इंजिनिअरिंग पासून टाळत आलेली “कॉर्पोरेट’ नौकरी स्वीकारली.

या धडपडीमध्ये मध्ये ज्यांना चांगला रोजगार नौकरी मिळाली त्यांनी किमान एक लक्षात घ्यावे.मी अस कधीच मानणार नाही की मी कोणती जागा नौकरी पगार वगैरे यासाठी पूर्णपणे स्वतःस पात्र ठरवलं आहे कारण या देशात प्रिविलेज लागतातच. असंख्य व्यक्ती माझ्या बरोबरीने स्पर्धा नाही करू शकले म्हणून मला सोपे गेले , ही जाणीव ठेवावी. कारण मी स्वतःला पात्र केलं तर या सगळ्या व्यवस्थेला सुद्धा क्लीन-चिट देण्या सारखं झालं. नुसती जाणीव ठेवून पण काही होत नाही म्हणून काही न काही मार्गाने याला काउंटर-बॅलन्स करत राहावे. स्वतःचे उद्धार करणे हे ‘अनायलेशन ऑफ कास्ट’ चा नुसता भाग आहे, त्याचे 100% रूप नाही.

तर या सगळ्यामध्ये सांगायचं हे की जमेल तिथे हात पाय मारत गेलो. मध्ये 6 महिने पुण्याला इंग्लिश गणित चे क्लास घेतले, बंगलोरला पण शिकवले, फ्रिलांस मार्केटिंग काम केलं, फ्रिलांस लोकांचे विविध डॉक्युमेंट बनवून दिले, आणि ही धडपड सगळ्यांचाच जीवनाचा भाग आहेच. यामध्ये पण एक सांगायचं आहे. सामाजिक किंवा मुख्यतः आंबेडकरी चळवळीमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात
येते, ज्यांना चांगल्या जागा मिळाल्या त्यातील बहुतांश लोकांनी जाणीवा राखल्या (इतर लोकांसाठी ही पोस्ट नाहीच), पण मग कामाधंद्यामध्ये इतका वेळ गुंतला की वैचारिक व सैद्धांतिक बाबींसाठी आपण इतरांवर नको तितकं निर्भर राहायला लागलो. त्यामुळे बिनकामाचा वापर होत राहिला, कोणाकडूनपन. थोडंफार “सतर्क” राहणं हे पूर्णपणे अजाण राहण्यासारखेच आहे. कारण थोडं कोणी गोड बोललं किंवा काही स्टंट केला की आपण त्यांचे जीवनभराचे फॅन होण्यासाठी सज्ज. ही फॅन बनायची तगमग त्या स्वतः कराव्या लागणाऱ्या वैचारिक श्रमाला टाळल्यामुळे अजून जास्त वाढते, वरून समाजाने लादलेला न्यूनगंड. कोणी भारावून जाऊन उजव्याकडे जात असेल तर आपण पण भारावून जाऊन कोणत्यापण तात्पुरता प्रगतिशील किंवा चळवळीतीलच फक्त आवाज करणाऱ्या शीक्क्यांकडे आकर्षित होतो.

त्यातल्या त्यात अकेडीमिया मध्ये परिस्थिती अनेक पटींनी विदारक आहे जिथे न्यूनगंडावर नाचवून एकदम सोयीस्कर थेऱ्या लादल्या जात्यात ज्याने कोणत्याच व्यवस्थेला कोणताच तडा बसणार नाहीये, उलट स्टेटस-को भक्कम होत राहतील.

म्हणून वैचारिक श्रम हे असे आहे जे प्रत्येकाने करावेच लागेल. यामध्ये “श्रमविभागणी”कशी चालणार, ‘अत्त दीप भव’ याला काही अर्थ आहे की नाही. वाचन प्रत्येकालाच करावे लागणार. याचाच अर्थ असा पण होतो की कोणत्याच व्यक्तीच्या शब्दांना, ते किती का मोठे सेलेब्रिटी असेना, किती का मोठ्या पदावर असेना , पण कोणतेच शब्द विचार न करता सोडायचे नाहीत. जुनी मतं बदलायला घाबरायचे नाही. गट पक्ष वगैरे सोडणं जोडणं हे सुरू राहिलच पण प्रत्येक वेळेस स्वतःशी प्रामाणिक राहावं. हे मला कितपत जमलं यासाठी मी स्वतःला स्वतःच जाब विचारताच रहातो.

काहीच करायला काहीच वेळ मिळत नाही आणि मला माहित आहे की तडजोडीचे समर्थन करत राहणे अविरत चालू राहू शकतं जर काहीच वेगळं नाही केलं तर, म्हणून ते प्रयत्न केव्हापासून सुरू आहेच.

शेवटी, आणि तरी पण सगळ्या कालखंडात सिंहाचा वाटा उचलला तो….. टाइमपासने. खूप वैयीक्तिक कारण आहे ज्यामुळे मी पब्लिकली शंभर-एक रडक्या कविता फेसबुक/इन्स्टाग्राम वर पोस्टला ज्या स्वतः परत ढुंकून पण पाहत नाही 😛 . पण तितकं चालायचं. जर कोणती गोष्ट नाही चालत तर ती ही की कोणत्यापण वैयीक्तिक नैराश्याला (मेडिकल नैराश्य वेगळं, त्यास सगळी मदत लागेलच), तर या नैराश्याला इतकं पुढे जाऊ देणं की त्याचे पडसाद तुमच्या घरच्यांवर व मित्र-मैत्रिणींवरपण दिसू लागतात. तिथे मात्र थोडे जबरदस्तीने का होईना पण स्वतःला मार्गावर आणणे गरजेचे, हे मी स्वतःला सांगत असतो (पण करत नाही काही). सर्वात जास्त सत्य तेव्हा तोंडातून बाहेर पडतं जेव्हा तुम्ही मित्र-मैत्रिणीला समजावून सांगत असतात, की “अरे जाऊन ये ती बोलावतीये तर कॉफी प्यायला”, “अग सारखं त्याच्या सोबत तुलना करू नकोस बाई”, हे सगळं समजवताना स्वतःलाच किती शब्द लागू होतात हे कळत.

अशी मित्र-मैत्रिणी आणि आईवडील लाभले, हे पण नशीबच, एक प्रिविलेजच. ते सगळ्यांनाच मिळत नाही, मग त्यांच्या कडून जास्त शिकायला मिळेल हे पण लक्षात राहू देतोच.

बाकी खूप बोलायचं आहे , मुख्यतः तंत्रज्ञानावर आणि त्याचे पुढे उमटणारे पडसाद, आणि वेळ मिळेल तसा लिहिलं.


~ गौरव सोमवंशी

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच ते खालील इतर संस्थांशी संलग्न आहेत.

Fellow – Royal Academy of Engineering, London, Future Leader – British Council, Dalai Lama fellow – Virginia University, Member – African Blockchain Alliance

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*