भेदभाव आणी हिंसा हे जात व्यवस्थेचे सेकंडरी बायप्रोडक्ट आहेत. त्या आधी तुमचं अवघं अस्तित्व, जिवंत असणं डिफाइन करणं हे जात व्यवस्थेचं प्रायमरी काम. ~ गुणवंत सरपाते

खरं सांगायचं झालं तर एकेकाळी माझं पण जात व्यवस्थेबद्दल आकलन हे अगदी टिपीकल, शोषक वर्गाला पूरक असेल असचं होतं. म्हणजे मला वाटायचं की ‘सगळी सवर्ण वाईट नसतात’ किंवा ‘चांगले वाईट लोक सगळ्या जातीमध्ये असतात’ इतकं येडपट , आयसोलेटेड आणी हास्यास्पद. म्हणजे जातवास्तवाला प्रवृत्तीसारखं, बिहेवरल(behavioral) अँगलने पाहायचो. नंतर जात, तिचे फायदे आणि शोषण हे इन्स्टिट्यूश्नलाईज्ड, स्ट्रक्चरल असतं हे कळायला थोडा वेळ लागला.

गावातली लोकं आपल्याशी असं का वागतात असं जेंव्हा लहानपणी घरी विचारायचो तेंव्हा घरचे सांगायचे, ‘की ती लोकं सवर्ण आहेत, त्यांच्या पद्धतीनुसार आपण त्यांच्याहून खालचे. त्यामुळ त्यांच्या विहीरीवर नाही जायचं!’. गावगाड्यातल्या संबंध वेदनादायी जडणघडणीतून मी ‘जात’ ह्या शब्दाचा अर्थ फक्त ‘अन्याय-अत्याचार’ आणी ‘भेदभाव’ इतकाचं करायचो. इथं पण त्यांच्या प्रस्थापित , प्रो-ब्राह्मणी नरेटीव्हला बळी पडतोय हे हळूहळू लक्षात यायला लागलं.

जेंव्हा तुम्ही जात वास्तवाला फक्त ‘भेदभाव’ व ‘हिंसा’ ह्या अश्या क्रियापदांपुरत मर्यादित, बंदिस्त करता तेंव्हा तुम्ही फुले-आंबेडकरां पासून चालत आलेल्या ह्या सम्रग संघर्षाला एका झटक्यात निकाली काढत असता. तुम्ही शोषणाच्या संपूर्ण स्ट्रक्चरला नकळत पाठींबा देत असता. कसं ते पुढ पाहूयात. त्या आधी ‘जात’ नक्की काय असत ते समजून घेऊया. गौरवने जात व्यवस्थेला फार प्रभावीपणे व्याख्याबद्ध केलेलं.

जात एक स्ट्रक्चर असतं. जात म्हणजे आपली संपत्ती असते. आपल्या वाडवडलांची पूर्वजांची संपत्ती, जमीन जुमला, वाडे, घरं. जात म्हणजे प्रतिनिधित्व असतं तसचं प्रतिनिधित्वा पासून नाकरणं. जात ठरवते की तुम्ही एक मुक्त, फ्री कसलचं सामुहिक ओझं नसेलेला स्वच्छंदी इसम म्हणून आयुष्य जगणार आहात की तुमच्या एका चुकीमूळ तुमच्या आख्या समुहाची ‘हे असलेच असतात’ म्हणून तुमची लायकी काढली जाणार आहे. तुमची जात ठरवते की न्यूज मिडीया, न्यायालयं, शासन, प्रशासन सारख्या संस्था तुमच्यासाठी काम करतील की तुमच्या विरुद्ध काम करतील. तुमची जात ठरवते की तुम्ही कुणाशी प्रेम करू शकता, कुणाशी लग्न करू शकता आणी कुणाशी नाही. जात ठरवते की सामजिकरीत्या तुम्ही वगळले जाणार का समील करून घेतले जाणार. तुमचं सामजिक, राजकीय, आर्थिक,सांस्कृतिक स्थान, त्याचं सोबतचं भांडवल, प्रिविलेज हे तुमच्या जातीवरून ठरत. जात हि निव्वळ मानसिक अवस्था नसून समोर ढळढळीत दिसणार क्रूर सत्य आहे जे तुमचं अगदी जन्म घेतल्या पासून मरेपर्यंतचं अवकाश ठरवत.

एवढ क्लियर?

तर, भेदभाव आणी हिंसा हे जात व्यवस्थेचे सेकंडरी बायप्रोडक्ट आहेत. त्या आधी तुमचं अवघं अस्तित्व, जिवंत असणं डिफाइन करणं हे जात व्यवस्थेचं प्रायमरी काम. त्यामुळं ह्या व्यवस्थेचे सगळेच्या सगळे लाभ घेत, आपलं मस्त आयुष्य जगत असलेले अप्परकास्ट (दोन्ही लेफ्ट-राईट व लिबरल-अर्थोडॉक्स) जेंव्हा मला येऊन म्हणतात की ‘आपण जातपात नसून हिंदू आहोत’ किंवा ‘आपण जातपात नसून माणूस आहोत’ तेंव्हा मी दोघांनाही फाट्यावर मारतो. सगळ स्ट्रक्चर जश्यास तसं ठेवून ‘मी जातपात मानत नाही, फक्त हिंदू’, ‘मी प्रागतिक विचारांचा, फक्त माणूस’ असं म्हणायला अंगात कमालीची बेशरमी व निगरगट्ट दांभिकता लागते. कारण जेंव्हा जातवास्तवाचं कोअर स्ट्रक्चर ह्या विषयाला सोडून आपण फक्त ‘भेदभाव’ आणी ‘हिंसा’ ह्यावरचं फोकस करत असू तर ‘आम्ही भेदभाव करत नाही ओ ’ म्हणत शोषक वर्गातला एक तबका लगेच तयार होतो, आपलं सगळं स्टेट्स को अबाधित ठेवून, स्वतःचा सवर्ण गिल्ट शमवायला. सुप्रीमसी अशीच काम करते.

मागे एकजण इथं म्हणत होता,’ तुमच्या सोबत माणसासारखं एका ताटात जेवल पाहिजेत, दलितांना योग्य रीप्रझेंटेशन मिळालं पाहिजे’’…त्याला म्हणलं मी माणूसचं आहे रे भावड्या.. आम्ही कधीचे माणूस आहोत..आधी तू सगळ जातीचं भांडवल फेकून देत माणूस होऊन ये.. आणी हा समग्र शोषण मुक्तीचा लढा काय फक्त ‘आम्हाला चांगलं वागवून घ्या जी’ ह्या साठी नाहीय. नाही बाळा तसं नाहीय! तू समजून घे की, हा समग्र संघर्ष ज्या शोषणकारी व्यवस्थेचा तू लाभार्थी आहेस, ज्या शोषणाच्या जीवावर हे आजचं प्रिविलेज्ड आयुष्य जगतोय त्या व्यवस्थेला पूर्णपणे उध्वस्त करण्यासाठीचा आहे. बाय एनी मिन्स नेसीसरी!

चळवळी कशासाठी असतात तर शोषक वर्गाला अधोरेखित करण्यासाठी. ज्या पावर स्ट्रक्चर मधून हे शोषण काम करत असतं त्या स्ट्रक्चरवर सतत, सामूहिक हल्ले चढवुन त्याला खीळखीळ करण्यासाठी. ब्राह्मणी व्यवस्थेतून ज्या कथाकथित मूठभर उच्चवर्णीयांकडं पिढ्यानपिढ्या पासून जो अमर्याद अधिकारं, जातीय भांडवल, संसाधनावरील मालकी, संस्थावरील ताबा आहे त्याला पूर्णतः मोडीत काढण्यासाठीचा. त्यामुळं परिवर्तन, प्रबोधनातून, समविचारातून, संवादातून, एकत्र बसण्यातून शोषक वर्ग शोषणाचे फायदे सोडेल ह्या निव्वळ गुलाम मानसिकतेतून, हास्यास्पद रोमँटिसिझम मधून बाहेर या. जगात कुठं असं होतं नसतयं.

आपलं नवीन पोरांना सरळ सांगणं असतंय ह्या बाजारपेठेत कच्चामाल, डेटा होऊ नका. गप शिक्षण, करियर घरदार बघायचं, पुढं व्हा. एकेकजण चेन ब्रेक करत चला. हा काही ‘अ’ विचारधारा विरुद्ध ‘ब’ विचारधारा असा फक्त वैचारिक लढा तर अजिबात नाहीय. हा लढा अस्तित्वाचा आहे. जिवंत असण्याचा आहे. स्वतःचं माणूसपण, स्वतःचं स्थान, स्वतःची डीग्नीटी, आपलं आयुष्य, आपल्या महत्वाकांक्षा एकूणच ‘आपलं’ असणं कोणत्याच उच्चवर्णीयला, व्यवस्थेला डिफाइन करू न देण्यासाठीचा आहे. आपली घरं, आपल्या वस्त्या, आपली शिरीरं ह्या जनावरांपासून सुरक्षित ठेवण्याचा हा लढा आहे. बाबासाहेब म्हणतात तसं प्रत्येक माणसाला स्वतःच्या असण्यावर आणी जगण्याच्या अमर्याद शक्यतावर फक्त त्याचाचं ताबा असावा नाकी कसल्या धर्माधिष्टीत वर्चस्ववाद्यांचा.

आपलं बेसिक क्लियर आहे. समोर काय आहे ते पण क्लियर. मग इथं मायावती काय करतेय, आठवले काय करतायत, दलित काय करतात, शिकलेले काय करतात, हे काय करतोय तो काय करतोय ह्या पॉईंट ओ.वन सॅम्पलशी माझा काहीही संबंध नाही. मी एक नैसर्गिक माणूस आहे आणी माझं साधं सरळ म्हणणं आहे की धर्माधिष्टीत जातव्यवस्थेतून फक्त एका मुठभर वर्गाकडं शतकांपासूनची अमर्याद पावर, संसाधनं, भांडवलं, मालकी आणी दुसरीकडं अस्तित्वासाठी, पोटपाण्यासाठी झगडणारा मानवी समूह.

माझा विरोध शोषणाच्या जिवावर निगरगट्टपणे जगनाऱ्या ह्या अमानवी जनावरांना आहे. इथ मग चांगले वाईट, पुरोगामी प्रतिगामी ही बालिश बायनरी येतचं नाही, कारण शोषण त्याचे फायदे हे सामुहिक, वर्गीय आहेत. मार्क्सचा क्लास इंटरेस्ट असचं काम करतो. असो. मराठवाडातल्या तीव्र जातीयवादी गावकुसात वाढून पण आपलं एका बाबतीत मत ठाम बनलयं की भेदभाव, हिंसा, अन्याय, अत्याचार ही जातीव्यवस्थेची सगळ्यात सगळ्यात सौम्य पण तितकीचं ठळक दिसणारी बाय-प्रॉडक्ट आहेत. जात वर्चस्वाची खरी अजगरमिठी त्या पलीकडची. जन्मापासून मरेपर्यंतचं एक अवकाश घालून देण्याची. त्यातचं गुदमरून मरणारा ‘मानवी आयुष्य’ नावाचा एक अनुभव. हे ज्या दिवशी कळेल ना, त्या दिवशी आपण समग्र मुक्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलेलं असेल. तो पर्यंत सगळी नेणिवेतली गुलामीचं साला!

गुणवंत सरपाते

लेखक हे सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत आहेत.

2 Comments

  1. खुपच गहन.या गहन समजुतीनं परिवर्तन आणण्यासाठी तयार होणं गरजेचे आहे.आपण सामुहिक पद्धतीनं यावर कसं मात करु शकतो,या बाबत लिहा.

Leave a Reply

Your email address will not be published.


*