मराठी कथा : मूल्यनिष्ठा की समूहनिष्ठा

‘मराठी कथा: मूल्य आणि ऱ्हास’ या पुस्तकात जी के ऐनापूरे यांनी मराठी कथेच्या 160 वर्षाचा लेखाजोगा मांडताना मानवता या सर्वश्रेष्ठ साहित्यमूल्याचे निकष आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जीवनमूल्ये केंद्रस्थानी ठेवली आहेत. याकरता ते ग्रामीण, दलित, नवकथा असं वर्गीकरण  नाकारतात. उलट अशा वर्गीकरणाचं राजकारण उघडं पाडतात. त्यांनी मराठी साहित्याची विभागणी साहित्य मूल्य लढवणारे आणि ही मूल्ये अदृश्य ठेवण्याची कसरत करणारे अशी दोन गटात केली आहे. प्रतिभा नावाची काहीतरी दैवी देणगी वाली गोष्ट असते, माणूस आणि साहित्यिक अशा दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात असे आपले कॉमन सेन्स ही मांडणी वाचताना गळून पडतात. लेखक हा फक्त लेखक असतो, तो परकाया प्रवेश करतो वगैरे भूलथापा आताशा कमी होऊ लागल्या आहेत. लेखकाच्या नेणिवेत कोणते घटक प्रभावी असतात याला पुरेपूर महत्व देणारे मराठीतले समीक्षक म्हणजे विलास सारंग. ऐनापुरे नेणीव आणि जाणिवेतले व्यवहार आपल्यापुढे आणून साहित्याला अलिप्त, दुर्लभ अशा क्षेत्रातून ओढून समाजातल्या वास्तवात आणतात. लेखकाचे माणूसपण आणि लेखकपण वेगळे असू शकत नाही हे सांगू पाहतात.

भारतातील  कथांच्या आणि साहित्याच्या इतिहासात कायकाय साहित्य येतं? रामायण, महाभारत, पुराणे येतात. जातक कथेपासूनची मौखिक परंपरापण यात येते पण याची जाणीव आपल्याला नाही. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मराठी कथेचा पहिला टप्पा होता त्यात श्री. म. माटे यांचे नाव येते. ना. रा. शेंडेंना टाळलं जातं. या टप्प्यावर (आणि पुढेही) ब्राह्मणी वर्चस्व दिसून येतं. मराठी कथेतील सामुराई(लढवय्या) कोण? पु भा भावे की विलास सारंग? नवकथा कुणाची? गाडगीळांची नवकथा तर मग बागुल, शंकरराव खरात, अण्णाभाऊ यांच्या नवकथेची बोळवण ‘दलित’ अशी का केली गेली? याचा उलगडा ऐनापुरे या पुस्तकात करतात.

मराठी साहित्यातील प्रस्थापितांचा प्रवाह नव्या नव्या अविष्कारणातून कसा टिकून राहतो हे मांडताना या पुस्तकात आपले वर्चस्व अबाधित ठेवण्याची प्रस्थापित ब्राह्मणी साहित्याची आणि समूहाची रणनीती तपशीलवार उघडी पाडली आहे. ब्राह्मण नसणारेही हे वर्चस्व राखायला हातभार लावतात. नवीन लिहू पाहणाऱ्यांना ब्राह्मणी वर्चस्वाखाली घेण्याच्या प्रस्थापित चालीरीती ते दाखवतात. उदाहरणार्थ, ग्रामीण व दलित कथालेखकांना प्रेरणा व वळण देण्याचे कार्य व्यंकटेश माडगूळकर यांच्याकडून झाले असा गो. मा. पवारांचा दावा; उपेक्षितांचे अंतरंग लिहिणाऱ्या माटेंची ‘संघीय भूतदया’. एकीकडे ते साहित्यातील ब्राह्मणी वर्चस्वाचं माध्यम ‘समूहनिष्ठा’ उघडं पाडतात तर दुसरीकडे दलित साहित्य वर्तुळातील आत्मघातकी कृत्ये समोर आणतात. जसे की दलित आत्मकथानांच्या लाटा, राजकीय नेत्यांच्या साहित्यिक लुडबुडी.

या पुस्तकातला सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे प्रयोगशीलतेच्या नावाखाली साहित्य क्षेत्रात प्रस्थापित ब्राह्मणी साहित्याचं रक्षण कसं केलं जातं याचं विवेचन.  ‘प्रयोगशीलता की आशय’ या प्रश्नात ते आशयाची प्राथमिकता अधोरेखित करतात. इथं प्रयोगशील (लिहिण्याचा फॉर्म, कथनशैली) म्हणजेच सर्जनशील अशी गफलत आपण करू नये.
उदाहरणादाखल या पुस्तकातील पुढील मुद्दा :  “….प्रयोगशीलता या साहित्य मूल्याच्या वर्चस्वामुळे ज्याच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे आणि त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही अशा दोघांच्या मध्ये ज्याच्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही अशा लेखकाचा जय होतो.”
म्हणूनच भास्कर चंदनशिव सारखा ग्रामीण आणि दलित सीमारेषा पुसट करणारा लेखक मला श्रेष्ठ कथाकार वाटतो. त्याने मांडलेला आशय सर्जनशील आहे (जांभळढव्ह ही कथा).

प्रयोगशीलतेच्या संदर्भात मराठी साहित्यातील वास्तववादावर लिहिताना हरिश्चंद्र थोरात सरळधोपट वास्तववादावर टीका करतात (मराठी कादंबरी : त्रेसष्ठ ते तेरा). विलास सारंग या वास्तवावादाची लेखकाच्या सामाजिक स्थानासंदर्भातली अपरिहार्यता आणि महत्त्व अधोरेखित करतात (वाङ्मयीन संस्कृती आणि सामाजिक वास्तव). तर जी के ऐनापुरे मानवता मूल्याच्या आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता या घटनेतील मूल्यांच्या चौकटीत वास्तववादी लेखनाला तपासतात. सदर पुस्तकात अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात आणि बाबुराव बागुल यांच्या कथालेखनाबाबतच्या विश्लेषणात ही तपासणी येते.

“शंकरराव खरात-आण्णाभाऊ साठे यांच्या कथेत अवतरलेला समाज ‘फॅक्ट'(वास्तववाद) या अर्थाने येतो. तर बाबुराव बागुल प्रतिकार या अर्थाने आशयाचा विस्तार करतात. अण्णाभाऊंच्या कथेतली आशयसूत्रे मराठी कथेला पूर्णपणे नवीन होती. (उदा. स्मशानातील सोनं). असं असतानाही अण्णाभाऊ नवकथाकारांच्या यादीत मोजले नाहीत.”
“शंकरराव खरात यांचे लेखन समाजशास्त्रीय भान असणारे आहे. त्यांनी बलुतेदारीची आर्थिक कोंडी मांडली. त्यामुळे अण्णाभाऊ आणि खरात यांना ‘दलित’ या अर्थाने मर्यादित करण्याचा प्रश्नच न्हवता.”
“नुसतं वास्तव नाही तर मनातल्या खळबळीसह वास्तव सांगणाऱ्या बागुलांच्या कथेत स्फोटकपणा आहे. बागुलांनाही दलितत्वात मर्यादित करण्यात आले. त्यांची ‘विद्रोह’ ही जागतिक दर्जाची कथा. वर्ग आणि वर्ण यांची एकत्रित अनुभूती ही कथा देते. भारतातील मार्क्सवादी समीक्षासुद्धा ब्राह्मणी कब्जा मध्ये अडकली. तिने बागुलांच्या आशयाचा मार्ग स्वीकारला नाही.

ज्या निकषांना समीक्षेत स्थान देणं इतर समीक्षक अभद्र समजत असावेत (कचरत असावेत) त्या निकषांना जी के ऐनापूरे सांस्कृतिक राजकारण उलगडताना स्थान देतात. पुस्तकाला प्रस्तावना कुणी दिली, अर्पणपत्रिका काय, कुणाला स्वखर्चाने पुस्तक छापणं भाग पाडतं याचे साहित्य (आणि समाजाच्या) व्यवहारातील अर्थ ऐनापूरे लावतात.

या पुस्तकाचाचा शेवट ऐनापुरेंनी सिद्धार्थ देवधेकर या कोकणातील मेन्सट्रीमला अपरिचित अशा कथाकारावर केला आहे. देवधेकर, मराठी कथा (आणि साहित्य) खऱ्या अर्थाने वैश्विक करणारे विलास सारंग, भास्कर चंदनशिव, शंकरराव खरात, बागुल यांच्यासोबत आपण काय व्यवहार ठेवला आणि यापुढे त्यात काय बदल केला पाहिजे इतकं जरी कळलं तरी मराठी कथेतील मूल्याच्या ऱ्हास थांबेल. मांडणीच्या शेवटाकडे येताना पुन्हा आपण कोणती साहित्यिक मूल्य जोपासणार आहोत याबद्दल ते आवाहन करतात. राज्यघटना आणि त्यातली मूल्ये ब्राह्मणी साहित्य आणि त्यातून निर्माण झालेले वर्चस्व रोखणारी शक्ती आहे. राज्यघटना, बुद्ध आणि मार्क्स यांच्या मूल्यांपर्यंत आपल्याला आणून ते सोडतात. ज्या प्रकारची आपली साहित्यिक अभिरुची (किंवा सवय म्हणू) घडली आहे; मग ती साहित्य वाचन असेल, टेलिव्हिजन असेल किंवा शाळा-महाविद्यालयात अभ्यासलेले पाठ, कादंबऱ्या असतील; आपल्याला हा प्रश्न साहजिकपणे पडणार की ‘साहित्याचा विचार करताना साहित्य आणि भारतीय राज्यघटना, तिची मूल्ये, आंबेडकर यांचा ऑरगॅनिक संबंध आहे का?’ याचं उत्तरही सदर पुस्तकात मिळतं. धर्मशास्त्रांच्या प्रभावातून, अंगीकारातून चालणार खूप मोठा साहित्य प्रवाह मराठीत वर्चस्व टिकवून आहे. धर्मशास्त्राचं ते वर्चस्व कधी ‘उपस्थिती’ म्हणून येतं तर कधी ‘टीका न केली जाणारी होली काऊ’ म्हणून. ऐनापुरे म्हणतात तसं मग बहुश्रुत स्त्रीवादी लेखिका कुटुंब, समाज यांच्यावर तुटून पडतात. लैंगिक मोकळीकता बोल्ड विचारातून मांडतात. पण धर्मावर टीका करताना हात आखडता घेतात किंवा कचरतात. मराठी साहित्यात (किंवा एकंदरीत भारतीय साहित्यात) ब्राह्मणी साहित्य वि. बौद्ध मूल्याचे साहित्य ही विभागणी ते महत्वाचे मांडतात आणि जोडीला मार्क्स घेतात. त्यांच्या मते देशीवादी मांडणीतील ब्राह्मणी साहित्य वि. हिंदू साहित्य ही विभागणी बौद्ध (मूल्ये या अर्थाने) साहित्याला बाजूला करणारी आणि त्यामुळे त्यात हिंदू साहित्याला मिळणारे यश हे ब्राह्मणी साहित्यातच मोजले जाण्याची शक्यता अधिक आहे असा इशारा देतात.

जी के ऐनापुरे ज्याला बौद्ध मूल्यांचा पुरस्कार करणारे किंवा घटनात्मक मूल्यांच्या पुरस्कार करणारे साहित्य (किंवा आंबेडकरवादी साहित्य) म्हणतात ते ‘दलित साहित्य’ या कोटीप्रमाणे एकाच समूहाचे साहित्य ठरत नाही. यामध्ये ते प्रेमचंद, अण्णाभाऊ साठे, बाबुराव बागुल, विलास सारंग, भास्कर चंदनशिव, कवी प्रकाश जाधव यांचा समावेश करतात यावरून त्याचे महत्व लक्षात येईल. या पुस्तकामध्ये  लेखकाने जी जी आशयसूत्रे मांडली आहेत, त्या प्रत्येकावर आणखी खोलात विश्लेषण व्हायला पाहिजे असं मात्र पुस्तक संपल्यावर वाटलं.

[मराठी कथा: मूल्य आणि ऱ्हास – जी के ऐनापूरे
ललित पब्लिकेशन]

सागर कांबळे

लेखक राज्यशास्त्र विषयाचे पदवी व पदव्युत्तरसाठी अध्यापन करतात.  

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*