मूकनायक चे ऐतिहासिक महत्त्व आणि बाबासाहेबांची भूमिका

पवनकुमार शिंदे

मूकनायक ह्या पाक्षिकाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात केली होती ती ३१ जानेवारी १९२० रोजी. त्यास आज १०१ वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने ह्या ऐतिहासिक घटनेचा घेतलेला आढावा.

बाबासाहेबांनी सदर वृत्तपत्राची ध्येयनिष्ठा संत तुकोबारायांच्या अभंगरुपी बिरुदावलीतुन केली होती,

” काय करूं आतां धरुनियां भीड । निःशंक हें तोंड वाजविले ।।

नव्हे जगीं कोणी मुकीयांचा जाण । सार्थक लाजून नव्हे हित ।। “

मूकनायकाची भूमिका विशद करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले,

” आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास, तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही..”

पुढे ते लिहितात,

” त्यांच्या अतिबिकीट स्थितीशी संलग्न असलेल्या प्रश्नांची वाटाघाट करण्यास एक स्वतंत्र पत्र पाहिजे हे कोणीही कबूल करील. ही उणीव भरून काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे.”

संक्षिप्त विवेचन:

मोन्टेग्यू-चेम्सफर्ड रिपोर्ट नंतर ब्रिटिश सरकारने २३ डिसेंबर १९१९ रोजी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट १९१९ लागू केला. छत्रपती शाहू महाराजांच्या मौलिक मदतीने बाबासाहेबांनी ३१ जानेवारी १९२० ला मूकनायक सुरू केला. १९१९ च्या कायद्यात शासन-प्रशासन भारतीयांच्या हातात देण्यात येईल- Resposible Government– असे घोषित करण्यात आले.

इथेच खरी मेख होती. कारण स्पष्ट आहे, भारतीय म्हणून राष्ट्रीयत्वाची भावना त्यावेळी मुळीच नव्हती. भावना होती ती धर्म जाती भेदाची. कायदे कॉउन्सिलात भारतीयांना घेऊ याचा अर्थ हिंदू ,शीख, मुसलमानांना घेऊ असा होता. हिंदू हा शब्द समस्त हिंदूंना उद्देशून जरी असला, तरी सत्तेची मलाई हिंदूंच्या नावे ब्राह्मण वर्गच लाटणार होता हे उघड होते.

ब्राह्मणेतर वर्गाने स्पष्टपणे सांगितले की सुराज्यात ज्या ज्या म्हणून राजकीय सुधारणा होतील त्यांच्या तीन वाटण्या होणे आवश्यक आहे. बहिष्कृत वर्ग जरी ब्राह्मणेतर या ‘ अवडंबर संज्ञेखाली’ मोडत असला तरी त्याचे प्रश्न इत्यादी निराळे आहेत. तथापि स्वराज्यात त्यांचाही वाटा असला पाहिजे. त्यांचे सुद्धा सच्चे प्रतिनिधी कायदे कॉउन्सिलात गेले पाहिजेत. राजकीय दृष्ट्या ते जागृत झाले पाहिजेत. थोडक्यात काय तर

‘ जो दुसऱ्यावरी विसंबला

त्याचा कार्यभाग बुडाला..’

असे न होता, हजारो वर्षे हिंदू धर्माने ज्या वर्गाची माणुसकी हिरावून घेतली होती त्यांनी आता पुढे येऊन या देशात शासन करणारी जमात बनले पाहिजे.

१९१९ च्या ऍक्ट ची कालमर्यादा १० वर्षांची होती, त्यांनतर त्या ऍक्ट ची व्याप्ती, प्रतिनिधित्व इत्यादी वाढविण्यासाठी १९२९ ला ब्रिटिश सरकार कमिशन नियुक्त करणार होते. तेंव्हा स्वराज्यात आमचे आरोहण, त्याचे प्रमाण व पद्धती याची चर्चा करण्यासाठी मूकनायक पत्राचा जन्म झाला.

मूकनायक १९२० चे एकूण १९ अंक उपलब्ध आहेत

महाराष्ट्र शासनाने १९९० ला मूकनायक व बहिष्कृत भारताचे अंक प्रकाशित केले. मूकनायक ३१ जानेवारी १९२० ते २३ ऑक्टोबर १९२० असे तब्बल १९ अंक अभ्यासकांसाठी उपलब्ध आहेत.

सदर अंकातील बाबासाहेबांच्या अग्रलेखांचे व लेखांचे मोजके शीर्षक पाहुयात,

– स्वराज्याची सर सुराज्याला नाही !

– स्वराज्याचे मातापिता

– राष्ट्रांतील पक्ष

– हें स्वराज्य नव्हे, हें तर आमच्यावर राज्य !

– टोणगे पान्हवतील काय ?

– यांचा ब्राह्मणवर्ग असावा खास

– वैऱ्यांनी कीं हो नेला कैवारी

– स्वराज्यातील आमचें आरोहण, त्यांचें प्रमाण व त्याची पद्धती


पवनकुमार शिंदे

लेखक ‘प्रज्ञासूर्याच्या प्रखर तेजाकडे – चला बाबासाहेबांच्या मूळ ग्रंथाकडे महाअभियान’, राष्ट्र हितकारिणी सभा, परभणी चे संकल्पक – प्रवर्तक आहेत.


4 Comments

  1. मुलगामी कृतिशील विचारवंत
    जय भीम नमो बुद्धाय

  2. मुलगामी कृतिशील विचारवंत डॉ बाबासाहेब आंबेडकर
    जय भीम नमो बुद्धाय

Leave a Reply

Your email address will not be published.


*