निवडक शाहू :- भाग 1~ विकास कांबळे


शाहू राजा एक अजबच रसायन होते. कधीकधी ते एकटेच कुठेही भटकायला जात. शिपाई नाही, रथ नाही, संरक्षक नाहीत. मनात आले की स्वारींनी घोड्यावर मांड ठोकली आणि मग दिसेल तो रस्ता.

एकदा श्रावणात असेच अचानक एकटेच महाराज बाहेर पडले आणि पंचगगेच्या काठी पोहचले. शेजारीच मक्याचे पीक तरारले होते. कोवळी लुसलुशीत कणस बघून महाराज सुखावले. घोडाही भुकावला होता. महाराजांनी घोड्याचा लगाम काढला आणि दिला सोडून उभ्या पिकात.

शेजारच्या वावरात मळईची मालकीण वांगी तोडत होती. घोडा अर्ध्या पिकाची नासधूस करुन महाराजांजवळ येऊन थांबलेला पाहून बाई तणतणत महाराजांजवळ येणार तोच महाराज घोड्यावर बसून निघून गेले.

बाई घरी जात असताना तीला महाराज जवळच सोनतळी कँपला मुक्कामाला असल्याच समजल. ती डालीभर कणस घेऊन महाराजांना भेटायला पोहचली. महाजांचा नोकर-चाकरांना पक्का आदेश होता. प्रजेतला कुणीही तक्रार घेऊन आला की त्याला अजिबात आडकाठी केली जाता कामा नये. त्यामुळे सोनतळी कँम्पवर बाईला कुणी अडवलं नाही. ती सरळ राजा असलेल्या ठिकाणी जाऊ लागली. मध्येच वाटेत एका झाडाखाली कालचा तीच्या पिकाची नासधूस केलेला व्यक्ती बसलेला तिने पाहीला. त्याला बघताच बाई कोल्हापूरी शिव्या हासडू लागली.
बाई:- “अरे, तुझा मुडदा बशीवला मेल्या…. बरा गावलास की हिथच!!! थांब आता राजाला सांगतो तुझी कागाळी… तुझ्या किरडीचा दांडा मोडला तुझ्या!!!

बाईच्या शिव्या ऐकून नोकर-चाकर गोळा झाले. नोकरांपैकी एक स्त्री पुढे आली आणि तिने त्या बाईला आवरल आणि ती शिव्या देत असलेला इसम हे खुद्द छ. शाहू महाराज असल्याच सांगितलं. ऐकून बाईंची वाचाच बसली, तोंडाला कोरड पडली. छत्रपती मात्र जोरात हसत होते. तिने महाराजांचे पायच धरले. राजाच्या पायाला बिलगून रडत रडतच महाराजांना म्हणाली,” महाराज, माफ करा, मला फासावर लटकवा, म्या रांडेन अन्नदात्याला शिव्या हासडल्या.” महाराजांनी तीला उठवलं आणि शांत व्हायला सांगितले. पण तिचे अश्रु थांबत नव्हते.
महाराज तिला म्हणाले, “अग बाई तू तुझ्या राजाला कुठ शिव्या दिल्या?
बाई:- “दिल्या महाराज, म्या रांडेन मायबापाला शिव्या दिल्या, कधी दर्शन नव्हत महाराज.
शाहू महाराज:- “अग, तू राजाला कुठं वंगाळ बोललीस? तू शिव्या दिल्या त्या तूझ पिक नासवणाऱ्याला!!! पिकाची नासधूस करणाऱ्याची पुजा करायची असती काय? गाऱ्हाण हाय ना तुझ ये.”
ऐकून बाईने हंबराडाच फोडला.
शाहू महाराज:- “अरे, कोण हाय र तिकडं… बाईन आणलेली कणस भाजा, नवी नव्हाळ हाईती”
आणि त्यानंतर महाराजांनी आपल्या करभाऱ्यांना बोलावलं.
शाहू महाराज:- “ही बाई कोण, हीची जमीन किती ते सगळ बघा. हीला आत घेऊन जा. राहू द्या दोन दिवस. जा बाई घाबरु नकोस.”
दोन दिवसांनी कारभारी माहीती घेऊन आले.
कारभारी:- “मळई बाईंची नाही महाराज. ही आणि हीची मुलबाळ ती खंडान करतात”
शाहू महाराज:- “जिमीन कुणाची मंग?”
कारभारी:- “एका ब्राम्हण जमीनदाराची आहे”
शाहू महाराज:- “त्याला काय करायची जमीन लेकाला? त्याचा घाम पडणार का तीत? ती काढून घ्या. सरकारात जमा करा आणि आमची देणगी म्हणून बाईच्या नावन करुन द्या.” महाराजांनी हुकूम सोडला.
बाईन राजाला दंडवत घातला.


विकास कांबळे.

लेखक इंडिपेंडट रिसर्चर आणि फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

संदर्भ :- राजर्षी शाहू गौरव ग्रंथ.
प्रकाशक:- महाराष्ट्र शासन.
राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समिती, मुंबई .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*