सागर कांबळे
जातीअंतासाठी लिहायचं आहे असे आवाहन आल्याआल्या मला विलास सारंग यांच्या ‘एकलव्य’ या कथेतील एकलव्य कांबळेची आठवण आली. त्यात दोन एकलव्य आहेत पैकी एकाने अर्जुनावर मात करून बलपरिक्षा जिंकली तर दुसरा एकलव्य कांबळे हा या एकलव्याच्या कथेला न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटत राहतो. एकलव्य कांबळे या दलित लेखकाला व्यासमहर्षी न थांबता एकटाकी संपूर्ण महाभारत अपडेट करून लिहायचं आव्हान देतात. या प्रकल्पावर दिवसरात्र राबून राबून एकलव्य कांबळेंचा अंगठा दुखू लागतो तरी मलमपट्टी करून ते लेखन चालू ठेवतात. परिणामी त्यांचा अंगठा निकामी होऊन जातो त्या एकलव्यासारखाच!
आपल्या देशात जातीअंताच्या लढ्याचीही अशीच गत झाली आहे. जातीव्यवस्था इज इक्वल टू दलितांचा प्रश्न असा काहीसा कॉमन सेन्स तयार झाला आहे. जातीअंत कुणाला हवा आहे? आणि तो कशा पद्धतीने हवा आहे? हे दोन जुनेच मूलभूत प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. आंबेडकर म्हणतात तशी जातीव्यवस्थेची सुरुवात आणि दृढीकरण ही वरच्या वर्णजातीतून झाले आहे. तर मग जातीअंतही तिथून व्हायला पाहिजे. म्हणजे जातीयता हा दलितांचा नाही तर ब्राह्मण सवर्णांचा (म्हणजेच त्यांच्यामुळे निर्माण झालेला) प्रश्न आहे. आणि हा प्रश्न जितक्या जलदगतीने सोडवण्यात येईल तितक्या जलदगतीने सवर्णांची माणुसकीकडे वाटचाल होईल. कारण सवर्ण-अनुकूल अशा या व्यवस्थेनं खालच्या जातींचे माणूसपण नाकारले आहे. आता मुख्य प्रश्न हा की सवर्णांना जातीअंत हवा आहे का? हवा असेल तर पुढचा प्रश्न येतो की मग तो कशा पद्धतीने हवा आहे? म्हणजेच त्याचे मार्ग काय?
मी बाबा जातपात मानतच नाही असे म्हणून हा प्रश्न मिटतो का खरंच. जातीव्यवस्थेच्या आकलनाबाबत सवर्ण व्यक्ती फारच कच्ची असते. कुणीतरी नैसर्गिकरित्या अस्पृश्य नसतं तर, कुणीतरी ब्राह्मण असतं म्हणून कुणीतरी अस्पृश्य असतं. जातीव्यवस्था अशी काम करते. तेव्हा सवर्ण व्यक्तीचं कुटुंब, शिक्षण, व्यवसाय, तिला मिळालेले प्रिव्हिलेजेस या सगळ्यात मेरीटपेक्षा कितीतरी पटींनी जातीच्या उतरंडीतल्या स्थानाचं योगदान असतं हे आकलन होणं, याची जाणीव होणं ही सवर्ण व्यक्तीची जातीअंताच्या प्रवासातली पहिली पायरी आहे. आपल्या देशात ही पहिली पायरीच अजून तुटपुंजी आहे. त्यानंतर मग पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे ‘या प्रिव्हिलेजेसचं करायचं तरी काय?’ एकंच करायचं माणुसकीपासून लांब गेलेल्या ब्राह्मणी, सरंजामी व्यवस्थेविरोधात चळवळ उभी करायची (ना की दलित आदिवासींसाठी सेवा सुधारणा प्रकल्प राबवावे). आंबेडकर ‘जातीसंस्थेचे उच्चाटन’ हे भाषण सवर्णातील सुधारकांना उद्देशून केले आहे. त्यात अपेक्षा केल्याप्रमाणे ब्राह्मण-सवर्णांमध्ये व्होल्टेअर होईल का?
शेवटची गोष्ट म्हणजे जातीअंताचा लढा म्हणजे फक्त सुधारणा प्रवचने आणि प्रबोधन नाही. जात हा एक भौतिक अनुभव असतो. मग तो स्पर्श-विटाळाचा असेल, मान-अपमानाचा असेल, श्रीमंती-दारिद्र्याचा, मालकी-मजुरीचा असेल. याचा इलाजही भौतिक असणार. भांडवल, जमीन, आर्थिक संधी या गोष्टी जातीअंताच्या लढ्यातून अधिकाधिक बाजूला होत जाणं ही मोठी धोक्याची घंटा आहे. सवर्ण गरीब आरक्षण आणि त्यातून सामाजिक न्यायाच्या घटनात्मक तत्वाची झालेली मोडतोड अशा कृतींनी व्यवस्था जैसे थे राहायला आणखी हातभार लागणार आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फॅसिजमच्या विरोधात बोलणाऱ्या सवर्ण सुधारणावादी गटांनी या गरीब सवर्ण आरक्षण कृतीला दिलेली मूकसंमती काय दाखवते सुधारणावाद की समूहनिष्ठा? त्यामुळे हा प्रश्न, ही अपेक्षा अधिक जटील वाटते, सवर्णांना जातीअंत हवा आहे का?
सागर कांबळे
लेखक राज्यशास्त्र विषयाचे पदवी व पदव्युत्तरसाठी अध्यापन करतात.
(हा लेख सर्वप्रथम मिळून साऱ्या जणी येथे प्रकाशित झाला होता.)
- आपली क्रांती आपण क्लेम केली पाहिजे - September 5, 2022
- आशयाचा श्रम : अण्णाभाऊ साठे मराठी कथा स्पर्धा – भूमिका - April 25, 2022
- कलमवाली बाई - February 17, 2022
Leave a Reply