‘नान यार’ चा प्रश्न सोडवला जात नाही तोवर ‘कोहम’ चा प्रवास फिजूल आहे

सागर अ. कांबळे

‘नान यार’ आणि ‘कोहम’ मधला संघर्ष तितकाच जुना आहे. आपल्याकडे आता सगळे काही आहे आणि जीवनाला काहीएक अर्थ द्यावा म्हणून काही गोष्टी करून बघू असे ठरवायची ज्यांना संधी मिळते असा एक वर्ग समाजात आहे. त्याचा कोहमचा प्रवास चालू असतो.

कोहम म्हणजे वेदातील प्रश्न : ‘मी कोण?’

दुसरीकडे अशी व्यक्ती आणि वर्ग असतो ज्यांचे पोटापाण्याचेच प्रश्न मिटलेले नाहीत. त्यांचा संघर्ष हा अस्तित्वाचा, टिकून राहण्याचा संघर्ष असतो. या संघर्षातल्या व्यक्तीने विचारलेला प्रश्न ‘नान यार’ (मी कोण)? हा कोहम पेक्षा खूप वेगळा आहे.

संतृप्ततेत जीवन जगलेल्या माणसाचा कोहम चा प्रवास म्हणजे त्याच्यासाठी जीवनाला अर्थ देण्याचे प्रयत्न असतात. ‘मी कोण’ या शोधात तो स्वतः च्या अनेक ओळखी निर्माण करायचा प्रयत्न करतो. अनेक कृती, उपक्रम, कला, समाजसेवा करत राहतो. हे मार्ग त्याच्यासाठी सुलभतेने उपलब्ध असतात. कारण ज्या जगात तो वावरतो, त्यातले नियम तो ज्या वर्गातून येतो त्याला अनुकूल असतात. त्याला वेगळे काही करावे लागत नाही. त्याला निर्णय घ्यायचा असतो : खेळाडू व्हायचं, लेखक व्हायचं, समाजसेवक व्हायचं, पत्रकार की वैज्ञानिक. त्याच्यासाठी सगळे मार्ग प्रशस्तपणे उघडे असतात. यातलाच एक मार्ग म्हणजे ज्या वर्गातून तो जन्माला आला, वाढला त्यांनी आतापर्यंत ज्यांना खाली दाबून ठेवले आहे त्या खालच्या वर्गासाठी तो करत असलेली समाजसेवा. आपल्या टोपलीतल्या भाकरीतले तीनचार घास गरिबांना द्यावेत, अशी त्याची समाजसेवा. समाजसेवी संस्थांच पसरलेलं जाळे हे याच मार्गाचा अवाढव्य प्रसार. मूळ व्यवस्था तशीच ठेवून या वरच्या वर्गातल्या लोकांच्या आध्यात्मिक समाधानाचा हा दानधर्माचा महामार्ग. या कोहम च्या प्रवासाने खरंच या वर्गाची किंवा त्यातल्या व्यक्तीची आध्यात्मिक मुक्ती, प्रगती होत असेल का? हा असला आध्यात्मिक मार्ग म्हणजे शोषणव्यवस्था टिकवून ठेवण्याचाच मार्ग.

या कोहम च्या वैदिक आरोळीचा आवाज जितका पुरातन आहे तितकाच पुरातन आहे ‘नान यार’ च्या आक्रोशातला प्रश्न. ‘नान यार’ च्या आक्रोशात परियेरूम पेरूमल हा नायक प्रश्न विचारतो की : मी कोण आहे? मला तुम्ही माणसासारखी वागणूक देत नाही. मग मी आहे तरी कोण?

नान यार म्हणत हातपाय न गाळता आपल्या माणूसपणाचा दावा करणारी पीडित समूहातली सारी माणसं. या विहिरीतलं पाणी घेतलं तर वरच्या जातीतल्या बायका जीव घेस्तोवर मारतील ची भीती असतानाही त्या विहिरीत हंडा बुडवण्याची हिंमत करणाऱ्या बाया. मधल्या रात्री उठून जमीनदाराच्या कौलावर दगड मारणारा कवळा पोरगा. व्यवस्थेने माणूसपण नाकारलेल्या या साऱ्या माणसांनी ‘नान यार’ चा आक्रोश करत या वरच्या वर्गाच्या अध्यात्माचं सारं थोतांड बाहेर पाडले.

कोहम वाल्यांचा प्रवास अध्यात्मिक आहे आणि नान यार वाल्यांचा हा सामाजिक आहे ही समज पण फसवी आहे. अध्यात्म कशाला म्हणायचं हे कोण ठरवणार? कोहम चा जप करत शोषणव्यवस्थेचा लाभ घेणारा वर्ग?

बाबासाहेबांच्या भाषेत ‘नान यार’ चा संघर्ष स्पिरिच्युअल (आध्यात्मिक) आहे. बाबासाहेब म्हणतात, With justice on our side I do not see how we can lose our battle. The battle to me is a matter of joy. The battle is in the fullest sense spiritual. हा संघर्ष पूर्णतः आध्यात्मिक स्वरूपाचा आहे.

सारांश, ‘नान यार’ चा प्रश्न जोवर सोडवला जात नाही तोवर हा ‘कोहम’ चा प्रवास फिजूल आहे.

सागर अ. कांबळे

लेखक राज्यशास्त्र विषयाचे पदवी व पदव्युत्तरसाठी अध्यापन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*